पंजे काढून बिबट्याला विहिरीत टाकले; गोंदियातील घटना

04 Jan 2021 12:27:43
leopard _1  H x


समोरील पायाचे पंजे गायब

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव वनपरिक्षेत्रात रविवारी विहिरीत पडलेल्या बिबट्या आढळून आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला विहिरीबाहेर काढल्यानंतर त्याचे पंजे गायब असल्याचे दिसले. त्यामुळे बिबट्याची शिकार करुन त्याला विहिरीत टाकल्याचे उघड झाले आहे.


गोरेगाव वनपरिक्षेत्रातील इंदिरानगर, तिल्ली मोहेगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या मृतअवस्थेत आढळून आला. विहिरीतील पाण्यात बिबट्या तरंगत असल्याची माहिती वन विभागाला समजल्यावर गोरेगाव वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. प्राथमिक पाहणीवरुन बिबट्या विहिरीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. मालापुरे आणि डाॅ. विवेक गजरे यांच्या उपस्थितीत बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यावेळी वनधिकाऱ्यांना धक्का बसला. कारण, या बिबट्याचे पुढील पायाचे पंजे गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर वनधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका निलगायीचे डोके आणि पाय कुजलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आढळले. पंजे गायब असणारा बिबट्या नर जातीचा होता. त्याची शिकार करुन पंजे काढून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला विहिरीत टाकल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

Powered By Sangraha 9.0