जनसेवे जीवन दिधले...

    दिनांक  13-Oct-2021 13:18:49
|

fadnvis 2_1  H


विधिमंडळातील माझे सहकारी आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दि. १३ ऑक्टोबर रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत आहेत. मी त्यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुरोग्य चिंतितो.


गेल्या दोन वर्षांपासून प्रवीण दरेकर आणि मी विधिमंडळात एकत्रितरित्या काम करत आहोत. या काळात जनतेच्या समस्यांवर संघर्ष करण्याची त्यांच्या मनातली तळमळ जवळून पाहता आली. कोरोनाचे संकट आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वसामान्य जनतेला, हातावर पोट असलेल्या कष्टकर्‍यांना, स्थलांतरित मजुरांना रोजगाराचे, आरोग्याचे, दैनंदिन जीवन जगण्याचे अनेकानेक प्रश्न भेडसावत होते. त्यावेळी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रवीण दरेकर धावून गेले. गोर-गरीब, अडलेल्या-नडलेल्या, रंजलेल्या-गांजलेल्या जनतेसाठी त्यांनी अनेक समाजहितैषी उपक्रम राबवले. कोरोनामुळे विविध संकटांना तोंड देत असलेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेटी दिल्या, जे बळी पडले त्यांचे सांत्वन केले, ज्यांना काही ना काही मदतीची गरज होती, त्यांना मदत केली. त्यातून त्या लोकांनाही धीर मिळाला, बळ मिळाले. अजूनही कोरोना संकट संपलेले नाही आणि प्रवीण दरेकर यांची अडचणीत सापडलेल्या आपल्या जनतेला त्यातून बाहेर काढण्याची कळकळ कायम आहे.कोरोनाबरोबरच गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रावर, कोकणवर, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर अतिवृष्टी, महापूर, ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘तोक्ते’ चक्रीवादळ यांसारखी संकटे कोसळली. त्यावेळी माझ्याबरोबर संकटग्रस्त जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रवीण दरेकर सर्वत्र फिरत होते. आताच्या सप्टेंबरमध्येही मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी, महापुराचे संकट आले. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांचे गार्‍हाणे ऐकण्यासाठी व जनतेच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मी संकटग्रस्त भागांचे दौरे केले, प्रवीण दरेकर प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर होते. यावेळी जनतेला संकटातून बाहेर काढून त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रवीण दरेकर यांची तळमळ पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेत्याने प्रत्येक संकटात प्रथम जनतेत पोहोचायचे असते. प्रवीण दरेकर या प्रत्येक संकटात लोकांमध्ये राहिले.विधिमंडळात काम करताना अधिवेशन काळात कोरोना संकटाने जगणे दुष्कर झालेल्या, नैसर्गिक आपत्तींनी त्रासलेल्या राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, प्रश्न मिटवण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी सभागृहात आवाज उठवला. राज्य सरकारसमोर जनतेच्या समस्या मांडल्या, प्रश्न मांडले आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी कळकळीने विनंती केली. आपत्तीग्रस्त व शेतकर्‍यांना वेळेवर व भरीव नुकसानभरपाई मिळावी, पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावे, यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने मागणी केली. अनेकदा आम्ही दोघे बरोबरीने राज्याच्या विविध भागांत दौर्‍यावर गेलो, त्यावेळी शेतकर्‍यांच्या बांधावर, शेतावर, वनवासींच्या झोपड्यांत, ग्रामीण-दुर्गम ठिकाणी बैठकी घेतल्या. कोकणात महापूर आला, त्यावेळी जिथे प्रशासनाने जाणे योग्य नाही, असे सांगितले, अशा ठिकाणीही प्रवीण दरेकर आधीच पोहोचले होते. गिरीश महाजन हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. कारण, जनतेची संकटातून, समस्येतून सुटका झाली पाहिजे, नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे, आपण जनतेला भेटलो, तर राज्य सरकारही तेथील समस्येकडे, संकटाकडे वेळीच लक्ष पुरवेल, अशी त्यांची यामागची भावना होती.मुंबईतही कोरोना संकट आणि इमारत कोसळण्याच्या, आग लागण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या, त्यावेळीही प्रवीण दरेकर तिथे पोहोचले. महापालिकेच्या माध्यमातून संकटग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, म्हणून त्यांनी आवाज उठवला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महिलांवरील बलात्कार-अत्याचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यावेळीही प्रवीण दरेकर यांनी या घटनांचा निषेध करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची व पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. संकटात जनतेच्या पाठीशी उभे राहतानाच प्रवीण दरेकर यांनी विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य दिले. आपल्या मतदारसंघात विविध विकासकामे करुन स्थानिकांच्या अडीअडचणी सोडवल्या, तसेच विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असल्याने राज्यभरातील अडचणीत सापडलेली, खोळंबलेली विकासाची कामे राज्य सरकारच्या लक्षात आणून देऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. विकासाप्रति असलेली त्यांची तळमळ आणि प्रतिबद्धताच यातून दिसून येते.प्रवीण दरेकर मुंबईसारख्या महानगरातले नेतृत्व आहे, तरीही महानगरांसमोरच्या समस्या आणि विरोधी पक्षनेता म्हणून राज्याच्या शहरी व ग्रामीण भागासमोरच्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यावर नेमके काय उपाय योजले पाहिजेत, याची त्यांना माहिती आहे. जनतेला नेमके काय हवे आहे, याची नस त्यांनी बरोबर ओळखलेली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आतापर्यंत जनतेच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी उत्तम कामगिरी केली व ते यापुढेही मिळेल, ती जबाबदारी तितक्याच ताकदीने पार पाडतील, त्यासाठी अहोरात्र झटत राहतील, असा मला विश्वास आहे. त्यांना दीर्घ, निरामय आयुष्य लाभावे, ही शुभकामना व्यक्त करतो. त्यांच्या हातून समाजसेवा, देशसेवा अशीच अविरत घडत राहो, अशा शुभेच्छा देतो.


- देवेंद्र फडणवीस

(लेखक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.