'घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

09 Jan 2021 13:18:21

fadnavis_1  H x



मुंबई :
भंडाऱ्यातील घटनेवर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ICUमध्ये दहा बालकांचा मृत्यू होणं लाजिरवाणं असून महाराष्ट्राच्या इतिहासात ही काळी घटना असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी म्हंटले आहे.फडणवीस यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देत अग्निशामक यंत्रणेसंबंधी अहवालावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.




भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक, प्रगतीशील महाराष्ट्रात १० नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहेत. यावेळी ७ बालकांना वाचनविणाऱ्या रक्षकांचेही त्यांनी आभारही मानले. भंडाऱ्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणल्याप्रमाणे , १२ मे२०२०ला रुग्णालयात अग्निशामक यंत्रणेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र यावर राज्य सरकारकडून कोणतीही दाखल घेण्यात आली नाही. ती का घेण्यात आली नाही ? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी संबंधित घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.


राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने घेतली दखल

संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये घडली आहे. रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बाळांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी मध्यरात्री २च्या सुमारास ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत भंडारा दुर्घटनेची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून ४८ तासात रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0