सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘स्वार्म ड्रोन’ क्षमता अत्यंत जरुरी

    दिनांक  23-Jan-2021 21:12:05   
|

Swarm drone and Indian se
 
 
 
भारतीय लष्कराने सैन्य दिन संचलनादरम्यान १५ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून ७५ देशी बनावटीच्या ‘ड्रोन’चा वापर करून ‘ड्रोन’ सामूहिक कृती क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. भारतात बनवलेले ‘झुंडी ड्रोन’ शत्रूच्या हद्दीत घुसतील. स्वयंचलितपणे लक्ष्याकडे उड्डाण करेल आणि नंतर अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने लक्ष्यास मारेल.
 
 
 
‘स्वार्म ड्रोन’ म्हणजे काय?
 
 
 
भारतीय लष्कराच्या ७५ ‘स्वार्म ड्रोन्स’नी उड्डाण भरले होते. ‘स्वार्म ड्रोन’ हे एक खतरनाक शस्त्र आहे. कित्येक किलोमीटर दूरवरून या ड्रोनचं नियंत्रण करता येत असल्यामुळे हल्ल्यावेळी मानवी जीवितहानी होण्याचा धोका नसतो. हे ‘ड्रोन’ नियोजित लक्ष्यावर अत्यंत अचूक मारा करू शकतात.ड्रोन एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी हल्ला करतात. एकाच वेळी कित्येक ‘ड्रोन’ हल्ला करत असल्यामुळे तो परतवून लावणे अत्यंत अवघड होतं. ‘स्वार्म ड्रोन’चा हल्ला परतवून लावण्याचं तंत्रज्ञान अद्याप अत्यंत महाग असल्यामुळे चीन व पाकिस्तानमध्ये तैनात नाही.
 
 
‘स्वार्म ड्रोन’ ही अत्याधुनिक युद्धपद्धती आहे. यामध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने ‘ड्रोन’ लॉन्च केले जातात. प्रत्येक ‘ड्रोन’चे लक्ष्य वेगवेगळे असते. मोठ्या संख्येने ‘ड्रोन’ लॉन्च केल्यानंतर त्यांना शत्रूने थांबविणे हे जवळपास अशक्य असते. याद्वारे शत्रूचा एअर डिफेन्स, रडार स्टेशन, विमानतळ अशी महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करता येतात. त्याचप्रमाणे सैनिकांना आवश्यक ते साहित्य जसे दारुगोळा, औषधे, पाणी, रसद पोहोचविता येते. ‘ड्रोन स्वार्म’ हे भविष्यातील युद्धाचे अत्यंत अचूक आणि घातक शस्त्र आहे. ‘ड्रोन स्वार्म’ तंत्राने तुम्ही दहशतवादी तळ नष्ट करू शकता. भारतीय सैन्यानेसुद्धा आता या युद्धकलेत स्वत:ला पारंगत केले आहे.
 
अत्यंत घातक असे दूरवरून मारा करणारे ‘स्वार्म ड्रोन’ आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात आले आहेत. त्यामुळे जीवितहानीचा धोका टाळून शत्रूवर अचूक आणि प्रभावी मारा करणं शक्य होणार आहे. ‘स्वार्म ड्रोन’चा (Swarm drone) मोठा थवा शत्रूचा वेध घेतो. ‘स्वार्म’ या शब्दाचा अर्थ आहे झुंड/टोळी. एकाच वेळी अनेक ‘ड्रोन’ उड्डाण करतात आणि लक्ष्यावर अचूक मारा करतात.
 
मानवरहित विमान (मानवरहित एरियल व्हेईकल किंवा ड्रोन) एक प्रकारची लहान विमाने आहेत, जी लष्करी कार्यात टेहाळणी, सर्व्हे, रसद पोहोचवणे आणि हल्ला करण्यासाठी वापरली जाते, जमीन आणि समुद्रावरून उड्डाण करून वापरले जातात. हे विमान रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले जात असल्याने, त्यांना कोणत्याही मानवी ड्रायव्हरच्या उपस्थितीची आवश्यकता नाही. त्याच्या या वैशिष्ट्यामुळेच या विमानांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या विमानांना ‘ड्रोन एअरक्राफ्ट’ असेही म्हणतात. ‘ड्रोन’ हा इंग्रजी शब्द आहे आणि याचा अर्थ ‘नर मधमाशी’ आहे. ‘ड्रोन’ उडत असताना येणाऱ्या भुंग्यासारख्या आवाजावरून त्याला हे नाव पडले आहे. दोन्ही ‘ड्रोन’ आणि क्षेपणास्त्र रिमोट ऑपरेटेड आहेत. परंतु, या दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, मानवरहित विमानाचा पुन्हा वापर करता येतो. परंतु, हे क्षेपणास्त्र केवळ एका वेळेसाठी वापरण्यासाठी आहे.
 
‘ड्रोन’ने युद्धपद्धतीच बदलली
 
‘ड्रोन’ने अमेरिकी सैन्याचे रूप पालटले आहे. दहा वर्षांपूर्वी अमेरिकी संरक्षण विभाग पेंटागॉनच्या ताफ्यात ५० ‘ड्रोन’ होती, आता ७ हजार ५०० आहेत. शत्रूच्या गोटात जाऊन हल्ले करणे, सर्वेक्षण करणे, दरवर्षी ४००-५०० अफगाणिस्तानात ‘ड्रोन’ हल्ले केले जातात. अमेरिकेकडून सीरिया किंवा पाकिस्तानातील दहशतवादी लपलेल्या भागांत केले जाणारे हल्ले ‘ड्रोन’च्या साहाय्यानेच केले जातात. ‘ड्रोन’ नेहमीच युद्धभूमीवर तैनात असते. ते आपली गुप्त माहिती जमवते आणि त्वरित कारवाई करते. त्याने युद्ध पद्धतीच बदलली आहे.
 
 
 
‘ड्रोन’ला स्फोटके किंवा धोकादायक वस्तू बांधून कोठेही स्फोट घडवून आणता येऊ शकतो. एखादा भाग उद्ध्वस्तही करता येऊ शकतो. ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने सीरिया आणि अन्य भागांत ड्रोनच्या साहाय्यानेच सर्वेक्षण केले होते. मागच्या वर्षी झालेल्या आर्मेनिया आणि अझरबैझानमधील युद्धात ‘ड्रोन’ विमानांचे हल्ले निर्णायक ठरले होते. सीमेवर भारतासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या चीनकडे सशस्त्र ‘ड्रोन्स’ आहेत. हे तंत्रज्ञान ते आता पाकिस्तानलाही देणार आहेत. त्यामुळे भारताने आता ‘चीता’ प्रकल्पाला गती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत इस्रायली बनावटीच्या ‘हेरॉन ड्रोन्स’ना ‘लेझर गाइडेड बॉम्ब’ने सुसज्ज करण्यात येणार आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र तसेच अचूकतेने वार करणाऱ्या अन्य शस्त्रांनी ‘हेरॉन ड्रोन’ला अधिक घातक बनवलं जाईल. हा एकूण ३ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
 
भारत-पाकिस्तान, भारत-चीन युद्धात ‘ड्रोन’ वापर
अचानक एका ‘ड्रोन’च्या टोळीने किंवा ‘ड्रोन’च्या टोळधाडीने (swarm of drones) जर आपल्या महत्त्वाच्या ठिकाणावर हल्ला केला, तर त्याविरुद्ध आपण आपले रक्षण करू शकतो का? ‘ड्रोन्स’च्या विरुद्ध स्वतःची रक्षण करण्याची प्रणाली सध्या अतिशय महागडी आहे. परंतु, अचानक ‘ड्रोन’हल्ल्याची भीती अनेक सैनिकांच्या मनामध्ये भरलेली असते. ‘ड्रोन्स’विरुद्ध ‘ड्रोन्स’ संरक्षण प्रणाली ही शर्यत अनेक वर्षे चालू राहणार आहे. ‘ड्रोन’चा वापर पारंपरिक युद्धामध्ये कसा केला जाऊ शकतो, यावर विश्लेषण जास्त महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे की अपारंपरिक आव्हानांमध्ये पाकिस्तान याचा वापर भारताविरुद्ध कसा करू शकतो? लक्षात असावे आंतरराष्ट्रीय सीमेवरती आता ‘फेन्स’ म्हणजे कुंपण लागल्यामुळे तिथून दहशतवाद्यांना स्फोटक पदार्थ, दारुगोळा किंवा हत्यारे पाठवणे हे कठीण झालेले आहे, ‘ड्रोन’ पाठवून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय ‘बीएसएफ’च्या तैनाती मधील फटी शोधून दहशतवादी भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान ‘ड्रोन’चा वापर अफू, गांजा, चरस किंवा खोट्या नोटा पाठविण्यासाठी करतो. ‘स्मगलिंग’ करण्याकरिता, जास्त किमतीचे सामान पाठवणे ‘ड्रोन’ने जास्त सोयीचे आहे.
 
पुढची वाटचाल
आगामी काळात सैनिकांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी यंत्रांमध्येच लढाई होणार आहे आणि त्यामध्ये ‘स्वार्म ड्रोन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. केवळ चीन किंवा पाकिस्तानसारखे कुरापतखोर शेजारीच नव्हे, तर जंगलात किंवा डोंगरदऱ्यांमध्ये बसलेले अतिरेकी, नक्षलवादी यांच्यावरील कारवाईतही ‘स्वार्म ड्रोन’ अत्यंत उपयोगी आहेत. भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाद्वारे सक्षम असलेल्या दलात स्वतःला रूपांतरित करण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने उदयोन्मुख आणि विनाशकारी तंत्रज्ञान आत्मसात करत आहे. या तंत्रज्ञानासाठी भारतीय लष्कराकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence), स्वायत्त शस्त्रे (autonomous weapons) प्रणाली, क्वांटम टेक्नोलॉजी, रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि अल्गोरिदम वॉरफेअर यामध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. भारतीय लष्कराने, ‘स्टार्ट-अप’, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (डीपीएसयू) यांच्या समन्वयाने तंत्रज्ञानाचे विस्तृत उपक्रम हाती घेतले आहेत. असाच एक प्रकल्प म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ऑपरेशनल ड्रोन ऑपरेशन्स’ जो भारतीय ‘स्टार्ट अप’ने विकसित केला आहे. हा प्रकल्प म्हणजे, देशाला शस्त्रास्त्रांच्या मंचावर स्वायत्तता देण्याबरोबरच भारतीय सैन्याच्या, मनुष्यबळाला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवतो. आम्ही उपग्रह क्षेपणास्त्र बनवू शकतो, तर स्वदेशी ‘ड्रोन्स’ का नाही? सुरक्षेच्या बाबतीत आम्ही इतर देशांवर जितके अवलंबून आहोत, तितके आम्ही कमीच राहू. कारण कोणताही देश आपल्याला शस्त्रे किंवा तंत्रज्ञान देईल. परंतु, ते प्रगत तंत्रज्ञान पूर्णपणे देणार नाही. अशा परिस्थितीत आपण अवलंबून राहू.
 
अजून काय करावे
 
चीन जगाला ‘ड्रोन्स’ विकणारा एक सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांना लागणाऱ्या आणि त्यांच्या गरजेची संशोधन करून त्यांना पाहिजे, तसे ‘ड्रोन्स’ ते पुरवत असतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेसुद्धा ‘ड्रोन’ प्रणालीवर आपले संशोधन सुरू केले पाहिजे आणि चिनी ‘ड्रोन्स’च्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. भारत सध्या फ्रान्स इस्रायल, अमेरिकेबरोबर ‘ड्रोन्स’विषयी संशोधन करण्याकरिता कार्यक्रम तयार करत आहे. परंतु, भारताच्या संशोधनाची गती ही अर्थातच चीनपेक्षा जास्त वेगवान असायला पाहिजे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.