पुढील ३० वर्षे मुंबापुरीची तुंबापुरी?

08 Jan 2021 12:28:07
mumbai rain_1  



पाणी तुंबणार्‍या ३८६ ठिकाणांवर उपाययोजना करणार


मुंबई: मुंबईत पाणी तुंबले कुठे, भरतीमुळे साचले, अशी बाजू महापौर किशोरी पेडणेकर यांनी सावरून नेली असली, तरी पाणी साचून मुंबईची तुंबापुरी होऊ नये, यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढील ३० वर्षांचे नियोजन ठेवून अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. त्यामुळे पुढील ३० वर्षांत मुंबईकरांची पूरपरिस्थितीतून सुटका नाही हेच अधोरेखित झाले. आदित्य ठाकरे यांनी शहरातील वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय यावर चर्चा करण्यासाठी गुरुवार, दि. ७ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेमध्ये बैठका घेतल्या. यावेळी पुढील ३० वर्षांत मुंबईमध्ये होणार असलेले संभाव्य बदल अधिकार्‍यांसमोर ठेवून चर्चा केल्या.



मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन सुरू केले आहे. पाणी तुंबू नये, यासाठी मिनी पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. प्रशासनाने पाणी तुंबणार्‍या ३८६ ठिकाणांचा शोध घेतला आहे. इंजिनियरच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत यातील जास्तीत जास्त ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. “मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टी आणि समुद्राला भरती असताना अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. गेल्या काही वर्षांत मुंबईत होणार्‍या अतिवृष्टीमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत,” असे आदित्य यांनी सांगितले.




तसेच, पूरनियंत्रण या महत्त्वाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, “मुंबईत भूमिगत टाक्या बांधण्यात येणार आहेत. पूरपरिस्थिती निर्माण होताच समुद्राला भरती असताना पावसाचे पाणी टाक्यांमध्ये साठविले जाणार आणि ओहोटी सुरू होताच ते पाणी समुद्रात सोडण्यात येणार, अशी ही योजना आहे. हिंदमातासारख्या नेहमीच पाणी तुंबणार्‍या ठिकाणी विशेष नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनचे काम लवकरच सुरू होणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनच्या कामासाठी आपण स्वत: केंद्र सरकारकडे परवानगीसाठी पाठपुरावा करणार,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.





Powered By Sangraha 9.0