अमराठ्यांना मराठीचे धडे

23 Jan 2021 21:35:10

Suparna Kulkarni_1 &
 
 
 
 
मराठी भाषिक अनेक भाषा शिकतो पण मराठी भाषादेखील अमराठ्यांना शिकवली पाहिजे, असा विचार करणारे व त्यानुसार कृती करणारे अपवादानेच. त्यापैकीच एक सदर लेखाच्या लेखिका सुपर्णा कुलकर्णी. सुपर्णा कुलकर्णी यांनी अमराठी भाषकांना मराठी शिकवण्याचे, तसेच ऑनलाईन मराठी शिकवण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तसेच मुंबई विद्यापीठात तीन वर्षे अमराठी भाषकांना त्यांनी मराठी शिकवले आहे. सोबतच ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांना, तंजावर येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांनी मराठीचे प्रशिक्षण दिले आहे. याचबरोबर विविध कोशाच्या कामाचा त्यांना अनुभव आहे. राज्य मराठी विकास संस्थेतदेखील त्यांनी प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम केले आहे. अशा सुपर्णा कुलकर्णी यांनी अमराठ्यांना दिलेल्या मराठीच्या धड्याबद्दल या लेखातून जाणून घेऊया.
 
 
 
अमराठ्यांना मराठी भाषा कशी वाटली, कशी भावली, हे १५व्या शतकातच फादर स्टीफन्स यांनी सांगून ठेवले आहे. परंतु, आजच्या जागतिकीकरणाच्या, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात, कोरोनामुळे वाट्याला आलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या पार्श्वभूमीवर मराठीला सर्वतोमुखी करण्याचे वेगळेच आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याचा अल्पसा प्रयत्न. ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ कस्टम्स अँड इंडायरेक्ट टॅक्सेस, मुंबई’ या संस्थेतील मराठी प्राथमिक पातळी वर्गाचा शेवटचा दिवस होता. गेले ३६ दिवस रोज सव्वातास याप्रमाणे मी त्यांना मराठी शिकवत होते. आज शेवटचा दिवस म्हणून मला NACINच्या म्हणजेच ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ कस्टम्स अँड इंडायरेक्ट टॅक्सेस, मुंबई’च्या कार्यालयात बोलावले होते. आज मी त्यांच्या खऱ्याखुऱ्या वर्गातून वर्ग घेणार होते. परंतु, ऑनलाईन दुपारचे २ वाजले आणि त्यांना काल काय शिकवले याची स्लाईड सुरू करून द्यायची म्हणजे जे काल अनुपस्थित होते ते आपला अभ्यास पूर्ण करून घेत आणि ज्यांना उजळणी हवीय, ते उजळणी करत आणि मी आज शेवटच्या दिवशी काय बोलायचे यावर चिंतन करत बसले.
 
खरे तर मराठी भाषा शिकवणे अत्यंत कठीण, त्यातही अमराठी भाषकांना शिकवणे त्यातही अवघड.आणखी भरीस भर म्हणजे आता ऑनलाईन पण कोरोनाने जगायला शिकवले, तसंच शिकवायला आणि शिकायलाही शिकवले. मला चांगलं आठवतंय बी.एड. करताना ‘वर्गावर जाताना तुम्ही कोणती माध्यमसाधने वापराल?’ या प्रश्नावर एका सहकारी शिक्षकाने, “फक्त खडू,” असं बाणेदार उत्तर दिले होते. पण, माध्यमं बदलली, साधनं बदलली, एवढंच काय पारंपरिक वर्गाची संकल्पनासुद्धा बदलली. पारंपरिक वर्गात खडू-फळा आणि शिक्षकाची देहबोली, अभिनय, भाषाफेक शैली हे सारंच वर्ग यशस्वी व्हायला पुरेसं होतं. पण, कोरोना आला आणि सारंच मोडकळीला आलं. आता ऑनलाईन माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, विषय समजावणं हे अत्यंत अवघड झालंय. त्यातही तुमच्या समोरचा विद्यार्थी अमराठी असेल तर आणखीनच कठीण!
 
बरोबर अडीच वाजता या संपूर्ण वर्गाची जबाबदारी सांभाळणारे समन्वयक सुहास पाटील यांनी प्रास्ताविक सुरू केले आणि माझ्याकडे वर्ग सुपूर्द केला. मी माझा माईक ऑन केला. व्हिडिओ ऑन केला आणि “नमस्कार! कसे आहात सगळे?” असा नेहमीचा प्रश्न केला. पटापट उत्तरं आलीत, “बरा आहे मॅडम”, “उत्तम आहे”, “मजेत आहे”, “आनंदात आहे.” ऐकून बरे वाटले. आज सुरुवातीलाच “चला, खेळ खेळू या!” म्हणताच, सगळे खूश झाले. आतापर्यंत जेवढे मराठी शब्द शिकलात, त्यात एक-एक शब्द नवीन भर घालत आधीच्या विद्यार्थ्याने म्हटलेल्या शब्दाला जोडायचे नि म्हणायचे, थोडक्यात ‘स्मरण साखळी’चा खेळ होता. सगळ्यांनी आनंदाने भाग घेतला. माझे विद्यार्थी सर्व महानिदेशक, कमिश्नर, अतिरिक्त महाप्रबंधक पदावर कार्यरत होते.
 
सहज एक प्रश्न विचारला, “आपल्या या वर्गात तुम्ही काय शिकलात? वर्ग कसा वाटला?” यावर पहिलीच प्रतिक्रिया खूप बोलकी आणि मोलाची मिळाली आणि माझ्या परिश्रमाचं सार्थक करणारी मिळाली. “मॅडम, आमची मराठीची भीती गेली.” खरंच, एखादी भाषा शिकताना त्या भाषेची भीती जाणं, ही पहिली पायरी होय. तरच आपण भाषा मोकळ्या मनानं शिकू शकतो. एका अधिकाऱ्याने तर, “मॅडम, मी माझ्या कक्षाच्या दारावर ‘अधिकारी मराठी शिकतात, त्रास देऊ नये’ अशी पाटी लावली आहे.” मला गंमत, आश्चर्य आणि कौतुक वाटलं. एक प्रतिक्रिया तर भन्नाटच होती. “बरं झालं, शिक्षिकेला माहिती नाही कोण महानिदेशक, महाप्रबंधक आहेत, त्यामुळे असे अधिकारी भाजीवाली किंवा कंडक्टर चे संवाद बोलायला लागले की, त्यांच्या हाताखालचे सहकारी हसून हसून बेजार व्हायचे”. हो, मी वर्ग सुरू होण्यापूर्वीच सांगितले होते, मी सर्वांना ‘सम ईक्ष’ म्हणजेच समान नजरेतून शिकवेन, त्यांचे पद कुठलेही असो माझ्यासाठी विद्यार्थीच!
 
माझा प्रत्येक मराठी वर्ग हा वेगळ्या धाटणीचा असतो. कीर्तनकार जसा समोरचा समुदाय कोणत्या प्रतीचे विनोद समजू शकतो, त्याप्रमाणे आख्यानात दाखले आणि विनोदाची पेरणी करतो, त्याप्रमाणेच माझ्याही वर्गातील विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीनुसार धडे तयार करते. सुरुवात अर्थातच ‘स्वपरिचय’ शिकवून करते कारण नावात काय आहे असं म्हणतात. पण, नावातच सर्व काही असतं, आपलं नाव, शिक्षण, कुटुंब याबद्दल सांगता आलं की विद्यार्थ्याची कळी खुलतेच.
 
एका भाषातज्ज्ञाने एखादी अपरिचित भाषा कशी शिकावी, यासाठी काही कळीचे मुद्दे सांगितले आहेत, त्यात एक मुद्दा असा आहे की, एखाद्या परिस्थितीची कल्पना करून त्यावेळी काय काय बोलू? काय प्रश्न विचारू? उत्तर कसे देऊ? त्याप्रमाणे भाषा शिकावी. याचाच आधार घेत मी वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण करते. उदाहरणार्थ घरातून बाहेर पडल्यावर तुमचा संपर्क प्रथम रिक्शा/टॅक्सी ड्रायवर, बसवाहक यांच्याशी येतो, त्याप्रमाणे संवाद तयार करायचे आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून म्हणवून घ्यायचे. प्रत्येक संवाद म्हणताना त्यातले उतार-चढाव, भाव शिकवायचे. मग त्यांना खूप गंमत वाटते आणि मग ते लोक बरोबर भाषेचा लहेजा पकडतात. बरं हा वर्ग ऑनलाईन असल्याने प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य कान देऊन ऐकावा लागतोच.
 
माझा हा वर्ग त्यांच्या कार्यालयीन वेळेत असल्याने त्या अधिकऱ्यांसमोर त्यांचा कर्मचारी वर्ग बसलेला असायचा, याचा खूप मोठा फायदा झाला. अधिकाऱ्यांना काही बोलता आलं नाही की, एखादा मराठी कर्मचारी मदत करत असे. पण, कधी-कधी हे घातक ठरत असे, कारण आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यासमोर प्रश्नाचे उत्तर आले नाही की, मग अधिकाऱ्याला लाजल्यासारखे होई आणि मग ते गप्प बसत. पण, असे खूप कमी वेळा घडले. प्रत्येक विद्यार्थी उत्तर द्यायला तयार असायचा, मग कधी कधी रागावून गप्प करावे लागे. कारण सगळे बोलायला लागले की, एको यायचा. एकूण काय तर तो वर्ग म्हणजे इयत्ता पाचवीचा वर्ग होत असे.
 
माझे हे सर्व विद्यार्थी आयएएस, आयपीएस झालेले त्यामुळे अत्यंत हुशार, त्यांची ग्रहणक्षमता खूप चांगली होती, त्यामुळे विषय लवकर समजत असे. आकलन पण लवकर होई. त्यामुळे स्लाईडमध्ये अगदी बारीक नजरचुकीने राहिलेल्या स्वल्पविरामची चूकसुद्धा ते निदर्शनास आणून देत. हा भाषेचा ऑनलाईन वर्ग असल्यामुळे स्लाईड सोबत शिक्षकाचा चेहेरा दिसणे अत्यंत गरजेचे त्याचं कारण म्हणजे उच्चार! अमराठी विद्यार्थ्यांना शिकवताना प्रचंड काळजी घ्यावी लागते, कारण त्यात सर्व प्रकारचे विद्यार्थी असतात. विशेषतः बंगाली, आसामी, पंजाबी भाषक असतात आणि त्यांचे उच्चार वेगळे असतात. उदाहरणार्थ ‘व’ला ‘ब’, ‘विवेक’ला ‘बिवेक’, ‘शिवेंद्र’ला ‘शिबेन्द्र’ तसंच पंजाबी ‘पुरी’ला ‘पुडी’ असं, त्यामुळे ऑनलाईन वर्ग असला तरी शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेतील विशेषतः ‘च’, ‘ज’, ‘झ’, ‘ळ’चे उच्चार यावर एक वेगळा वर्ग घ्यावा लागतो.
 
माझ्या प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम त्यांच्या मागणीनुसार तयार करते. जसे कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला धाड टाकताना मराठी कसे बोलायचे ते शिकवा किंवा विमानतळावरील अधिकारी मराठीतून कसे बोलतील तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद, सुरक्षारक्षक, शिपाई यांच्याशी संवाद अशा अभ्यासक्रमासोबतच मराठी व्याकरण, नाम, सर्वनाम, लिंग, वचन, साधा वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि शेवटी सोपी वाक्यरचना अशा चढत्या क्रमाने अभ्यासक्रम तयार करते. क्रियापदे शिकवताना ‘सकर्मक’ आणि ‘अकर्मक’ क्रियापदे घेतली की, काळ लवकर समजतो. या व्यतिरिक्त मराठी संस्कृती यात खानपान, पोषाख, निवडक सणवार, दैवते, विंदा करंदीकर आणि इतरांच्या बालकविता, अंकलेखन, अंकवाचन मराठी वार, महिने, ऋतू हे सारेच घेते. कवितांमुळे भाषा तोंडात रुळायला मदत होते. परिस्थितिजन्य अभ्यासक्रमात उपाहारगृहातील संवाद, पदार्थ मागवणे, आवड सांगणे. डॉक्टर-रुग्ण संवाद, भाजीवाली-बस कंडक्टर संवाद, रोजचा दिनक्रम, रविवारचा दिनक्रम, रंग, छंद, हे सर्व संवादाद्वारे, सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांशी बोलायला लावायचे आणि शिक्षकाने त्यांना बोलण्यास प्रवृत्त करणे. यामुळे वर्गात जीवंतपणा असतो, उत्स्फूर्तता असते, अहमहमिका असते. चित्रावरून गोष्ट सांगताना आपोआप भूतकाळ शिकवला जातो. ज्याला आधीच थोडंसं मराठी येतं त्याला इतर सहकारी ‘शहाणपणा करू नकोस, पुढे पुढे करू नकोस’ अशी सहकाऱ्यांकडून कानपिळणी मिळते आणि वर्ग अत्यंत खेळीमेळीने संपन्न होतो.
 
ऑनलाईन वर्ग सुरू झाला आणि त्यांची परीक्षा कशी घ्यायची, हा मोठाच प्रश्न उभा झाला. सध्याच्या घडीला ‘पियर डेक’, ‘कहूत’, ‘लाईव्ह वर्कशीट’, ‘गुगल फॉर्म्स’ अशी काही संकेतस्थळे आहेत, तिथे आपलं शिक्षिका म्हणून खातं उघडायचं आणि ‘वर्ड फाईल’मध्ये आपली चाचणी तयार करायची, साईटवर जाऊन ‘पीडीएफ’ फाईल अपलोड करायची आणि तिथे जाऊन पर्यायांचे सेटिंग करायचे. उदाहरणार्थ जोड्या लावा, योग्य पर्याय निवडा, यासारखे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ किंवा चाचण्या तयार करू शकतो. वर्गात विद्यार्थ्यांना चाचणी सोडवायला द्यायची, आपण शिक्षिकेच्या पेजवर त्यांना सोडवताना बघू शकतो. याव्यतिरिक्त त्यांच्या अभ्यासवही, गृहपाठवही आणि श्रुतलेखन यांनाही परीक्षेत गुण द्यायचे.
 
एकूणच ऑनलाईन वर्ग घ्यायचा, त्यातही अमराठी भाषकांना मराठीसारखा कठीण विषय शिकवणं एक काळाचं आव्हान आहे. ते पेलण्यासाठी शिक्षकांनाही थोडा वेगळा विचार करावा लागतो. वर्ग कंटाळवाणा होऊ नये म्हणून वेगवेगळे खेळ, गोष्टी, गप्पा-गाणी यांची पेरणी नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करणे. ज्या शिक्षकाच्या ठायी सर्जनशीलता आहे, त्याला हे सारेच सोपे जाते. ऑनलाईन वर्ग आहे तर विद्यार्थी उपस्थित तर दिसतो. पण, लक्ष आहे की नाही, याचीही वेळोवेळी चाचपणी करावी लागते. इतक्या मोठ्या लोकांना न रागावता हाताळावे लागते. शांततेने, प्रेमाने समजूतदारपणे घ्यावे लागते. त्यामुळे शिक्षकावर विशेष जबाबदारी येते ती त्यांनी समर्थपणे पेलायला हवी.
 
सरतेशेवटी अमराठी फादर स्टीफन्स यांनी जसा पक्ष्यांमध्ये मोर सर्वश्रेष्ठ, सुवासामध्ये कस्तुरीचा परिमळ श्रेष्ठ, वृक्षांमध्ये आम्रवृक्ष आणि फुलांमध्ये मोगऱ्याचे पुष्प सर्वश्रेष्ठ आहे, तसेच सर्व भाषांमध्ये मराठीला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. परंतु, माझे मत असे आहे की, स्टीफन्स यांचे पहिले पाऊल भारताच्या कोणत्याही भागात पडले असते, तरी त्या भागातील ती भाषा सर्वश्रेष्ठच वाटली असती. इतक्या भारतीय भाषा समृद्ध आहेत. त्यामुळेच हे श्रेष्ठत्व ऑनलाईन मध्यमातही टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
 

- सुपर्णा कुलकर्णी
 
 
Powered By Sangraha 9.0