भंडाऱ्यातील घटनेने मोदीही हळहळले...

09 Jan 2021 12:11:04

narendra modi_1 &nbs



नवी दिल्ली :
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून १७ बालकांपैकी ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे.




पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितले.


आरोग्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.तसेच संध्याकाळी ५ वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी सांगितलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत ३ बाळांचा होरपळून तर ७ बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
घटना नेमकी काय ?

लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं. दरम्यान, 10 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर ७ बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.
 
Powered By Sangraha 9.0