गिर्यारोहक निलेश माने यांनी कर्जत विभागातील इर्शाल गड सर करून ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ भारतीय ध्वजाचे ध्वजतोरण गडाच्या माथ्यावर फडकवले. त्यांनी ही मोहिम भारतीय संरक्षण दलातील सैनिकांना आणि जगभरातील ‘कोविड योद्ध्यां’ना समर्पित केली आहे. आज माने यांच्या गिर्यारोहण छंदाविषयीच जाणून घेऊया.
माने हे कल्याणमधील कोळसेवाडी येथे राहतात. ते मूळचे सांगली येथील नागाव निमनी या गावचे आहेत. पण त्यांचे बालपण कल्याणमध्येच गेले. त्यांचे शालेय शिक्षण गणेश विद्यामंदिर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांचे वडील रवींद्र ज्ञानदेव माने हे लष्करामध्ये सैनिक होते. महाविद्यालयात असतानाच त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे भारतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय आणि शारीरिक चाचणी यात ते ‘परफेक्ट’ होते. पण काही कारणास्तव त्यांना सैन्यात जाता आले नाही. पण त्यांच्यात जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी कायम होती. सैन्यात जाता आले नसले तरी त्यांनी पुढे जाऊन ‘ट्रेकिंग’ करण्याचा निर्णय घेतला. माने यांची खरी प्रेरणा त्यांचे वडील रवींद्र माने आणि भाऊ राहुल माने आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आसनगावपासून काही अंतरावर असलेला माहुली किल्ला ट्रेकिंगसाठी निवडला. माहुली किल्ला सर करणं हा पहिला भटकंती ट्रेक होता. ट्रेकिंगची फारशी कल्पना नसल्यामुळे त्यांची खूप दमछाक झाली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी ‘एनसीसी’चे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचा हा अनुभव या ट्रेकिंगमध्ये उपयोगी पडला. माने यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र सुरज सुतार होता. त्या दोघांनी दोन दिवसीय ट्रेकिंगची पूर्ण तयारी केली होती. ट्रेकिंगसाठी लागणारी अत्यावश्यक सामग्रीही त्या काळात त्यांच्याकडे नव्हती. ट्रेकिंगसाठी वापरण्यात येणारे ‘टेंट’ही नव्हते. त्यांनी वाटेतील जाड बुंधा बघून काठ्या घेतल्या होत्या. त्यांनी सोबत प्लास्टिक शीट, मच्छरदाणी आणि इतर साहित्य घेऊन संपूर्ण माहुली किल्ला चढून ‘टेंट’ उभे केले. त्यांनी रात्रीचा स्वयंपाक चूल पेटवून बनवला. स्वत: चुलीवर बनविलेले जेवण आणि ‘टेंट’मध्ये झोपण्याचा वेगळा आनंद त्यांनी अनुभवला. या ट्रेकिंगनंतर त्यांचा गिर्यारोहणातील खरा प्रवास सुरू झाला. माने व त्यांचा मित्र सुरज यांनी दोघांनी मिळून पुढे अशा अनेक ट्रेक केल्या.ट्रेकिंग करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी कोणाचा पाय मुरगळला, कुठे बॅगचा बंध तुटला या समस्यांवर ते मात करीत होते. पण २०१७ हे त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. याच वर्षात त्यांनी स्वत:चा ‘सुपर ट्रॅव्हल’ हा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय आठवड्याचे सर्व दिवस आणि २४ तास खुला असतो. याशिवाय त्यांना सिव्हील क्षेत्रात नोकरी मिळाली. नोकरी मिळाली तरी त्यांनी आपला छंद जोपासण्याचे काम कायम ठेवले आहे.
ट्रेकिंगचा प्रवास पुढे वाढतच गेला. एक आणि दोन दिवसीय गड, किल्ले, सुळके अशा अनेक घाटवाटा, धबधबे, सह्याद्रीतील ट्रेक ते आयोजित करत होते. कित्येकदा त्यांना ट्रेकिंगसाठी घरातून विरोध होत होता. दुसरी काही कामं नाही का, असे त्यांना घरातून ओरडत. पण माने यांनी आपली ट्रेकिंगची आवड कायम जोपासली. मलंगगड, माहुली, गोरखगड, भैरवगड, राजमाची, ब्रह्मगिरी, कर्नाळा, हडसर, तिकोना, नाणेघाट, पेब (विकटगड), नागफणी रॅपलिंग, प्रबळगड, कलावंती दुर्ग, हरिश्चंद्र गड पाचनई मार्गे, हरिहर, देवकुंड धबधबा, लोणार लेणी (कल्याण), ढाक बहिरी, लिंगाणा अत्यंत कठीण सुळका, तैलबैल सुळका, डांग्या सुळका, साल्हेर, सालोटा, पदरगड, अशेरीगड, चाहू सुळका, श्रीवर्धन, मनरंजन, कळसुबाई, हरिश्चंद्र गड खिरेश्वर मार्ग, इर्शाल गड, आजोबागड, पाबरगड असे अनेक किल्ले त्यांनी सर केले.
माने यांची भटकंती वाढत गेली, तसे नवनवीन मित्रही भेटत गेले. त्यामध्ये वैभव ऐवळे (मुंबई), पराग चिल्लारे (जुन्नर), रोहित हिवाळे (नाशिक), रवी झडे (रतनगड), सुरज सुतार (पुणो) ओंकार जाधव (कल्याण) यांचा समावेश होता. आपण ज्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला जात असतो, त्या गड-किल्ल्यांवरील लोकांना आपण काही देणे लागतो ही सामाजिक भावना माने यांच्या मनात आली. यातून माने, वैभव ऐवले आणि सुरज सुतार यांनी समन्वय ही गिर्यारोहण आणि सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी ‘ती आणि तिचे चार दिवस’ (मासिक पाळी जनजागृती), आदिवासी पाड्यातील महिला-मुलींना सोबत मैत्रिणींना घेऊन सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले. लहान मुलांमध्ये शारीरिक क्षमता वाढावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकोटांचा इतिहास कळावा, या उद्देशाने ‘बालदिन विशेष मोहिम’ राबविण्यात आली. दिवाळीनिमित्त फराळ वाटप, महिला दिन विशेष मोहीम, नववर्ष उपक्रमात ‘रद्दीपासून समृद्धीकडे’ हा उपक्रम घेण्यात आला. आपल्याजवळ असणार्या साड्या, ड्रेस जे आपण वापरत नाही, पण ते वापरण्यासारखे आहेत ते कपडे गरजूंना देऊन एक सामाजिक भावना जपण्याचे काम माने यांनी केले आहे. आपले प्रयत्न कधीच थांबवायचे नसतात. सह्याद्रीमध्ये भटकंती सुरू असताना त्यांना संधी मिळाली ती, हिमालयाला गवसणी घालण्याची आणि त्यांनी त्या संधीचे सोनेही केले. १५ ऑगस्ट, २०१९ रोजी युरोपातील सर्वोच्च शिखर (माऊंट एलब्रुस) त्यांनी सर केले. ज्याची उंची १८ हजार ५१० फूट, वातावरण उणे दहा अशी थंडी. भारताच्या ७३ व्या स्वातंत्र दिनानिमित्त त्यांनी ७३ भारतीय ध्वजांचे ध्वजतोरण फडकावले आणि राष्ट्रगीत म्हणून साजरे केले.
कल्याण येथील एका सामान्य कुटुंबातील माने यांचा गिर्यारोहण क्षेत्रात कामगिरी करताना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक क्षमतेचा कस लागत होता. त्यांना कल्याणमधील अनेक राजकीय , सामाजिक क्षेत्रांतील लोकांनी मदत केली. ‘इनके्रडीबल बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. त्यांना समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. जगातील सात खंडांतील सर्वोच्चशिखर सर करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांना शारीरिक क्षमतेसोबतच आर्थिक पाठबळाची गरज लागणार आहे. माने यांना जीवनात सह्याद्रीसोबत हिमालयातील गिरी-शिखरे सर करायची आहेत. तसेच समाजातील गरजूंना सर्वतोपरी मदत करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताचे नाव संपूर्ण विश्वात उंच करायचे आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
- जान्हवी मोर्ये