अमेरिकेच्या संसदेवर हल्ला ! मोठा हिंसाचार : राजधानीत कर्फ्यू

    दिनांक  07-Jan-2021
|
Donald Trump_1  
 
 
 
 

डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटर आणि फेसबूकचा इशारा


वॉशिंग्टन : अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती निवडणूकांनंतर ज्या गोष्टीची चिंता होती तेच घडले आहे. अमेरिकेत हिंसाचार भडकला. जो बायडन हे जगातील सर्वात मोठ्या महासत्तेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत, असे ठरले होते. मात्र, ड्रम्प यांची आपली जिद्द अद्याप सोडलेली नाही. ते अद्याप हार मानायला तयार झालेले नाहीत. तसेच हिंसाचाराचीही धमकी दिली आहे.
निवडणूकीच्या ६४ दिवसानंतर जेव्हा अमेरिकेची संसद बायडन यांच्या विजयावर मोहोर लावणार तितक्यात अमेरिकेतील लोकशाही शरमली आहे.
 
 
 
 
ट्रम्प समर्थक दंगली करण्यास उतरले आहेत. तोडफोड करण्यात आली. हिंसाचार भडकवला. सीएनएन या इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात तीन जण मारले गेले. लष्कराच्या विशेष पथकाने दंगलखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कित्येक तासानंतर संसदेची कार्यवारी सुरू झाली आहे. "आम्ही निर्भिडपणे आमचे काम सुरू ठेवणार आहोत.", असे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी म्हणाल्या आहेत. बायडेन यांचा विजय आता निश्चितच आहे. केवळ राष्ट्रपतीपदाची औपचारिक घोषणा होणे शिल्लक आहे.
 

 
 
काय आहे संपूर्ण वाद ?
 
३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती निवडणूका झाल्या होत्या. बायडन यांना ३०६ तर ट्रम्प यांना २३२ मते मिळाली होती. पराभव दिसत असतानाही ट्रम्प यांनी तो मान्य केलेला नाही. त्यांचा आरोप आहे की मतमोजणी करत असताना घाईगडबड झाली आहे. कित्येक राज्यांमध्ये या प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. ट्रम्प समर्थकांच्या या खटल्यांच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. दोन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका खारीज केल्या आहेत. निवडणूक प्रचारातही ट्रम्प यांनी हिंसाचाराच्या धमक्या दिल्या होत्या. बुधवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांना ट्रम्प यांचा हा डाव कळला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
 


 
मृतांच्या आकड्यात वाढ ?
 
 
अमेरिकेच्या संसदेबाहेर आणि तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सकाळपर्यंत येत होती. वॉशिंग्टन डीसीचे पोलीस अधिकारी रॉबर्ट कॉन्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल एमर्जन्सीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. मृ़तांमध्ये दोन पुरूष व एका महिलेचा सामावेश आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनाने मात्र, या घटनेला दुजोरा दिलेला नाही. वृत्तसंस्थेने मृतांचा आकडा हा चार असल्याचे म्हटले आहे.
 


 
पंतप्रधान मोदींनी केले ट्विट
 
 
अमेरिकेत झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, "वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या हिंसाचार आणि दंगलीमुळे मी व्यथित आहे. सत्ता हस्तांतरण प्रक्रिया शांतीपूर्ण आणि नियोजित पद्धतीने व्हायला हवी. लोकशाहीच्या प्रक्रीयांवर चुकीच्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाचा प्रभाव यावर पडायला नको."
 

 
संसदेतही ट्रम्प पिछाडीवर
 
 
एरिझोना आणि पेन्सिलव्हेनियामध्ये बायडन यांच्या विजयाविरोधात आव्हान देणाऱ्या ट्रम्प यांचा विरोध फेटाळून लावण्यात आला. एरिझोनाच्या प्रकरणामुळे हा वाद जास्त वाढत चालला. पहिल्यांदा सीनेटमध्ये येणाऱ्या निवडणूकांवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर इथे हा आक्षेप फेटाळून लावल्यानंतर प्रकरण 'हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हस'कडे गेले. इथेही ही मागणी फेटाळण्यात आली. सीनेटमध्येही ट्रम्प यांचा पक्ष तोंडावर आपटला. प्रस्तावाविरोधात सहा विरुद्ध ९३ इतके मतदान झाले. पेन्सिलव्हेनियाला पाहून रिपब्लिकन खासदार जो हॅले यांनी आधीच म्हटले होते की आम्ही मतमोजणीविरोधात आक्षेप घेणार आहोत. मात्र, त्यांनाही समर्थन मिळालेले नाही.
 
 
 
 
 
 
ट्रम्प यांनी समर्थकांना भडकावले
 
रिपब्लिकन पक्षाचे सीनेटर मिट रोमनी यांनी या घटनेनंतर प्रकरणाची निंदा केली. माझी मान शरमेने खाली जात आहे की राष्ट्रपतींनी दंगेखोरांना संसदेत घुसण्यासाठी भडकावले. लोकशाहीत पराभव स्वीकारण्याची हिंम्मत हवी. दंगेखोरांना मी इशारा देऊ इच्छितो कि त्यांनी आता सत्य स्वीकारायला हवे. मी आमच्या पक्षातील सहकाऱ्यांना ही विनंती करेन की लोकशाही टीकवण्यासाठी आता पुढे यायला हवे. याच मध्यावर ट्रम्प यांच्या कॅबिनेटच्या काही सदस्यांनी एक महत्वाची बैठक बोलावली असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबद्दल अधिकृतपणे कुठलीही अधिकृत घोषणा दिलेली नाही.
 

 
कॅपिटल हिलमध्ये हिंसाचार
 
बुधवारी इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी आणि बायडन यांच्या विजयावर मोहोर लावण्यासाठी अमेरिकन संसदेची दोन्ही सदने सीनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह यांची बैठक सुरू झाली. याच दरम्यान, ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शेकडो समर्थकांनी संसदेच्या बाहेर गर्दी केली. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि पोलीस त्यांची समजूत काढतील यापूर्वीच काही लोक आत घुसले. तोडफोड केली. हिंसाचार केला. या दरम्यान गोळीबारही झाला. गोळी कुणी चालवली का चालवली याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, एका महिलेचा यात मृत्यू झाला. दोन्ही सदनांमध्ये हल्ला करणाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. खासदारांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. त्यानंतर संसदेची कार्यवाही सुरू आहे.
 
 
 
 
 
 
 
ट्रम्प यांची सर्वात मोठी फजिती
 
प्रेसिडेंट इलेक्ट विजयावर मोहोर लावण्यासाठी अमेरिका संसदेच्या संयुक्त सत्राचे आयोजन करण्यात येते. याचे अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. यावेळी माईक पेंस उपस्थित होते. पेंस रिपब्लिकन पक्षाचे आहेत. ट्रम्प यांच्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो. ट्रम्प समर्थकांच्या कृत्यांमुळे तेही नाराज दिसले. हा अमेरिकेच्या लोकशाहीतील काळा दिवस आहे, लोकशाहीवर दबाव टाकला जाऊ शकत नाही. अमेरिकेच्या जनतेच्या विश्वासाचे हे सर्वात मोठे केंद्र होते आणि राहील.
 
 
 
 
 
संसदेत गोळीबार
 
'न्यूयॉर्क टाइम्स'तर्फे एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ट्रम्प समर्थक संसदेत हिंसाचार करत होते. त्यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनी दंगेखोरांना शांत करण्यासाठी बंदुक रोखली होती. त्यानंतर एक गोळी चालली त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा मृत्यू पोलीसांनी केलेल्या गोळीबारामुळे झाला की आणखी कोणी गोळी चालवली याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.
 
 
 
लष्कराचे गार्ड तैनात
 
घटनेनंतर डीसीमध्ये उपस्थित अमेरिकन लष्कराने विशेष पथकाला बोलावले. २० मिनिटांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणली. आता ११०० विशेष रक्षक तिथे उपस्थित आहेत. कॅपिटल हिल्सच्या आत आणि बाहेर कडेकोट पहारा आहे आणि राजधानी शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.
 
 
 
फेसबूक ट्विटरने केले ट्रम्प यांना ब्लॉक
 
वॉशिंगटन शहरात घडलेल्या घटनेचा एक व्हीडिओ फेसबूकने हटवला आहे. ट्रम्प या व्हीडिओतून समर्थकांना चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचे दिसून येत होते. फेसबुकच्या उपाध्यक्षांनी म्हटले की, यामुळे हिंसाचाराला आळा बसण्यास मदत होईल. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट सस्पेंड करून टाकले आहे.