गृहस्थी प्रचारक सच्चिदानंद फडके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2021
Total Views |

Fadake_1  H x W
 
 
 
आज बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल आपल्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एक आम्हा कुटुंबीयांचा प्रयत्न!
 
 
बाबा आणि त्यांची भावंडं नागपुरात लहानाची मोठी झालीत. संघाचे श्रीरामजी जोशी हे त्यांच्या इंजिनिअरिंग डिप्लोमाचे प्राध्यापक. कॉलेजमध्ये तास संपल्यावर ते शाखा लावायचे. श्रीरामजींच्या विचारांचा बाबांवर खूप पगडा होता. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात ते १९६७ पासून ते २००० पर्यंत कार्यरत होते. विदर्भातील आठ धरणबांधणीत ते सहभागी होते. रेडियल गेट्समध्ये त्यांचा हातखंडा होता. पाटबंधारे खात्यात असताना, ‘उत्कृष्ट अभियंता’ असा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. कामातील प्रमाणिकता, विषयज्ञान, विषयाची व्यवस्थितपणे मांडणी, स्वतःचे परखड मत मांडणे, सरकारी खात्यात असूनसुद्धा स्वच्छ प्रतिमा, सर्वांबरोबर चांगले संबंध या सर्व गुणांमुळे बाबा बरेच वर्षं नागपूरमध्ये होते. ‘हिंदू युवा चेतना’तर्फे पू. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या वेळी नागपुरात युवक संमेलनात तिथली निवासव्यवस्था उभारण्याचं काम, एकात्मता यात्रा, श्रीरामजन्मभूमी रथयात्रा, रामशिलापूजन या कार्यक्रमात ते सहभागी होते.
 
पू. बाळासाहेबांच्या इच्छेनुसार सरस्वती शिशू मंदिर सुरू केलेलं. आज ४१ वर्षांनंतरसुद्धा नागपुरातील नंदनवन येथील हे मोठ्या दिमाखात व त्याच तत्त्वांवर उभं आहे. यावरूनच ती शाळा सुरू करण्याचा संकल्प किती स्पष्ट आणि शुद्ध होतं, हे स्पष्ट होते. शाळारूपी प्रकल्प सुरू करणे, त्याचे संगोपन व वाढ करणे, त्यासाठी आयुष्यातला बराच वेळ देऊनसुद्धा यावर आपला कधीच आणि काहीच अधिकार न सांगणे, उलटपक्षी अगदी सहजपणे ती शाळा सर्व समाजाची आहे, ही मान्यता जनसामान्यांमध्ये निर्माण करणे व संघविचारांवरच सुरू झालेल्या केशवनगर सांस्कृतिक सभेशी शाळेला संलग्न करणे आणि ठरवलेले कार्य संपल्यावर त्यातून कुठलाही अहंकार न बाळगता बाहेर येणे, हे त्यांनी अगदी सहजपणे केलं. हे दिसायला काही जगावेगळं नव्हतं किंवा सोपंदेखील नव्हतं. परंतु, मोठमोठ्या लोकांनासुद्धा जे साधलं नाही, असं अवघड काम ते सहजतेने करू शकले. नागपुरातील नंदनवन कॉलनी ही तर त्यांची कर्मभूमीच. १९७८-१९७९ मध्ये संघासाठी एकंदरीतच खूप अनुकूल वातावरण नव्हतं. अशा काळात बाबा, डॉ. गौतमकाका, ढवळेकाकांनी नंदनवनमध्ये संघशाखा सुरू केली. समाजाला एकत्र आणण्यासाठी नवतरुणांना हाताशी घेऊन कोजागिरी, मकरसंक्रांती, संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन, गोकुळाष्टमीची भव्य शोभयात्रा आदी उपक्रम राबवले. सातत्य हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण आणि या सातत्याचं महत्त्व आम्हाला आज पटत आहे.
 
श्रीरामजन्मभूमी आंदोलन हा बाबांच्या आयुष्यातला एक मोठा प्रवास होता. १९९०-१९९१ साली नागपूरला झालेल्या एका मोठ्या संत संमेलनात त्यांच्या बऱ्याच संत-महंतांशी गाठीभेटी झाल्या. आंदोलनाचे प्रमुख सूत्रधार पू. अशोकजी सिंघल यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. श्रीराम मंदिरमुक्तीसाठी नागपूरला तसेच नाशिकला १६ सोमवारचे व्रत करण्याचे आवाहन केले. अंदाजे ६०० जणांनी हे व्रत करून समाजामध्ये सुलभ वातावरण तयार केले. आईबाबांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नागपूर सोडून, नाशिकला स्थलांतर. पुन्हा एकदा हा त्यांचा निर्णय सोपा वाटतो. पण, विचार केल्यावर, असं जाणवलं की, अख्ख्या आयुष्यात त्यांनी नागपुरात नाव, सन्मान, प्रतिष्ठा कमावली होती आणि आता जेव्हा त्याची स्वादिष्ट फळं चाखायची वेळ आली, त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, तेथील सर्व प्रलोभनांचा त्याग केला आणि लगेच नाशिकला आले. बाबा म्हणत की, आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे केवळ घरदार सोडून हरिभक्तीत लीन होणं नव्हे, तर कार्यक्षेत्री आपल्याला मिळणाऱ्या आदराची, पुरस्काराची, सन्मानाची, अपेक्षा न ठेवता वेळीच त्याग करून निघून जाणे, हाच असावा, हे बाबांच्या जीवनाकडे बघून आम्हाला जाणवते.
 
बाबांनी नाशिकमध्ये चार ठिकाणी सायंशाखा सुरू केल्या. नियमितपणे संघ स्थानावर दिसायचे ते फक्त राष्ट्रकार्याच्या प्रेरणेमुळेच. पुनरुत्थान विद्यापीठाच्या स्थापनेपासून बाबांचा मोठा वाटा होता. बाबांचा आयुष्यातील हा शेवटचा दीड वर्षांचा टप्पा आम्हा सर्वांना आठवणीत राहणारा आहे. छोटे स्वयंसेवक बंगल्याच्या अंगणात ध्वज लावायचे, प्रार्थना म्हणायचे. बाबा खिडकीतूनच प्रणाम करायचे. नित्यक्रम सव्वा वर्ष असाच सुरू होता. शारीरिक स्थिती बरीच वेगात ढासळत होती. पण, त्यांची कार्याची कळकळ वाढतच होती. दीड वर्ष अंथरुणावर असूनसुद्धा एकदाही चेहऱ्यावर त्रास दिसला नाही. पुढ्यातल्या आयुष्याला हसतमुखानेच सामोरे जायचे आम्हाला आपल्या कृतीतून शिकवले. बाबांची नित्यसेवा करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं ते म्हणजे आम्हाला एका योग्याची सेवा करण्याइतकंच आहे. श्रीरामजन्मभूमीचा निकाल आल्यावर बाबांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. त्याचा बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यालायक होता. कदाचित, बाबांनी आपली इतिकर्तव्यता आता पूर्ण झाली हे भगवंतांना सांगितलं असावं.
 
दि. २२ डिसेंबर, २०१९ सफाला एकादशीला बाबांचे परममित्र ढवळे काका व सौ. काकू, सायंकाळी घरी आलेत आणि त्यांना भेटून सर्वांनी संघ प्रार्थना म्हटली. घरातील सर्व मंडळी त्यांच्याजवळ असताना, काही हरिभक्त आपल्या घरी एकादशीच्या निमित्ताने श्रीमद्भागवताचे वाचन करत असताना बाबा अत्यंत तृप्ततेने आणि शांततेने हा इहलोक सोडून निजधामाला निघालेत. त्या दिवशी घरात एक शांतता होती. पण, ती भयाण नव्हती. एक दुःखाची झालर होती. पण, रुदन नव्हतं. बाबांची कमतरता होती. पण, त्यांचं अस्तित्वही जाणवत होतं.
- अभय फडके 
@@AUTHORINFO_V1@@