पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांनो सावधान; समुद्रकिनाऱ्यांवर वन विभागाचे पथक तैनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2021
Total Views |

bird _1  H x W:


नरिमन पाॅईंट परिसरात 'कांदळवन कक्षा'च्या पथकाची गस्त 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नरिमन पाॅईंट येथे स्थालांतरित आणि इतर वन पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्या नागरिकांच्या जनजागृतीसाठी वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने पाऊल उचलले आहे. 'कांदळवन कक्षा'च्या वनाधिकाऱ्यांचे एक पथक 'महाराष्ट्र सुरक्षा दला'च्या जवानांसोबत नरिमन पाॅईंट परिसरात तैनात करण्यात आले आहे. या पथकाकडून नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्याबरोबरच पक्ष्यांना खाऊ घालण्यावर निर्बंध लावण्यात येत आहेत.  
 
 
मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. शहरातील किनारे आणि खाडीक्षेत्रात विदेशातून आलेल्या पक्ष्यांची जत्रा भरली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर तपकिरी डोक्याचा कुरव, पलासचा कुरव, कल्लेदार कुरव, नदी सुरय यांसारखे स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत काही नागरिकांकडून या पक्ष्यांना खाऊ घालण्यात येत आहे. फरसाण, गाठिया, वेफर यांसारखे तेलकट आणि या पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य नसलेले पदार्थ त्यांना खाण्यासाठी देण्यात येत आहेत. अशा पद्धतीने पक्ष्यांना त्यांचे अनैसर्गिक खाद्य खाऊ घालणे त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे पक्ष्यांच्या पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. ज्यामुळे स्थलांतरणाचा परतीचा प्रवास करणे त्यांना कठीण होऊ शकते. 
 
 
 
स्थलांतरित पक्ष्यांबरोबर स्थानिक वन पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी दरवर्षी 'कांदळवन कक्षा'चे अधिकारी मोहीम राबवतात. यामाध्यमातून नरिमन पाॅईंट ते गिरगाव चौपाटीदरम्यान गस्ती पथकाची नियुक्ती करण्यात येते. यंदाही हे पथक नेमण्यात आले असून आजपासून यासंदर्भातील मोहीमेला सुरुवात झाल्याची माहिती कांदळवन कक्षाच्या मध्य मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. नरिमन पाॅईंट ते गिरगाव चौपटी दरम्यान वनरक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांचे पथक गस्त घालणार असून यामाध्यमातून पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्याबरोबरच त्यांना माहिती देऊन जनजागृतीही करण्याचे काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खास करुन ही मोहीम गेट वे आॅफ इंडिया परिसरात राबवणे आवश्यक आहे. कारण, याठिकाणी अलिबाग किंवा एलिफंटा बेटांवर बोटीने जाणाऱ्या पर्यटकांकडून पक्ष्य़ांना सर्हासपणे खाऊ घालण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे बोट चालकही पर्यटकांच्या या कृतीला उद्युक्त करण्यासाठी बोटीवर वेफर, गाठीया अशा तत्सम पदार्थांच्या पाकिटांची विक्री करतात.
\
@@AUTHORINFO_V1@@