अखेर ट्रम्प नमले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

Donald Trump_1  
अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या गोंधळांने संपूर्ण जगाला हादरा दिलाय. अमेरिकन लोकशाहीच प्रतिक समजलं जाणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केला.या घडामोडी नेमक्या काय? आणि ट्रम्प समर्थकांच्या या गोंधळांनंतर अमेरिकेतील परिस्थिती नेमकी काय ? आणि जगभरातील नेत्यांच्या या घटनेवरील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया.
३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूका झाल्या होत्या. बायडन यांना ३०६ तर ट्रम्प यांना २३२ मते मिळाली होती. समोर पराभव दिसत असतानाही ट्रम्प यांना तो मान्य नव्हता. दारुण पराभव झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भडकाऊ ट्विटनंतर अमेरिकेत हिंसाचार उसळला. या सगळ्याला आता ट्रम्प यांना जबाबदार धरलं जातं आहे. त्यांचा मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप आहे. याविरोधात ते अमेरिकेतल्या कोर्टातही गेले. पण, कोर्टानंही त्यांना फटकारलं आणि ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. आणि ट्विटरवरुन सतत आपली मतं मांडत राहिले. ६ जानेवारी रोजी अमेरिकेतील स्थानिक वेळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एरिजोना राज्यातील इलेक्टोरल मतदानाच्या मुद्यावर चर्चा सुरू होती. दरम्यान बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणाही केली जाणार होती. पण, त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, ज्यामुळं संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. पहिले ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर एकच गोंधळ घातला. नंतर या समर्थकांनी इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि समर्थकांमध्ये चकमक झाली. क्षणार्धातच या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. या हिंसक आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय.अनेक ट्रंप समर्थकांकडे शस्त्रंही होती. ट्रंप समर्थकांनी इमारतीच्या खिडक्या तोडल्या आणि पोलिसांच्या अंगावर ते धावूनही गेले.
राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले जो बायडन यांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय आणि संविधानाचे संरक्षण करण्याचं आवाहन मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केलं. या घटनेनंतर डीसीमध्ये उपस्थित अमेरिकन लष्कराने विशेष पथकाला बोलावलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी कॅपिटल हिल्सच्या आत आणि बाहेर कडेकोट पहारा आहे आणि राजधानी शहरात संचारबंदी लावण्यात आलीय. यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचं संयुक्त सत्र झालं ज्यात माईक पेन्स यांनी नॅन्सी पलोसी यांच्यासोबत बायडन यांच्या विजयाविषयीची घोषणा केली गेली. जो बायडन हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उप-राष्ट्राध्यक्ष असतील यावर अमेरिकन काँग्रेसन शिक्कामोर्तब केलंय. तर आपण सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असलो तरी या निवडणुकीच्या निकालांशी सहमत नसल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी यावेळीही म्हटलंय. २० जानेवारीला सत्तेचं सुरळीतपणे हस्तांतरण होईल असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान जागतिक राजकारणातूनही या घटनेवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालीय.या हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी निषेध व्यक्त केलाय. अमेरिकन नागरिकांनी शांतता बाळगावी असं आवाहन करत, कॅपिटल इमारतीवरचा हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं अनेक जागतिक नेत्यांनी म्हटलंय.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर म्हटलंय, "वॉशिंग्टन डीसीमधल्या दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्यांनी मी व्यथित आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण व्हावं. बेकायदेशीर विरोधामुळे लोकशाहीतल्या एका प्रक्रियेत अडथळा येता कामा नये." ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही हिंसाचारावर टीका केलीय.आपला लोकशाहीवर विश्वास असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांनी म्हटलंय.कॅपिटलमधला हिंसाचार चूक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही म्हटलंय.डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आलाय. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊण्ट बारा तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केलंय. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशाराही ट्विटरने दिलाय. यानंतर त्यांचा हा व्हिडीओ हटविण्यात आला आहे. ट्रम्प यांचा विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पक्षासह रिपब्लिकन पक्षानंही ट्रम्प यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी आधीच या घटनेला राजद्रोह म्हटलं आहे, त्यामुळं राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली ट्रम्प यांना अटकही होऊ शकते. आणि त्यांना राष्ट्रपतीपदावरुन पायउतार होताच जेलमध्येही जावं लागू शकतं. अमेरिकेच्या संसदेवर अशा प्रकारचा हल्ला गेल्या २०० वर्षात झालेला नाही. अमेरिकेला जगातील सर्वात मोठी लोकशाही समजलं जातं. शांततापूर्ण निवडणुका आणि मजबूत लोकशाही हीच अमेरिकेची आतापर्यंतची ओळख आहे. मात्र, या सगळ्याला ६ जानेवारीच्या घटनेनं मोठा धक्का बसला आहे.
@@AUTHORINFO_V1@@