स्व.आनंद दिघेंच्या समाजकार्याचा वसा भाजपने घेतला - प्रविण दरेकर

09 Jan 2021 17:42:25

pravin darekar_1 &nb





ठाणे महापालिका निवडणूक भाजपचाच झेंडा फडकणार



ठाणे: ठाण्यात कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले मात्र, सत्ताधारी शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जपलेली सामाजिक बांधिलकीदेखील संपवली आहे. आता दिघेच्या कामांचा वसा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीत महापलिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने कोपरीत 'सहस्त्रचण्डी हवनात्मक नवकुंडीय' महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शुक्रवारी ठाण्यात आलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.




राज्यात सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावरून उतरवला आहे. तसेच सध्या शिवसेनेची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली असून प्रत्येकवेळी राज्य सरकार म्हणून स्वतः काही करायचे नाही आणि नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. हेच उद्योग सध्या सुरू आहे, अशी टिका प्रवीण दरेकर यांनी केली. कोपरीत सुरू असणाऱ्या अश्या धार्मिक कार्यक्रमामुळे हिंदू धर्माची पताका जपण्याचे काम भाजप ठाण्यात करत आहे. ठाण्यात भाजपचे काम योग्य पद्धतीने सुरू असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्या तुलनेने आनंद दिघे याच्या ठाण्यात शिवसेना कार्यकर्ते काम करताना दिसत नाहीत. कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी धावपळ करून समाजसेवा केली, धर्मवीर आनंद दिघे यांची सामाजिक बांधिलकी आणि दिघे यांच्या कामाचा वसा खऱ्या अर्थाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उचललेला असल्याचे चित्र दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.




पोलिसांच्या मागे चोर धावत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. सरकारमध्ये असून अजित पवार असे वक्तव्य करत आहेत, हे दुर्दैवी आहे. याचाच अर्थ- कायदा व सुव्यवस्था राखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. पोलिसांना मनोबल आणि यंत्रणा वाढवली जात नाही, पोलिसांची प्रतिमा मलिन होत असतानाच सरकारचीही प्रतिमा मलिन होत आहे.अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.




Powered By Sangraha 9.0