मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणार : काँग्रेस

06 Jan 2021 17:33:21

bhai jagtap _1  



मुंबई :
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही वॉर्डमध्ये १०० दिवसांचा रिव्ह्यू प्लॅन केला असून वॉर्डनिहाय रिव्ह्यू करणार आणि एकटं लढण्याचा आमचा निर्णय ठाम असल्याचंही भाई जगताप यांनी अधोरेखित केले आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्याची मागणीही या निमित्ताने काँग्रेसने केली आहे. मनपाच्या तिजोरीवर केवळ १६८ कोटींचा बोजा पडणार असला तरी मोफत पाणी देणं गरजेचं असल्याचंही मतही भाई जगतापांनी व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचेच नेते नसीम खान यांनीही मुंबई महापालिकेचा सर्व २२७ जागांवर आम्ही निवडणूक लढणार असल्याचं याआधीच स्पष्ट केले आहे. येत्या काळात काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढेल. गेल्या अनेक काळापासून शिवसेना आणि भाजपकडे महापालिकेची सत्ता होती. त्यामुळे रखडलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच, असंही नसीम खान म्हणाले. राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांना निधी मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच सोनिया गांधींना हस्तक्षेप करावा लागल्याचंही खान म्हणाले. मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असंही खान यांनी सांगितलं.
Powered By Sangraha 9.0