बोरिवली नॅशनल पार्कमध्ये कोल्हेकुई; मिळाला पहिलाच छायाचित्रीत पुरावा

04 Jan 2021 19:16:44
jackal_1  H x W


नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात दर्शन

मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये कोल्हेकुईची नोंद झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उद्यानातील नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्यांचे दर्शन झाले. वन विभागाला कोल्ह्यांची छायाचित्रे टिपण्यास यश मिळाल्याने राष्ट्रीय उद्यानात कोल्ह्यांचा अधिवास असल्याचा पहिलाच छायाचित्रीत पुरावा मिळाला आहे. 
 
 
 
 
कोल्ह्यांचा वावर जंगल, गवताळ प्रदेश, कांदळवन, शेत जमिनी आणि शहरी अधिवासातही आढळतो. मु्ंबईत प्रामुख्याने कांदळवनांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे. विक्रोळी, नवी मुंबई, पूर्व उपनगरातील गोराई - मनोरी आणि अंधेरी लोखंडवाला भागातील कांदळळवन आसपासच्या परिसरात कोल्ह्यांचा वावर समोर आला आहे. वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांनी याठिकाणांहून जखमी कोल्ह्यांचा बचावही केला आहे. मात्र, प्रथमच बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात कोल्ह्यांच्या वावराचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमधून यापूर्वी जखमी कोल्ह्याचा बचाव करण्यात आला होता. तसेच अनेकांनी या परिसरात कोल्ह्यांच्या वावराची नोंद केली होती. परंतु, राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कोल्ह्याच्या अधिवासाचा छायाचित्रित पुरावा टिपण्यात आला नव्हता. 
 
 
 
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय उद्यानाच्या नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्याचा वावर कॅमेऱ्यात टिपण्यात आला. २३ डिसेंबर रोजी नागला वनपरिक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये कोल्ह्याचे छायाचित्र टिपल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्याचदिवशी तुळशी वनपरिक्षेत्रातही कोल्ह्याचे दर्शन झाले. तुळशी वनपरिक्षेत्रात गस्तीच्या दरम्यान गाडीच्या समोरून जाणाऱ्या कोल्ह्याचा व्हिडीओ वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कोल्ह्यांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वर्सोवा खाडीपलीकडे राष्ट्रीय उद्यानाचे १ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर परसलेले नागला वनपरिक्षेत्र आहे. कांदळवनाला लागून हे परिक्षेत्र असल्याने कांदळवनांमधूनच हा कोल्हा याठिकाणी आल्याची शक्यता पवार यांनी वर्तवली. मात्र, तुळशी वनपरिक्षेत्रात दिसलेल्या कोल्ह्याविषयी अंदाज बांधणे कठीण आहे. 
 

२०१५ पासून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या परिक्षेत्रात सातत्यपूर्ण कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात येत आहे. मात्र, प्रथमच आम्हाला राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कोल्ह्याचे छायाचित्र टिपण्यात यश मिळाले आहे. तुळशी आणि नागला वनपरिक्षेत्रातही कोल्हा आढळून आला आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील कोल्ह्याच्या वावराचा हा पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे. - जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक - संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

Powered By Sangraha 9.0