दोन आठवड्यानंतर मुंबई-नवी मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित

22 Jan 2021 17:08:31

air pollution _1 &nb


दोन्ही शहरांची हवा 'अत्यंत वाईट' स्तरावर


मुंबई - दोन आठवड्यानंतर मुंबईची हवेची गुुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली आहे. 'सफर'च्या आकडेवारीनुसार आज मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण निर्देशांक (एक्यूआय) ३११ नोंदविण्यात आला असून गुणवत्तेचा स्तर अत्यंत वाईट' आहे. मुंबईत खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांना आणि वुद्धांना आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 
 
 
दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही ढासळली होती. यावेळी हवेचा एक्यूआय ३१९ नोंदवण्यात आला होता. त्यानंतर गेल्या १४ दिवसांमध्ये हवेची गुणवत्ता 'समाधानकारक' स्तरावर होती. मात्र, आता राज्यात थंडीचा पारा वाढल्यापासून हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळू लागली आहे. तापमानातील बदलाचा हा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे वायू प्रदूषणातील वाढीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. हवेमधील २.५ पीएम हे कण प्रदूषणास कारक असतात. उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने हे प्रदूषित कण हवेसोबत उंचावर वाहून जातात. मात्र, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी धूलीकण जमिनीलगतच राहतात. परिणामी हिवाळ्यात धूर आणि धूक्यांचे मिश्रण होऊन धूरके तयार होते. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते. 
 
 
 
आज मुंबईतील सर्वात वाईट हवेची गुणवत्ता कुलाबा परिसरात नोंदविण्यात आली. याठिकाणी 'एक्यूआय' ३३४ आहे. त्यानंतर बीकेसी ३०२, अंधेरी ३०८, चेंबूर ३०९ 'एक्यूआय' नोंदवण्यात आला. तर नवी मुंबईत हवेचा 'एक्यूआय' ३७२ नोंदविण्यात आला आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर ० ते ५० (चांगली), ५१ ते १०० (समाधानकारक), १०१ ते २०० (मध्यम), २०१ ते ३०० (वाईट), ३०१ ते ४०० (अत्यंत वाईट) आणि ४०१ ते ५०० (धोकादायक) अशा प्रकारे मोजण्यात येतो.

Powered By Sangraha 9.0