वाघांच्या राज्यात कासवांची सुटका; मुक्ततेसाठी स्टार कासवांचा ठाणे ते ताडोबा प्रवास

05 Jan 2021 21:09:14
turtle _1  H x



तस्करीत सापडलेल्या कासवांना जीवदान


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबई आणि ठाणे वनपरिक्षेत्रात वन्यजीव तस्करीच्या वेगवेगळ्या प्रकरणांमधून ताब्यात घेतलेल्या स्टार कासवांची पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली आहे. ठाणे वन विभागाच्या माध्यमातून एकूण ७० इंडियन स्टार कासवांची रवानगी 'ताडोबा राष्ट्रीय उद्याना'त करण्यात आली आहे. यामधील काही कासवांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली असून काही दिवसांनी उर्वरित कासवांना सोडण्यात येईल. 
गेल्या वर्षभरात वन विभाग, केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ आणि वन्यजीव संरक्षण संस्थां मुंबई-ठाण्यातून वन्यजीवसंबंधी तस्करीची प्रकरणे उघकीस आणली. यामधील बहुतांश प्रकरणामधून स्टार प्रजातींच्या कासवांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणांमधून ताब्यात घेतलेल्या ७० कासवांना डायघर येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवून त्यांची देखभाल सुरू होती. मात्र, निसर्गात मुक्तता करण्याच्या हेतूने ठाणे वन विभागाने त्यांची रवानगी ३ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये केली आहे. विभागाने यापूर्वी २०१८ मध्ये तस्करीच्या माध्यमातून पकडण्यात आलेल्या ७३४ कासवांना कर्नाटकातील बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यानात सोडले होते. मात्र, तोडाबा व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्रांमध्ये स्टार कासवांचा अधिवास आढळल्याने ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या आदेशानुसार ७० कासवांची रवानगी ताडोबामध्ये करण्यात आली. 



turtle _1  H x
ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांच्या 'राॅ' संस्थेच्या मदतीने वन्यजीव रुग्णवाहिकेमधून ३ जानेवारी रोजी या कासवांना घेऊन ठाणे ते ताडोबा प्रवास करण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी रोजी 'ताडोबा राष्ट्रीय उदयाना'चे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगांवकर यांच्या उपस्थितीत ७० मधील २१ कासवांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली. उर्वरित कासवांना चंद्रपूरमधील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे. सोडलेल्या २१ कासवांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन उरलेल्या कासवांना सोडण्यात येईल. हे कार्य वनपाल मनोज परदेशी, वनमजूर संतोष भागणे, राॅ चे पवन शर्मा आणि नेमीन सावडिया यांनी पार पाडले.


turtle _1  H x

स्टार कासवांविषयी 
स्टार प्रजातीचे कासव भारतात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि कर्नाटक राज्यात आढळतात. स्टार कासव पाळल्याने आर्थिक भरभराट होते, या अंधश्रद्धेपोटी त्यांची देशात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. भारतीय ’वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत स्टार कासव संरक्षित आहेत. मात्र, तस्करीच्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात या जीवांना मोठी मागणी असल्यामुळे देशातून त्यांची छुप्या मार्गाने तस्करी होते. म्हणूनच 'सायटीस'ने या कासवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीवर बंदी आणली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0