भाजप आणि मनसे एकत्र आले तर...

26 Jan 2021 18:17:38

PRasad Lad_1  H
 
 
 
“ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी विविध व्यासपीठांवरुन वेळोवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व त्या पक्षांच्या नेत्यांवर टीकेचे आसूड ओढले, त्याच पक्षांशी शिवसेनेने आघाडी केली आणि हे तिन्ही पक्ष सत्तेत आले. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असे होऊ शकते, तर राज्यभरातील विविध निवडणुकांत भाजप आणि मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको. पण त्यावर आम्ही आताच काही बोलू शकत नाही,” असे भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष, विधान परिषद आमदार व वसई-विरार महानगरपालिकेचे प्रभारी प्रसाद लाड दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
 
वसई-विरार महापालिका प्रभारी म्हणून तुमची नियुक्ती भाजपतर्फे झाली आहे. तेव्हा वसई-विरारमध्ये कोणत्या मुद्द्यांवर भाजप निवडणूक लढवणार आहे?
 
 
भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवतो आणि महापालिका व इतर स्थानिक निवडणुकांच्या वेळी तिथे शिवसेना व इतर पक्षांमुळे सत्तेत येत नाही, हा प्रश्न वसई-विरारच्या जनतेला पडलेला आहे. मात्र, आम्ही यंदा सर्व ११५ जागा स्वबळावर लढणार आहोत. ही निवडणूक लढत असताना आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. वसई-विरारमध्ये दहशत आहे असे म्हणतात, पण देवेंद्र फडणवीस यांनी ती संपवली आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा, भ्रष्टाचाराचा मुद्दा, जमीन घोटाळे, पाणी, वीज तसेच बुलेट ट्रेन, असे कित्येक विषय प्रलंबित आहेत व या विषयांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना आम्ही किती ताकदवान आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक ‘भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष’ अशी आहे.
 
 
राज्यातील सत्ताधार्‍यांना खाली खेचू, असे सूचक विधान तुम्ही केले. यासाठी तुमची रणनीती नेमकी कशी असेल? तुमच्या या वाक्याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा?
 
 
मुंबई महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे संबंध होते, पण ते संबंध राजकारणाच्या पलीकडचे होते. बाळासाहेबांनंतर शिवसेना बदलली आहे. शिवसेनेचा आर्थिक स्रोत मुंबई महापालिका आहे. त्यांनी त्या ठिकाणी कोणतेही विकासाचे काम केलेले नाही. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबईतील सत्ताधार्‍यांना आम्ही पराभूत करू आणि भाजपच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहाराला प्रत्यक्षात आणू. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी जसे राज्यात काम केले होते. त्या प्रकारे या महानगरपालिकांमध्ये आम्ही काम करू.
 
 

नुकतीच तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात व सर्वसामान्यांमध्ये भाजप-मनसे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पाऊण तासाच्या भेटीत नेमके काय घडले?
 
 
राज ठाकरे आणि आमचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व सर्वोत्तम आहे. त्यांचा सर्व विषयांवर चर्चा करण्याइतका अभ्यास आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळते. जसे प्रमोद महाजन यांच्याशी चर्चा करताना वेगवेगळे विषय कळायचे, त्याचप्रकारे... राज ठाकरे यांच्या घरी गेलो की अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही राजकीय नेते आहोत, तेव्हा राजकारणावर चर्चा होणे साहजिकच. राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना जे विषय समोर आले, ते आता सध्या सांगू शकत नाही. सर्वांनी धीर धरला पाहिजे, पुढे पुढे पाहा काय होते आहे ते. युतीबाबत निर्णय घेण्याइतका मी मोठा नाही. मात्र, पक्षनेतृत्व याबाबत योग्य निर्णय घेईल. काही जबाबदारी मला दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडेन.
 
 
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जरी भाजप-मनसे एकत्र आले, तर अमराठी मतांचा मुद्दा आहे तो आपण कसा हाताळाल?
 
 
आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, पण त्यांची तत्त्वेदेखील कुठे पूर्वी एकसारखी होती? तरीही ते एकत्र आलेच ना! शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार विकले. ज्या बाळासाहेबांनी व्यासपीठावरुन वेळोवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली, ज्या पक्षांच्या नेत्यांना शिव्या दिल्या, त्याच पक्षांशी शिवसेनेने आघाडी केली आणि हे तिन्ही पक्ष सत्तेत आले. महाराष्ट्राच्या सत्तेसाठी असे होऊ शकते तर राज्यभरातील विविध निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको. आम्ही आताच काही बोलू शकत नाही. मात्र, राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन आमचे नेते निर्णय घेतील.
 
 
राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांवर केंद्र सरकारकडून ‘ईडी’मार्फत दबाव टाकला जात आहे, असा आरोप येथील नेते करतात. मात्र, तुम्हालादेखील एका प्रकरणी नोटीस आली होती, याकडे तुम्ही कसे पाहता?
 
 
२००९ सालचे ते प्रकरण होते, पण माझे नाव ‘एफआयआर’मध्येदेखील नव्हते. २०१९ मध्ये अचानक तक्रारदार उभा राहिला, माझे नाव त्यात घेतले, मला त्याबाबत नोटीसही आली. पण मी काहीही चुकीचे केलेले नाही किंवा काहीही गैर केलेले नाही. त्यामुळे मला त्याची भीतीच नाही. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांची ‘ईडी’ चौकशी करणार, असे नुसते समजले तरी ते केंद्र सरकार व भाजपला दोष देताना दिसतात. ‘ईडी’ एक स्वायत्त यंत्रणा आहे. जर तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला भीती कशाची वाटते? मला नोटीस आली. मी पोलिसांना जाऊन भेटलो. स्पष्टीकरण दिले. यापुढे काही कारवाई असेल, तर मी त्यातही सहकार्य करण्यास तयार आहे.
 
 
 
भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व, यात नेमका फरक काय?
 
 
शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाला दुहेरी तलवारीची धार होती. संजय राऊत यांनी हिंदुत्व शिकवू नये. संजय राऊत यांनी सत्तेसाठी शरद पवारांची लाचारी केली. उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींचे पाय धरायला लावले. भाजपने मात्र हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्रीरामांच्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी मंदिरासाठी अविरत संघर्ष केला, लढा दिला. त्याच माध्यमातून आता राम मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. संपूर्ण भारताला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. ठाकरे कुटुंबीयांच्या बाबतीत मात्र आम्हाला आदर आहेच.
 
 
महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र असेल, हे मोठे आव्हान पक्ष कसे झेलणार?
 
 
नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने सुमारे १३ हजार ग्रामपंचायतींमध्ये चांगले यश मिळवले, तर महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारल्याचे समोर आले. भाजपला सहा हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला. याचा अर्थच मुळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने केलेल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा होतो. महाविकास आघाडीतील पक्ष सत्तेसाठी एकत्र आले, तरी त्यांचे विचार एक होऊ शकत नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासमोर महाविकास आघाडीचे कोणतेही आव्हान नाही. मोदींना पराभूत करण्यासाठी २०१४ असो वा २०१९ ची निवडणूक, त्यावेळी २३ पक्ष एकत्र आले, पण नंतर काय झाले, हे सर्वांसमोर आहे. महाराष्ट्रातदेखील महाविकास आघाडीतील पक्षांनी आणखी उरल्यासुरल्या पक्षांनाही बरोबर घेतले, तरी भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही. भाजपची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0