देशाला लवकरच कोरोनावरील तिसरी लस मिळणार ; पुनावाला यांचे संकेत

30 Jan 2021 16:56:20

adar poonawala_1 &nb



पुणे :
देशात सर्वात आधी सीरमच्या कोविशील्ड लसीला परवानगी मिळाली. सीरमने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्याने कोविशील्ड लस तयार केली आहे. देशात सध्या ही लस वापरली जात असून त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत.

यंदाच्या वर्षात जून महिन्यात सीरम कोरोनावरील दुसरी लस लॉन्च करेल, अशी माहिती पुनावाला यांनी ट्वट करून दिली आहे. या लसीला मान्य दिल्यास ती देशातील तिसरी कोरोना लस ठरेल. 'सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून २०२१ मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा आहे,' असं पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्याच्या घडीला पुणेस्थित सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसींचा वापर देशात सुरू आहे. कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादस्थित भारत बायोटेकनं भारत वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीच्या सहकार्यानं केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय आहे. तर कोविशील्ड लसीसाठीचे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाने केले आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचे उत्पादन करत आहे.
Powered By Sangraha 9.0