विसाव्या शतकातील भारताचे पहिले ‘सामरिक तज्ज्ञ’ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

    दिनांक  12-Oct-2021 18:49:27
|
rajnath singh_1 &nbs

राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील सावरकर विचार कालातीत
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर सावरकर हे विसाव्या शतकातील भारताचे पहिले कुटनिती आणि सामरिक तज्ज्ञ होते. त्यांचा राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील विचार कालातीत होता, ते त्यांनी केलेल्या भविष्यवाणी सत्य होताना पाहून सिद्ध होते; असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
केंद्रीय सुचना आयुक्त उदय माहुरकर लिखीत ‘वीर सावरकर – द मॅन हू कुल्ड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
 

book_1  H x W:  
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील विचार हे कालातीत आणि वास्तववादावर आधारित होते. त्यांनी देशापुढील संभाव्य धोक्यांची भविष्यवाणी तेव्हीच केली होती आणि ती भविष्यवाणी वेळोवेळी खरी ठरली आहे. त्यामुळे विसाव्या शतकातील भारताचे पहिले सैन्य, कुटनिती आणि सामरिक तज्ज्ञ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घ्यावे लागेल. स्वातंत्र्यवीरांसाठी राष्ट्र ही एक सांस्कृतिक संकल्पना होती. एका राष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक भेदभाव नसणे ही त्यांच्यासाठी आदर्श राज्याची संकल्पना होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
 
 
सावकरांचा विचार आणि तत्वज्ञान हा देशातील विशिष्ट, प्रामुख्याने मार्क्सवादी – लेनीनवाद्यांनी जाणीवपूर्वक दाबल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राष्ट्रनायकांविषयी वाद – प्रतिवाद व्हावा, मात्र त्यांचा द्वेष करणे योग्य नाही. त्यांच्यावर नाझावादी, फॅसिस्टवादी असल्याचा आरोप लावणाऱ्यांना सावरकर हे यथार्थवादी आणि राष्ट्रवादी होते हे कधीही समजू शकत नाही. त्यांनी दया अर्ज केल्याचा आरोप केला जातो. मात्र, कैद्यांना मिळणाऱ्या मार्गाचा वापर त्यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून केला होता आणि महात्मा गांधींनीदेखील त्यांच्या सुटकेची मागणी केली होती, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. सावरकर हे महानायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. सावरकर हा केवळ विचार नसून ते भारताच्या साहसाचे, सन्मानाचे, सामर्थ्याचे, धैर्याचे आणि सनातन विचाराचे प्रतिक आहेत, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
सुमार बुद्धीचे लोक सावकरांची बदनामी करतात – सरसंघचालक
 
 
यापूर्वी देशामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे धोरण हे परराष्ट्र धोरणानुसार वाटचाल करायचे. कारण, प्रत्येक वेळी जग काय म्हणेल हा विचार केला जात होता. मात्र, २०१४ नंतर प्रथमच संरक्षण धोरणानुसार परराष्ट्र धोरण वाटचाल करीत आहे. हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार होता, त्यामुळे देशाची वाटचाल आता सावरकर विचारांवर होत असल्याचे कोणी म्हणत असेल तर त्यात वावगे काहीही नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
 
ते पुढे म्हणाले, उदारमतवादी ठाऊक नसणाऱ्या सुमार बुद्धीच्या लोकांनी सावरकरांची बदनामी चालविली आहे, त्यामुळे त्याची दखलही घेण्याची गरज नाही. सावरकरांची बदनामी होत असली तरीही खरे लक्ष्य आहे ते स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद, कारण ही तिघांनी भारतीय राष्ट्रीयतेचा उद्घोष केला होता. त्यामुळे संपूर्ण जगाला जोडणाऱ्या भारतीय राष्ट्रीयतेचा विचार प्रसारीत होत राहिला, तर अनेकांची दुकाने बंद होतील; त्यामुळे सावकरांना लक्ष्य केले जात आहे. देशात आज ७५ वर्षांनी सावकरांचे विचार हे योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे अखंड भारताचा विचार हा भारतीयांसह संपूर्ण जगासाठीच महत्वाचा असल्याचेही सरसंघचालक डॉ. भागवत यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
मोदी सरकारची वाटचाल सावरकर विचारांवरच – उदय माहुरकर
 
 
स्वातंत्र्यवीर हे भारतीय राष्ट्रीय सुरक्षेचे पितामह आहे, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरील धोके वेळीच ओळखले होते असे प्रतिपादन पुस्तकाचे लेखक उदय माहुरकर यांनी केले. ते म्हणाले, सावरकर हे वटवृक्ष असून आपण सर्व त्यांच्या पारंब्या आहोत, असे वर्णन रॅडिकल ह्युमॅनिस्ट एम. एन. रॉय यांनी केले होते. सावरकरांचा विचार देशात गेली ७० वर्षे जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आला. मात्र, आता सावरकर युगाची पहाट झाली आहे. कलम ३७० संपुष्टात आणणे, श्रीराम मंदिर उभारणीस प्रारंभ होणे हा तोच विचार आहे. त्यामुळे मोदी सरकार हे सावरकर विचारांवरच चालत असल्याचे स्पष्ट आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.