रा.स्व.संघाच्या समन्वय बैठकीला अहमदाबादमध्ये सुरुवात

05 Jan 2021 17:22:31

rss_1  H x W: 0



श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या कामासाठी लोकसहभागाचे आवाहन




अहमदाबाद: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांमध्ये कार्यरत असणार्‍या कार्यकर्त्यांच्या तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठकीस मंगळवार दि. ५ जानेवारीपासून कर्णावती (अहमदाबाद) येथे सुरुवात झाली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी ५ ते ७ या तीन दिवसांच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीची माहिती दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह सुरेश उपाख्य, भैय्याजी जोशी, संघाचे अखिल भारतीय अधिकारी आणि संघप्रेरित विविध २५ संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, महामंत्री आणि संघटन मंत्री, काही निवडक कार्यकर्ते, तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका, सहसंचालिका या बैठकीस आमंत्रित आहेत. वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र जी खराडी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नवे अध्यक्ष छगनभाई पटेल, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भारतीय मजदूर संघाचे हीरेनभाई पांड्या, राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका वं. शांताक्का, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय आयोजक तामिळनाडूचे के. आर. सुंदरम्, विद्याभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राम कृष्ण राव या बैठकीत सहभागी होत आहेत.



या बैठकीत सुमारे १५० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी एका आव्हानात्मक परिस्थितीतून संपूर्ण जगाला जावे लागले. आव्हान मोठे असले तरी प्रसन्नतेची बाब म्हणजे या परिस्थितीतही भारताने उल्लेखनीय आणि अनुकरणीय उदाहरण जगापुढे ठेवले. संघ तसेच विविध संघटनांनी या कालखंडात समाजासाठी यथाशक्ती जे योगदान दिले, वर्षभरात कशा स्वरुपाचे कार्य केले त्याची समीक्षा केली जाईल, माहिती-अनुभव एकमेकांना सांगितले जातील. या प्रतिकूल परिस्थितीत संघटनांनी आपले कार्य सुरू ठेवले व परिस्थितीच्या मर्यादेमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला. या कालखंडात संघटनांची व्याप्ती वाढली असून कार्यविस्तार झाला असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. अनुवर्तनात अनेक योजना तयार करण्यात आल्या. त्याची माहितीही यावेळी सगळ्यांसमोर मांडण्यात येईल. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या लक्षात आले की एवढ्या मोठ्या कार्यात समाजाचे योगदान आवश्यक आहे. त्या दृष्टीने न्यासाने समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या धन योगदानातून हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने घराघरात लोकांशी संपर्क केला जावा असे आवाहन केले आहे.



Powered By Sangraha 9.0