'गो-विज्ञान' शेती क्षेत्रासाठी नवी नांदी

08 Jan 2021 17:48:06

cow science_1  


केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना केली होती. हा आयोग केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. गायी आणि गोवंशाचा विकास, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे. याच आयोगानं २५ फेब्रुवारी रोजी देशभरात गायींवर आधारित एक परीक्षा आयोजित केलीय.


तर जाणून घेऊया या परीक्षेची प्रक्रिया नेमकी काय?

प्रक्रिया सांगताना आयोगानं म्हंटलंय की केंद्रीय शिक्षणमंत्री, राज्यांचे शिक्षणमंत्री, सर्व राज्यांच्या गौ-सेवा आयोगांचे अध्यक्ष, जिल्हा शिक्षण अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि गायींचे देणगीदार आदींना या कार्यात सहभागी करून घेण्यात येईल.परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

या परीक्षेत कोण सहभागी होऊ शकणार ? 


कामधेनू आयोगाने सांगितल्याप्रमाणे या परीक्षेत चार प्रवर्गांतील परीक्षार्थींसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाईल. यातील तीन प्रवर्ग हे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा शैक्षणिक स्तरांनुसार करण्यात आलेत तर चौथा प्रवर्ग सर्वसाधारण जनतेसाठी आहे.तसेच पाचवा प्रवर्ग आंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी असणार आहे. इंग्रजीसह ही परीक्षा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे. आता परीक्षा म्हणली की अभ्यास आलाच. तर ही परीक्षा पूर्णत: बहूपर्यायी असून परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम कामधेनू आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलाय. परीक्षेसाठी नावनोंदणीदेखील तुम्ही या संकेतस्थळावर करू शकता.याशिवाय आणखी काही ब्लॉग पोस्ट्स, व्हिडिओज तसेच इतर साहित्य प्रसिद्ध केले जाईल असंही आयोगानं सांगितलंय.या मजकुरामध्ये गायींविषयीची सर्वसमावेशक माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय. जसे की, वेदांमध्ये नमूद करण्यात आलेले गायीचे महत्त्व, प्राचीन ग्रंथांमध्ये आलेले गायींचे उल्लेख, गायी मानवजातीसाठी देत असलेली पाच मोठी योगदाने (दूध, तूप, दही, गोमूत्र आणि शेण), गायींना अधिक चांगले अन्न कसे दिले जाऊ शकते, त्यांची अधिक चांगली काळजी कशी घेतली जाऊ शकते, भारतात किती प्रकारच्या गायी आहेत आणि त्या कुठे आढळतात याबद्दलची आणि आणखी बरीच माहिती यामध्ये देण्यात आली आहे.



ही परीक्षा नेमकी कशासाठी ?

शेती विषयक अर्थशास्त्रात पाळीव पशूधनाचे महत्त्व तसेच गोवंशाचे महत्त्व टिकवून वाढविणे, हा कामधेनू राष्ट्रीय आयोगाचा मूळ हेतू आहे. मजबूत अर्थव्यवस्थेचे स्वप्ने पाहात वाटचाल करत असताना आपली शेतीप्रधान संस्कृती आणि शेतीची अर्थव्यवस्था समजावून घेणे आवश्यक आहे. यासाठी शेतीपूरक व्यवसाय व दुग्धउत्पादनातील गोवंशाचे महत्त्व यावर भर देण्यात राष्ट्रीय कामधेनू आयोग पुढाकार घेऊन कार्यक्रम राबवत आहे. या परीक्षेचा मूळ उद्देश तरुण विद्यार्थ्यांमध्ये आणि इतर नागरिकांमध्ये गायीविषयी जनजागृती करणे असून या परीक्षेमुळे गायींबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढेल. बहुतेक लोकांना माहित नसलेल्या गायींच्या क्षमतेबद्दल त्यांना माहिती देण्यात येईल. गाईने दूध देणे बंद केले तरीसुद्धा अन्य अनेक प्रकारे ती शेतीपूरक व्यवसायात किती संधी देऊ शकते हे लोकांना कळू शकेल.' असं आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरीया यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0