खडसेंच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ कायमच!

21 Jan 2021 20:43:03

khadse_1  H x W

 

 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ईडी पीडा अद्यापही काही टळलेली नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवार, दि. 25 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी पार पडणार असून यावेळी न्यायालयात नेमके काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोमवारपर्यंत तरी कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सांगत ईडीने गुरुवार, दि. 21 जानेवारी रोजी खडसे यांना तात्पुरता दिलासा दिला. सोमवारपर्यंत तरी कारवाई होणार नसली तरी यादिवशी होणार्‍या न्यायालयीन सुनावणीनंतर मात्र ईडीच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
 
 
 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भोसरी भूखंड प्रकरणी गुन्हा नोंद होऊन चौकशी सुरू आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी, मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे . यावर आज सुनावणी झाली, त्यात सध्या सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितले आहे. तसेच खडसेंच्याही वकिलांची मांडलेली बाजू ऐकल्यानंतर , कोर्टाने ईडी वकिलांना म्हटले की, तपासात खडसे पुढेही सहकार्य करत असतील आणि चौकशीच्या समन्सचे पालन करत असतील तर त्यांना अंतरिम दिलासा का देऊ नये ? त्यांना काही दिवसांसाठी संरक्षण दिलं तर आभाळ कोसळणार आहे का ? असा सवाल आज कोर्टात खंडपीठाने ईडीला केला .

 

त्यानंतर ईडीनं सोमवारपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याची हमी दिली . या हमीची न्यायालयानं नोंद घेतली आहे . पण यानंतर खडसे यांच्या याचिकेवर पुढे पुन्हा सोमवारी सुनावणी करू असे न्यायालयीन खंडपीठाने सांगितले . मग आता यावर ईडी पुन्हा काय बाजू मांडणार व 25 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीत काय होत हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.



Powered By Sangraha 9.0