
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ एन. एम. उपाख्य आप्पासाहेब घटाटे यांचे रविवारी दिल्ली येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. कायद्याच्या क्षेत्रातील जाणकार आणि अधिकारी व्यक्ती अशी त्यांची ओळख होती.
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ, राष्ट्रीय विधी आयोगाचे माजी उपाध्यक्ष एन. एम. उपाख्य आप्पासाहेब घटाटे यांचे २४ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते. गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
आप्पासाहेब घटाटे यांनी १९६० च्या दशकापासून देशाची राजधानी दिल्ली येथे वकिलीचे शिक्षण घेऊन कामास प्रारंभ केला होता. व्हि. के. कृष्ण मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिलीस प्रारंभ केला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खास मित्र होते. जनसंघ ते भाजपा या प्रवासाचेही ते साक्षीदार होते. कायद्यासह राजकीय क्षेत्राचेही ते मोठे अभ्यासक होते. त्यांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'साठी दिनांक २५ डिसेंबर, २०२० रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘अटल कार्यकर्ता, अटल नेता’ हा विशेष लेखही लिहीला होता.