अस्मितांचा राजकीय खेळ

21 Jan 2021 22:36:47
Shivsena  _1  H
 
 
 
 
राजकारण हे कायम दोन आघाड्यांवर खेळले जाते. एक म्हणजे, ‘लोकांना काय हवे?’ आणि दुसरे म्हणजे, ‘लोकांना काय द्यावे?’ या दृष्टीने. राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी हे ‘लोकांना काय हवे?’ याचा विचार करून सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्यासाठी अनेकानेक आश्वासनांचा निवडणुकीपूर्वी अक्षरश: पाऊस पाडतात. अशाप्रकारे देशवासीयांचे राजकीय भान कायम संदिग्ध ठेवण्यासाठी अस्मितांचाही राजकीय खेळ पक्ष अणि नेत्यांकडून सातत्याने खेळला जातो. निवडणुका जवळ येताच, आश्वासनांबरोबर अस्मिताही हळूहळू प्रखर होत जातात. साहजिकच हे सगळे मुद्दाम घडविले जात असते. बेळगावच्या निवडणुका जवळ येताच, शिवसेनेने सीमावादाचा उकरुन काढलेला विषय हे त्याचे उत्तम उदाहरण. खेळ करताना, मराठी भाषकांचा प्रश्न फक्त मतांच्या राजकारणासाठी चर्चेत आणणे हेच मुळी शिवसेनेचे राजकीय अपयश. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर तंजावरपर्यंत स्वराज्याची सीमा विस्तारून स्वराज्य वाढविले. परंतु, त्यांच्या नावाने पक्ष चालविणार्‍या शिवसेनेने सध्या पिंजर्‍यातील वाघाची भूमिका घेतलेली दिसते. हाती सत्ता असताना, या सत्तेचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना का करताना दिसत नाही? म्हणूनच केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी इथल्या सामान्यांच्या अस्मितांशी खेळणे हा शिवसेनेचा स्थायीभावच झाला आहे. सेनेच्या ‘हीच ती वेळ’ या घोषवाक्यामागे त्यांचा छुपा अजेंडा असा विविध प्रकरणांतून वारंवार उघडाही पडताना दिसतो. ‘हीच ती वेळ’ म्हणून शिवसेनेला अस्मितांचे राजकारण बाजूला सारून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करणे सध्या गरजेचे आहे. परंतु, ज्यांना मुळात मुद्दा हा केवळ जनतेच्या अस्मितांना कुरवाळून मते पदरात पाडण्यापर्यंत मर्यादित असतो, त्यांना त्याचे कसले सोयरसुतक? जनमताचा अनादर करून सत्तेची खुर्ची मिळविणार्‍या शिवसेनेला अस्मितांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘हीच ती वेळ आहे’ असे का वाटू नये? की, ज्यांनी ‘झोपेचे सोंग’ घेतले आहे, त्यांना जागे करण्याचा जनतेचा अट्टाहासच चुकीचा?
 
 

राजकारणाची नवी अस्मिता

 
 
राजकीय पक्ष जनतेला अस्मितांच्या गुंत्यामध्ये गुरफटवून राजकारण करतात, हे जरी सत्य असले तरी जनतेनेही त्यांच्या अस्मिता राजकीय नेत्यांपुढे तितक्याच ठामपणे मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या डाव्या विचारांकडे झुकलेल्या पक्षांची जेव्हा जेव्हा सत्ता येते, तेव्हा तेव्हा अस्मितांचा मुद्दा हा राजकीय पटलावर येण्यापूर्वीच चव्हाट्यावर आलेला दिसतो. कोणत्याही शहराचे नाव बदलण्याचा अधिकार जेव्हा तेथील सत्ताधार्‍यांना असतो, तेव्हा मग फक्त त्याची नुसती घोषणा करून तो विषय चर्चेत आणण्यामागचा नेमका हेतू तरी काय? राजकारणामध्ये अशाप्रकारे अस्मितांना डोक्यावर घेऊन आपला राजकीय हेतू साध्य केला जातो. हे जरी खरे असले, तरी आज जनतेलाच या अस्मितांचे बाहुले करणे, हीच तर राजकारणाची नवी अस्मिता झाली नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर या देशावर अनेकांनी आक्रमणे केली. पण, आम्ही भारतीय म्हणून किंवा आमची संस्कृती म्हणून कधी संपलो नाही. कारण, अस्मिता लादणार्‍यांना येथील जनतेने वेळोवेळी त्यांची जागाच दाखवून दिली. इथल्या लोकांच्या भावना या इथल्या राष्ट्रपुरुषांशी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांशी एकरुप झालेल्या असताना, त्याच्यावर घाला घालून, त्या जखमा कायम ओल्या ठेवण्याचा डाव इथल्या संस्कृतीविरोधी विचारधारेने कायम सुरूच ठेवलेला दिसतो आणि हीच या लोकांची राजकारणाची नवी अस्मिता बनत चालली आहे. धर्म आणि संस्कृतीच्या विरोधात इथल्या काही राजकीय पक्षांनी अनाठायी भूमिका घेतल्या. लोकभावनांना राजकीय रंग देऊन त्यांनी त्याला ‘अस्मिता’ असे गोंडसपणे संबोधणे, हाच मुळी आजच्या ‘बुद्धिवादी’ म्हणवून घेणार्‍यांचा छुपा कार्यक्रम दिसतो. म्हणूनच आज संभाजीनगर, धाराशिव आणि बेळगावच्या सीमाभागातील मराठी भाषकांचे प्रश्न हे फक्त आणि फक्त अस्मिता जोपासण्यासाठी चव्हाट्यावर आणले जातात. या भावनिक अस्मितांआड लपून राजकीय अस्मितांचे इमले उभारले जातात. राजकारणासाठी अस्मितांचा वापर करणे, हीच सध्या राजकारणाची नवी अस्मिता बनलेली दिसते. त्यामुळे जनतेने या मुद्द्यावर सारासार विचार करुन सजग होणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे ‘अस्मितांचा खेळ हा राजकारण करण्यासाठीच असतो,’ अशी व्याख्या प्रचलित होत असतानाच, अस्मितांचे बोथट झालेले मुद्दे जनतेने उघड्या डोळ्यांनी, सद्सद्विवेकबुद्धी जागृत करुन पाहणे गरजेचे आहे.


- स्वप्निल करळे
Powered By Sangraha 9.0