संशोधक नारळीकर

    30-Jan-2021
Total Views |

Dr Jayant Naralikar_1&nbs
 
 
 
 
येत्या मार्चमध्ये नाशिकमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली. डॉ. नारळीकरांनी आपले वैज्ञानिकपण जोपासतानाच मराठी भाषेत विज्ञानविषयक लेखनाला चालना दिली. सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांनी विज्ञानपोहोचवले. पण मराठी साहित्यात भरीव योगदान देणाऱ्या जागतिक कीर्तीच्या डॉ. जयंत नारळीकर यांच्यातील संशोधक, वैज्ञानिक नेमका कसा घडत गेला, याचा आढावा या लेखात घेतला आहे.
डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९ जुलै, १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वि. वा. नारळीकर हे बनारस येथील बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक असल्याने जन्मानंतर जयंतरावांचे सगळे वास्तव्य बनारसमध्ये झाले. त्यांचे शालेय शिक्षण हिंदी माध्यमातून झाले. त्यांनी बी. एस्सीसुद्धा बनारसहूनच केले. बनारस विद्यापीठात प्राध्यापक लोकांना राहायला बंगले असल्याने जयंतरावांचे १९३८ ते बी.एस्सी होईपर्यंतचे म्हणजे १९५७ पर्यंतचे १९ वर्षांचे वास्तव्य विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणात झाले. वडील प्राध्यापक असल्याने घरात नाना तर्‍हेच्या पुस्तकांचा गराडा असे. आई सुमतीबाई संस्कृत विषयातील एम.ए. होत्या. त्यांना आणि वडिलांनाही संस्कृतची आवड असल्याने आईने जयंतरावांचे अनेक संस्कृत श्लोक, सुभाषिते, भगवद्गीता, रामरक्षा पाठ करून घेतले होते. जयंतरावांचे दोन मामा संख्याशास्त्रज्ञ वसंतराव हुजूरबाजार आणि गणितज्ज्ञ मोरेश्वर हुजूरबाजार (मोरुमामा) हे एम. एस्सी. करायला बनारसला त्यांच्या घरी राहायला होते. दोघांनाही एम. एस्सीला पहिले आल्याबद्दल ‘चॅन्सेलर्स गोल्ड मेडल’ मिळाले होते. मोरुमामा त्यांच्याकडे असताना जयंतराव आठवी इयत्तेत होते. मोरुमामा घरच्या फळ्यावर जयंतरावांसाठी ‘उहरश्रश्रशपसश झीेलश्रशा षेी गतछ‘ म्हणून रोज एक गणित लिहित आणि ते गणित जोपर्यंत सोडवले जात नसे, तोपर्यंत ते फळ्यावरून पुसले जात नसे. त्या काळी फारशी हॉटेल्स नव्हती आणि लोक प्राध्यापकांच्या घरीच उतरत. त्यात परीक्षेसाठी येणारे जागोजागच्या विद्यापीठातील प्राध्यापक जसे असत तसे महाराष्ट्रातून आलेले, ना. सी. फडके, अनंत काणेकर, मा. दा. आळतेकर, पु. ल. देशपांडे, दीनानाथ दलाल, गायक नारायणराव व्यास, रँग्लर र. पु. परांजपे, सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. डी. देशमुख हेसुद्धा असत. वडील विष्णुपंत १९२८ साली केम्ब्रिजला जाऊन गणितातील स्टार (डिस्टिंक्शन) रँग्लरची परीक्षा तर उत्तीर्ण झाले होतेच. पण, त्यांना संशोधनातील ‘रॅले प्राईझ’ आणि ‘आयझॅक न्यूटन स्टुडंटशिप’ मिळाली होती. या सर्व शैक्षणिक वातावरणाचा जयंतरावांच्या मनावर एक अनुकूल परिणाम होत होता.
 
१९५७ साली जयंतराव ‘जे. एन. टाटा’ स्कॉलरशिप मिळवून केम्ब्रिज विद्यापीठात गणितातील रँग्लरची परीक्षा (ट्रायपॉस) देण्यासाठी गेले. तेथील वातावरणाशी जुळवून घेत ते या परीक्षेत उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. पूर्वी या परीक्षेत प्रथम वर्गात पहिला कोण आला, दुसरा कोण, अशी नावे तर जाहीर करतच असत, शिवाय दुसऱ्या वर्गात कोण उत्तीर्ण झाले, तिसऱ्या वर्गात कोण, हे सगळे जाहीर होत असे. पण, १९०० सालाच्या बेताला केम्ब्रिजमध्ये खासगी क्लासेसचे पेव फुटले होते व ते याचा दुरुपयोग करत असल्याने परीक्षा समितीने फक्त उत्तीर्ण झालेल्यांची नावे आणि तीसुद्धा अकारविल्हेदी जाहीर करायला १९०९ सालापासून सुरुवात केल्याने आपण नेमके कसे उत्तीर्ण झालो, हे जयंतरावांना समजले नाही. तरी त्यांनी आपल्या ट्यूटरला विचारले की, “माझा गुणवत्ता यादीत कितवा क्रमांक आला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?” ते किंचित स्मित करून म्हणाले. “हो, मला ते कळवण्यात आले. पण, मी ते तुला सांगू शकत नाही. मी, इतकेच म्हणतो की तुला त्यात सुधारणा करणे शक्य झाले नसते.” पण, आपण त्यात पहिले येऊ असे त्यांना वाटत होते आणि ती बातमी कोणीतरी केम्ब्रिजच्याच वेबसाईटवर २०१५ साली फोडल्याचे जयंतरावांना समजले होते आणि ते पहिले आले होते. त्या अर्थाने ते सिनियर रँग्लर आहेत. २०१५ साली त्यांनी मला मुंबईच्या रुईया कॉलेजात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी हे कानात सांगितले होते. पहिल्या वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला सिनियर रँग्लर म्हणतात. आपल्याकडे १८९९ साली र. पु. परांजपे असे ‘सिनियर रँग्लर’ झाले होते. दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रँग्लर न म्हणता ‘सिनियर ऑप्टीमे’ आणि तिसऱ्या वर्गात उत्तीर्ण होणाऱ्यास ‘ज्युनियर ऑप्टीमे’ म्हणतात.
 
रँग्लरच्या परीक्षेसाठी ट्रायपॉसच्या दोन भागातील परीक्षा द्याव्या लागत. त्या झाल्यावर जयंतरावांनी आपल्या वडिलांसारखी तिसऱ्या भागाची परीक्षाही दिली आणि त्यानंतर त्यांना खगोलविज्ञानाबद्दल विशेष गोडी असल्याने त्यात संशोधन करायची इच्छा झाली म्हणून त्यांनी तिसऱ्या भागासाठीही खगोलविज्ञान हाच विषय निवडला. हा विषय निवडण्यामागे फ्रेड हॉईल यांची ‘नेचर ऑफ द युनिव्हर्स’ आणि ‘फ्रन्टियर्स ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉमी’ ही लिहिलेली दोन पुस्तके आणि विद्युत्चुंबकीय शास्त्रावरील व्याख्याने देत असता फ्रेड हॉईल खगोलशास्त्रावरील एखादी आकर्षक चुणूक दाखवत या गोष्टी कारणीभूत होत्या. त्यातूनच पुढे आपल्याला खगोलशास्त्रावर संशोधन करण्यासाठी फ्रेड हॉईल हे मार्गदर्शक लाभले तर हवे, असे जयंतरावांना वाटू लागले. या तिसऱ्या भागातील परीक्षेत जयंतरावांना १९६० साली डिस्टिंक्शन मिळाले व खगोलशास्त्रात ते सर्वोत्तम ठरल्याने त्यांना ‘टायसन मेडल’ मिळाले. १९३० साली त्यांच्या वडिलांनाही हे मेडल मिळाले होते. १९३० नंतर हे मेडल कोणाही भारतीयाला मिळाले नव्हते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर आता पीएच. डी.साठी खगोलशास्त्रात संशोधन करायचे असून आपल्याला फ्रेड हॉईल यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यावर त्यांना ते मिळाले. फ्रेड हॉईल यांनी पीएच. डी.साठी जयंतरावांना चार-पाच विषय सुचवले. जयंतरावांना फ्रेड हॉईल यांच्या स्थिरस्थिती सिद्धान्तावर काम करायचे होते. मग फ्रेड हॉईल यांनी जयंतरावांना प्रख्यात खगोलशास्त्रज्ञांचे निबंध वाचायला सांगितले. सापेक्षता सिद्धान्तावरची व्याख्याने त्यांना ऐकायला मिळाली. विश्व प्रसरण-आकुंचन-प्रसरण-आकुंचन अशा स्थितीत दोलन करत राहील. विश्वाच्या प्रसरणकालात विश्वाचा आकार लहान असताना न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या कणांचे संघटन होऊन त्यातून विविध रासायनिक मूलद्रव्यांची निर्मिती होईल. तसेच आकुंचनाच्या काळात या प्रक्रिया उलट्या दिशेने मूलद्रव्यांचे न्यूट्रॉन-प्रोटॉन कणात विघटन घडवून आणेल का? या प्रश्नाचे उत्तर जयंतराव शोधत असताना त्यांना असे दिसून आले की, ज्या हेकमान आणि शुकिंग या जर्मन शास्त्रज्ञांनी भिरभिरणाऱ्या विश्वाची कल्पना मांडली त्याप्रमाणे विश्व भिरभिरतच नाही. तेव्हा जयंतरावांनी एक समाधानकारक विश्व प्रतिकृती शोधली. त्यातून हेकमान आणि शुकिंग यांचा दावा चुकीचा ठरतो, असा शोध जयंतरावांना लागला. हा दावा फ्रेड हॉईल यांनाही पटला.
 
फ्रेड हॉईल यांचा जो स्थिर स्थितीचा सिद्धान्त होता त्याप्रमाणे, विश्व प्रसरण पावते आणि प्रसरणामुळे अस्तित्त्वात असलेल्या पदार्थाची घनता कमी होते. तरी नव्या पदार्थाच्या सर्जनामुळे विश्वाची एकंदर घनता स्थिर राहते. जुन्या वयस्कर आकाशगंगा कालानुसार आपल्यापासून दूर जातात. पण, त्यांची जागा नव्याने निर्माण झालेल्या पदार्थातून तयार झालेल्या नव्या आकाशगंगा घेतात. पुढे त्या वाढत्या वयामुळे दूर जातात असा हा क्रम सतत चालू राहतो. याचा अर्थ विश्वाची आज जेवढी घनता आहे, तेवढीच दहा अब्ज वर्षांपूर्वी होती आणि त्यामुळे विश्वाची घनता दहा अब्ज वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा ती आता कमी झाली आहे, हा विश्वाच्या महास्फोट रचनेचा सिद्धान्त चुकीचा ठरतो. पण पाश्चात्त्य देशातील लोकांना अनादी-अनंत विश्वापेक्षा एका ठरावीक वेळी जन्मलेल्या विश्वाची कल्पना अधिक भावते. ही कल्पना ज्युडो-ख्रिश्चन-इस्लाम धर्माने मांडली असल्याने राईल नावाच्या खगोलवैज्ञानिकाने मांडलेल्या याच कल्पनेला खूप प्रसिद्धी मिळाली. राईल यांनी यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला फ्रेड हॉईल यांना निमंत्रित केले होते.
 
तेव्हा फ्रेड हॉईल यांना राईल यांनी कोणत्या विषयासाठी ही पत्रकार परिषद बोलावली आहे हे माहीत नव्हते, त्यामुळे त्यांनी राईल यांना उत्तर दिले नव्हते. पण, नंतर राईल हा सिद्धान्त रॉयल सोसायटीत मांडणार होते, तेव्हा फ्रेड उत्तर देणार होते. दुर्दैवाने त्याच वेळी फ्रेड यांना लंडन युनिव्हर्सिटीच्या एका कॉलेजात भाषण द्यायचे असल्याने ते काम जयंतरावांनी करावे व दहा मिनिटांत उत्तर द्यावे, असे त्यांनी जयंतरावांना सांगितले. राईल यांचा सिद्धान्त चुकीचा आहे, यासाठी एक प्रतिकृती दाखवायचे फ्रेड यांच्या मनात होते आणि त्यासाठी गणिताचा आधार द्यायचा होता. ते काम त्यांनी जयंतरावांवर सोपवले. जयंतरावांनी ते गणित सोडवले आणि फ्रेड हॉईल यांना दाखवले. ते गणित पक्के आहे, हे फ्रेड हॉईल यांनी पाहून मंजूर केले. रॉयल सोसायटीत राईल यांनी भाषण दिले आणि मग जयंतराव आठ मिनिटे बोलले. राईल यांनी आव्हान द्यायचा प्रयत्न केला. पण, “तुम्ही आमचे गणित तपासून पाहा आणि निवाडा करा,” असे जयंतराव म्हणाल्यावर राईल निरुत्तर झाले. पुढे जॉड्रेल बँक वेधशाळेत जाऊन जयंतराव आणि फ्रेड हॉईल यांनी हॅनबरीबरोबर केलेल्या निरीक्षणात त्यांना क्वेसार बघायला मिळाले. जयंतराव रॉयल ग्रीनिच ऑब्झर्वेटरीमध्ये गेले असता, तेथील ग्रंथालयात त्यांचे काम चालू होते. जर विश्वात सर्जन होत राहिले, तर विश्व आरंभी कसेही असले तरी नव्या सर्जनामुळे त्यात नियमितता येते आणि म्हणून आजचे विश्व सर्व दिशांना सारखे दिसते. जयंतरावांचा हा निष्कर्ष त्यांनी रॉयल सोसायटीच्या सभेतही मांडला आणि याच्या आधारे त्यांनी ‘स्मिथ्स प्राईझ’साठी अर्ज केला. १९६२ साली त्यांना हे प्राईझ मिळाले. तत्पूर्वी १९२६ साली हे प्राईझ रँग्लर ग. स. महाजनी यांना मिळाले होते. जयंतरावांना हे प्राईझ मिळाले हे जेव्हा महाजनी यांना समजले, तेव्हा ते म्हणाले, “मला ते १९२६ साली मिळाले, तुला २६ मधील आकड्यांची उलटापालट करून ६२ साली मिळाले.”
 
राईल यांच्यासारखे अनेक निरीक्षक वेगवेगळी निरीक्षणे करतात व वेगवेगळे निष्कर्ष काढतात, यासाठी या सर्व निरीक्षणांच्या आधारे संगणकावर काल्पनिक विश्व निर्माण करून वेधांची तुलना करता येईल. मग हे काम जयंतरावांनी आयबीएम कंपनीच्या संगणकावर केले. जयंतरावांनी आपले काम विद्युतचुंबकीय शास्त्राव्यतिरिक्त निसर्गातील इतर बलांना लागू पडते का ते पाहायचे ठरवले. त्यावेळी त्यांनी ब्राईस दविट आणि त्याचा विद्यार्थी ब्रीम यांनी विकसित केलेले गणित वापरले. ते वापरून दुरून एकमेकांवर प्रभाव टाकणाऱ्या पदार्थांच्या कणांचा आराखडा रचणे त्यांना शक्य झाले. त्यामुळे त्यांना माखच्या जडत्वाच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देता आले. जडत्व हा पदार्थाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे कुठल्याही वस्तूच्या वेगात बदल करण्यासाठी तिच्यावर बलाचा वापर करावा लागतो. एखाद्या वस्तूला विश्वातल्या दूरस्थ पदार्थाच्या पार्श्वभूमीशी जोडून तो कसा व्यक्त होतो, हे सूत्र यातून जयंतरावांना मिळाले. त्यातून त्यांना गुरुत्वाकर्षणाचा एक सिद्धान्त मिळाला, जो व्यापक सापेक्षतेपेक्षाही अधिक व्यापक होता.
 
१९६४ मध्ये हा स्थिरस्थितीचा सिद्धान्त हॉईल-नारळीकर सिद्धान्त म्हणून जगप्रसिद्ध झाला आणि जयंतराव एकदम प्रकाशात आले. त्यानंतर त्यांनी १९६५ साली भारतात एक मोठा व्याख्यानदौरा केला. जयंतरावांनी नंतर १९७२ पर्यंत केम्ब्रिजमध्ये राहून संशोधन केले व मग ते मुंबईत येऊन ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये ‘सैद्धांतिक भौतिकशास्त्रा’चे प्राध्यापक झाले. या काळात जयंतराव आपल्या संशोधनाबरोबर पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. अजित केंभावी आणि टी. पद्मनाभन हे त्यांचे तेथले विद्यार्थी. या संस्थेतील १९७२ ते १९८८ या १६ वर्षांच्या काळात जयंतरावांचे परदेशी व्याख्यानांचे, संशोधनांचे आणि अध्यापनांचे दौरे अखंड चालू होते. जॉर्ज सुदर्शन यांच्याबरोबर प्रकाशावेगाची मर्यादा मागे टाकून त्याहून अधिक वेगाने धावणाऱ्या टॅकिऑन कणांचा प्रसरणशील विश्वाच्या पार्श्वभूमीवर अभ्यास करून जयंतरावांनी जॉर्ज सुदर्शन यांच्याबरोबर संयुक्तपणे निबंध लिहिला. जयंतरावांनी चार-पाच वर्षे याचा अभ्यास केला. पुढे संजीव धुरंधर यांनी याच विषयावर जयंतरावांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. जेफरी बरबिज यांच्याबरोबर जयंतरावांनी आर्पच्या निरीक्षणावर संशोधन केले. नंतर या विषयावर त्यांनी व त्यांचा विद्यार्थी प्रशांत दास यांनी एक प्रबंध लिहिला. कृष्णविवराची निर्मिती मोठ्या वस्तुमानाच्या ताऱ्यांच्या आकुंचनातून होते. या उलट श्वेतविवर म्हणजे, स्फोटातून वाढत जाणाऱ्या आकाराचा तारा. कृष्णविवराचे आकर्षण प्रकाशाला खेचून घेते म्हणून ते काळेकुट्ट असते. हे संशोधन जयंतराव व नरेश दधीच (जयंतरावांनंतर दधीच ‘आयुका’चे संचालक झाले.) यांनी केले. त्यांच्या या संशोधनामुळे, श्वेतविवर अति प्रकाशवान असतात, असे सिद्ध होत होते. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ व नंतर ‘आयुका’त असताना परग्रहावरून धूमकेतूच्या माध्यमातून आलेल्या जीवजंतूंमुळे पृथ्वीवरची सृष्टी निर्माण झाली आहे का यावरच्या संशोधनात जयंतराव व्यग्र होते. केम्ब्रिज येथील वास्तव्य आणि जगभरच्या दौऱ्यांमुळे जयंतराव ई. एम. फॉस्टर हे साहित्यिक आणि चंद्रा विक्रमसिंघा, स्टीव्ह हॉकिंग, रॉजर पेनरोज हे सहकारी आणि फ्रेड हॉईल, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, जॉर्ज सुदर्शन, विक्रम साराभाई, मार्गारेट आणि जेफरी बरबिज, हरमन बॉण्डी, जॉन क्लेद पेकेअर, रिचर्ड फाईनमन, फॉक, पॉल डीरॅक, इव्हानेंको, पेट्रोव्ह, योर्दान, व्हीलर, मोलर, डिकी, मॅक्रे, शिल्ड, इन्फेल्ड यासारखे खगोलशास्त्रज्ञ यांच्या संपर्कात आले आणि त्याचा त्यांना अभिमान आहे.
 
१९८८ साली विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. यशपाल यांच्या आमंत्रणावरून जयंतराव पुण्याला गेले आणि त्यांनी ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ उर्फ ‘आयुका’ या खगोलशास्त्रातील संशोधन संस्थेची स्थापन केली. येथे या विषयात पीएच. डी. करण्यासाठी विद्यार्थी घेतले जातात. शिवाय येथे खगोलशास्त्रातील संशोधन केले जाते. जयंतराव या संस्थेचे १९८८ ते २००३ अशी १५ वर्षे संचालक होते आणि या काळात त्यांनी ‘आयुका’ला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. त्यांच्या या १५ वर्षांच्या काळात खगोलशास्त्रावर १०० परिसंवाद झाले आणि तेवढेच परदेशी खगोलशास्त्रज्ञ येऊन गेले. पुणे विद्यापीठाच्या आवारातील वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोरिया याने बांधलेली ही इमारत बघण्यासारखी आहे. येथे आठवड्यातून एक दिवस शालेय विद्यार्थी येऊन खगोलशास्त्रातील भाषणे, कार्यशाळा वगैरे गोष्टींचा लाभ घेऊन जातात. या आवारात बांधलेल्या चंद्रशेखर (सुब्रह्मण्यम) सभागृहात केवळ ‘आयुका’चेच कार्यक्रम होतात असे नसून पुण्यातील हे एक आकर्षक सभागृह म्हणून नावाजले गेले आहे. ‘आयुका’त जयंतराव प्रशासन पाहत, स्वत:चे संशोधन करीत, पीएच. डी.च्या मुलांना मार्गदर्शन करीत, स्वत:चे परदेशदौरे करीत, भारतात अनेक ठिकाणी भाषणे देत आणि विज्ञानकथा साहित्य लिहित.
 
जयंतरावांना परदेशाची अनेक पारितोषिके तर मिळालीच. पण, ते २६ वर्षांचे असताना १९६५ साली त्यांना भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला, त्यानंतर २००३ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मिळाला. त्याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, पुण्याचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार, पंतप्रधानांचे सल्लागारपद, असे अनेकानेक पुरस्कार मिळाले असून पारितोषिकांचा ओघ अजूनही चालूच आहे. जयंतरावांच्या पत्नी मंगलाताई या गणितज्ज्ञ असून त्यांनी केम्ब्रिज, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि पुणे विद्यापीठ येथे गणितात संशोधन व अध्यापन केले आहे. आवड म्हणून त्या झोपडपट्टीतील मुलांनाही गणित शिकवतात. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळातील गणित विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी बरेच ललित लेखनही केले आहे. त्यांच्या तीन कन्या, गीता, गिरिजा आणि लीलावती या सर्व विज्ञानातील पीएच. डी.धारक असून विवाहित आहेत. आता, वयाच्या ८२ व्या वर्षीही जयंतराव आपल्या सर्व प्रकारच्या कार्यात मग्न आहेत.
 
संदर्भ : चार महानगरातले माझे जीवन - जयंत विष्णू नारळीकर - मौज प्रकाशन गृह, २०१२
 
- अ. पां. देशपांडे
(अक्षरागंध, दिवाळी, २०२०च्या सौजन्याने)