ठाणे : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यामध्ये २९० केंद्रावर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यामध्ये शनिवार, दि. २३ जानेवारी रोजी सर्वात जास्त लसीकरण ठाण्यात झाले. एका दिवसात ४०० जणांना लस देण्याचे उद्दीष्ट असताना ठाणे मनपा क्षेत्रात तब्बल ७७३ जणांचे लसीकरण पार पडले. हे प्रमाण, १९३ टक्के इतके आहे. तेव्हा,सोमवारपासून दहा ठिकाणी एक हजार जणांना लस देण्याचा मानस ठामपा प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात ठाणे जिल्हयात २ हजार ३६६ आरोग्यसेवकांचे लसीकरण पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
संपुर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असुन ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक ७४ हजार लसींचा पुरवठा झाला. यामध्ये ठाणे महापालिकेला कोरोना लसीचे १९ हजार डोस मिळाले असुन चार केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर १०० अशा चार केंद्रांवर ४०० जणांना दरदिवशी लस दिली जात आहे. शनिवारी महापालिकेने ७७३ आरोग्य सेवकांना लस देऊन आघाडी घेतली आहे. हे प्रमाण १९३ टक्के इतके आहे. त्याकरिता महापालिका प्रशासनाने राज्य सरकारची परवानगी घेतली. जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रामध्ये शनिवारी २८५ जणांना लस देण्यात आली. तर, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रा ३५४, उल्हासनगरमध्ये १४३, भिवंडीत १३४, मिरा-भाईंदरमध्ये २७७ आणि नवीमुंबई मनपा क्षेत्रात ४०० जणांचे लसीकरण पार पडले.
कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.परंतु ठाण्यामध्ये मात्र आरोग्य सेवकांनी लसीकरण मोहिमेवर विश्वास दाखवल्याने सुरुवातीला ८७ टक्के प्रतिसाद मिळाला. शनिवारी तर, ७७३जणांनी लस टोचून घेतली असून आत्तापर्यंत पाच दिवसात एक हजार ९०३ जणांनी लस टोचून घेतली आहे.दिवसाला चार केंद्रावर ४०० जणांना लस देण्याचे उद्दीष्टय आहे. परंतु सोमवारपासून दहा केंद्रावर दरदिवशी एक हजार जणांना ही लस देण्याचे उद्दीष्ट असल्याचे ठामपा आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
"सरकारने कोविड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध केले असल्याने लवकरच ठाणे कोरोनामूक्त करू. सदयस्थितीत मनपा क्षेत्रात ४५ केंद्रांची सज्जता आहे.शिवाय आरोग्य सेवकांना त्यांच्या घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्रात लस टोचून घेण्याची मुभा आहे, त्यामुळे लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत,त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिम यशस्वी करावी."
- डॉ. विपीन शर्मा ; ठाणे महापालिका आयुक्त