बाळासाहेबांच्या आठवणीना उजाळा देत पंतप्रधानानी दिली आदरांजली

23 Jan 2021 14:25:07



balasaheb_1  H

 
 
महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे
 
 

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे जमले आहेत. कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून अभिवादन केले जात आहे. तसेच सामाजमाध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेशातील अनेक नेत्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन करत आदरांजली वाहिली आहे.

 
 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(23 जानेवारी) ९५वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे जमले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह अनेक महाविकास आघाडी नेत्यांनी देखील याठिकाणी येऊन अभिवादन केले आहे.

 
 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज राज्यभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शिवसेनेसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना योद्धयांचा सन्मान, आरोग्य तपासणी शिबीर, अवयवदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट अजूनही कायम असल्यामुळे शिवसैनिकांकडून मास्क व वेगवेगळे उपक्रम राबवत अभिवादन करण्यात येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. "दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते आपल्या भूमिकेवर नेहमी ठाम असायचे. आयुष्यभर ते जनकल्याणासाठी अविरतपणे झटत होते." असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 
 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे कुशल व्यंगचित्रकार व शब्दांवर प्रभुत्व असलेले उत्कृष्ठ वक्ते होते. राजकारणावर त्यांची उत्तम पकड होती. महाराष्ट्राप्रती तळमळ असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!" असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0