पक्षीवेडा अर्णव !

03 Jan 2021 20:13:35

Arnav Patwardhan_1 &
 
 
 
अर्णव अमरेंद्र पटवर्धन या चिमुकल्याला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला आहे. आता कोणताही पक्षी दिसला की त्यांची माहिती तो सांगू शकतो. या चिमुकल्याच्या या छंदाविषयी जाणून घेऊया...
 
 
 
अर्णव हा चंद्रकांत पाटकर विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला पक्षीनिरीक्षणाचा व पक्षीविषयक अभ्यासाचा अनोखा छंद जडला. अर्णवला अगदी लहानपणापासून पक्षी आणि प्राण्यांची आवड होतीच. अर्णवची आई अर्चना आणि वडील अमरेंद्र यांनादेखील निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला आवडते. त्यांच्यासोबत अर्णवही असायचा. निसर्गाच्या सान्निध्यात फिरता फिरता अर्णवमध्ये निसर्गाविषयी आणि पक्षीनिरीक्षणाची आवड वाढत गेली.
 
 
 
'लॉकडाऊन'च्या काळात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे शहरी भागात येणार्‍या पक्ष्यांची संख्या वाढली होती. घराच्या गच्चीतून आणि खिडकीतूनही नेहमीपेक्षा वेगळे पक्षी दिसायला लागले होते. अर्णवने या सर्वच पक्ष्यांना आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्यास सुरूवात केली. 'लॉकडाऊन'च्या काळात अनेक लहान मुलांना घरात बसून काय करायचे, असा प्रश्न पडला होता. खेळायलाही बाहेर जाता येत नव्हते. त्यामुळे त्यांना घरात कोंडल्यासारखे होत होते. अर्णवने मात्र कोरोना काळातील 'लॉकडाऊन'कडे एक संधी म्हणून पाहिले. 'लॉकडाऊन'च्या काळात आपल्या घराच्या खिडकीतून आणि गच्चीतून जे पक्षी दिसतील, त्यांना आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यास सुरूवात केली. त्यामुळे अर्णवचा वेळही खूप छान जात होता. पक्षीनिरीक्षणाविषयी त्याच्यामध्ये अधिक सजगता येत होती. खिडकीतून आणि घरच्या गच्चीतून पक्षी दिसला, तर त्याचा फोटो काढून अर्णव त्यावर शांत बसला नाही. त्याने त्या पक्ष्यांची 'गुगल'वरून माहिती शोधण्यास सुरूवात केली. 'गुगल' आणि गरज पडेल त्यावेळी अर्णव काही पुस्तकांचाही आधार घेत होता. पण त्या पक्ष्यांची माहिती मिळाल्याशिवाय तो स्वस्थ बसत नव्हता. यातून त्याचा पक्षीनिरीक्षण विषयाचा अभ्यास अधिक सुरू होता. अगदी आपल्याला दररोज दिसणारे पोपट, चिमणी, कबूतर यांचेदेखील विविध प्रकार असतात, हे त्याला यातून समजले. त्यानंतर अर्णवने त्याला विविध ठिकाणी दिसलेल्या पक्ष्यांवर टिपणं काढायला सुरूवात केली.
 
 
'लॉकडाऊन'चे नियम शिथील होऊ लागले. त्याने आपल्या आई-वडिलांसोबत डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात जाण्यास सुरूवात केली. त्याने सातपूल परिसर, रेतीबंदर, कुंभारखाण पाडा, उंबार्ली टेकडी, भोपर परिसर, पडले गाव, मलंग रोड, गणेश घाट अशा विविध ठिकाणी पक्ष्यांचे फोटो काढले. त्यांची माहिती जमवून त्याने अभ्यास केला. त्याकरिता त्याने विविध पक्षीतज्ज्ञांच्या पुस्तकांचे वाचन केले. 'पक्षीकोश', 'पाणथळीतले पक्षी', 'द बुक ऑफ इंडियन बर्ड्स' अशी विविध पुस्तके त्याने वाचून काढली. आता कोणताही पक्षी दिसला की, त्याचे मराठी, इंग्रजी, त्याची जात-पोटजात, स्थलांतरित आहे की स्थानिक ही सर्व माहिती अर्णव चुटुकीसरशी सांगतो. अर्णवने त्याच्या वयाच्या मानाने पक्ष्यांविषयी मिळविलेले हे ज्ञान खरेच कौतुकास्पद आहे. डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील आतापर्यंत हळद्या, खंड्या, टकाचोर विविध प्रकारचे बगळे, पेंटेड स्टॉक, ओपनबिल स्टॉर्क, इंग्रेटस, हेरॉन्स विविध प्रकारच्या पाणकोंबड्या यामध्ये सहसा न आढळणारी जांभळी पाणकोंबडी, शिक्रा, ब्राह्मणी घार, घार, घुबड, ससाणा, बी-इटर्स इत्यादी विविध पक्ष्यांचे फोटो त्याने स्वत: काढले आहेत.
 
 
अर्णव त्याचा शाळेचा अभ्यास सांभाळून आपला छंद जोपासत आहे. अर्णवला पक्ष्यांविषयी आवड असल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याची उत्सुकता त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने तो अभ्यासही करीत आहे. डोंबिवलीमध्ये एखादे पक्षी संग्रहालय असावे, तसेच शालेय अभ्यासक्रमात निसर्ग, पर्यावरण, पक्षी-प्राणी यावर एखादी तासिका असावी, जेणेकरून लहान वयातच इतर मुलांनाही निसर्ग-पर्यावरण याविषयी आस्था निर्माण होईल, असे अर्णवला वाटते. तसेच डोंबिवली परिसरात जिथे-जिथे पक्षीनिरीक्षण करता येते, अशा ठिकाणी एखादे 'मचाण' असावे. शिवाय ही ठिकाणे अशीच निसर्गसंपन्न राहावीत, अशी त्याची मागणी आहे. तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात जिथे जिथे पक्षी आढळतात अशा ठिकाणी जाऊन पक्षीनिरीक्षणाचा व त्याविषयी अजून अभ्यास करण्याची त्याची इच्छा आहे. तसेच अर्णवला मोठेपणी याच क्षेत्राशी संबंधित विषयात करिअर करण्याचा मानस आहे. अर्णवच्या पुढील वाटचालीला दै. 'मुंबई तरूण भारत'कडून शुभेच्छा...!
 
- जान्हवी मोर्ये
 
 
 
Powered By Sangraha 9.0