विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष आता उपराजधानीत

    दिनांक  04-Jan-2021
|

nagpur vidhanbhavan_1&nbs
सर्वच स्तरातून या निर्णयाचे उस्फुर्तपणे स्वागतनागपूर: विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष आज सोमवार दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवन येथे कार्यान्वित होणार आहे. नागपूर हे अगोदर राजधानीचे शहर असल्यामुळे येथे विधानभवनाची सुंदर वास्तू, आमदार निवास, मंत्री बंगले संकूल (रवी भवन), कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी १६०/०२ खोल्यांचे गाळे अशी सर्व व्यवस्था तयार आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहराचे सौंदर्य, रुंद रस्ते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भौगोलिक दृष्ट्या देशात या शहराचे बरोबर मध्यवर्ती असलेले स्थान यामुळे नागपूरात विधानमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष सुरु व्हावा, तसेच लोकसभेतील ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडीज अँड ट्रेनिंग (BPST) चे एक केंद्र कार्यान्वित व्हावे, अशी यामागची संकल्पना आहे.विधानभवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या नव्याने कार्यान्वीत करण्यात येत असलेल्या या कक्षामध्ये २ उप सचिव, २ अवर सचिव, २ कक्ष अधिकारी, २ सहायक कक्ष अधिकारी, ४ लिपिक-टंकलेखक आणि ४ शिपाई असा अधिकारी / कर्मचारी वर्ग असेल. यापुढील काळात विधानभवन, नागपूर येथे विधीमंडळ समित्यांच्या बैठका देखील आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे या विभागातील दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना अधिवेशना अगोदर प्रश्न, लक्षवेधी येथे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सन्मानीय सदस्य, त्यांचे स्वीय सहाय्यक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी-सदस्य, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थांमार्फत येणारे अभ्यासगट यांच्यासाठी विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण उपक्रम येथे राबविले जाणार आहेत. त्यामुळे एरव्ही फक्त अधिवेशन काळात वर्षभरात एक महिना वर्दळ असणारी विधानभवनाची वास्तू व परिसर आता मा.पीठासीन अधिकारी यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वर्षभर गजबजलेला राहील.
विधानपरिषदेचे नागपूर येथील सन्माननीय माजी सदस्य प्रकाश गजभिये यांनी विधानभवन नागपूर येथे अशाप्रकारे कायमस्वरुपी कक्ष सुरु करण्यासंदर्भात मागणी करुन पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांची संकल्पना आता प्रत्यक्षात येत असल्याने त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांचे विदर्भातील जनतेच्यावतीने आभार मानले आहेत. समतोल विकासाचे उद्दिष्ट्य डोळयासमोर ठेवून नागपूर येथील विधानभवनात कायमस्वरूपी कक्ष कार्यान्वीत करण्याचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल यात शंका नाही.