केईएम रुग्णालयातील २९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

01 Oct 2021 12:23:59

Mumbai_1  H x W
मुंबई : एकीकडे महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत असताना दुसरीकडे मुंबईतून एक भयावह स्थिती समोर आली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात २९ एमबीबीएस विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे संक्रमित विद्यार्थ्यांपैकी २७ विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच, यांच्यापैकी ७ विद्यार्थी प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत तर उर्वरित २३ द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. संसर्ग झालेल्यांपैकी दोन जणांना मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर सर्वांची प्रकृती स्थिर असून ते क्वारंटाइन आहेत.
 
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितले?
 
 
गुरुवारी ही माहिती समोर आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, हे विद्यार्थी काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमामुळे एकमेकांच्या संपर्कात आले आणि कोरोना पॉझिटिव्ह झाले. आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सातत्याने सांगत आहेत की, लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क काढू नका, हेच संरक्षण आहे. काही विद्यार्थ्यांना थोडा त्रास जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना काळजी करण्यासारखी नाही. सौम्य लक्षणं असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0