२०२० मध्ये वाघांच्या शिकारीत महाराष्ट्र देशात पहिला

08 Jan 2021 21:12:36

tiger_1  H x W:


देशात १०० हून अधिक वाघांचा मृत्यू 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतामध्ये २०२० सालामध्ये विविध कारणांमुळे १०० हून अधिक वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'नुसार (एनटीसीए) गेल्यावर्षी देशात १०६ वाघांचा, तर 'वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडिया' (डब्लूपीएसआय) या संस्थेनुसार १०९ वाघांचा मृत्यू झाला आहे. 


'डब्लूपीएस'च्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांच्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. मध्यप्रदेशमध्ये २०२० सालात ३१ वाघांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र २०, कर्नाटक १२, उत्तरप्रदेश १०, केरळ ८ आणि तामिळनाडू राज्यात ८ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील ३० वाघांची शिकार झाली असून २०१९ च्या तुलनेत (३८)शिकारीमुळे मृत्यू पावणाऱ्या वाघांच्या संख्येत घट झाल्याचे डब्लूपीएसने म्हटले आहे. 'एनटीसीए'नुसार वाघांच्या मृत्यूंची संख्या मध्यप्रदेश २९, महाराष्ट्र १६ आणि कर्नाटक १२ अशी आहे. 


'डब्लूपीएसआय'च्या आकडेवारीनुसार ३८ वाघांचा इतर वाघांशी झालेल्या लढाईत मृत्यू झाला, २८ मृतावस्थेत आढळले, सहा वाघांचा उपचार किंवा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला, चार वाघांचा इतर प्राण्यांबरोबर झालेल्या लढाईत, तर तीन वाघ रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले. वाघाच्या शिकारीची सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रातून (९) नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश ६ आणि कर्नाटकचा ४ क्रमांक आहे. भारतामध्ये २,९६७ वाघांचा अधिवास आहे. जगात आढळणाऱ्या ७० टक्के वाघांची संख्या भारतामध्ये आहे.

Powered By Sangraha 9.0