उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात वाघिणीसह दोन बछड्यांचा विषबाधेमुळे मृत्यू

02 Jan 2021 00:02:49
tiger_1  H x W:


गुरामध्ये विष घातल्याचा संशय 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नववर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यातून एका वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात या वाघांचे मृतदेह आढळून आले. शुक्रवारी सायंकाळी ही घटना उडकीस आली. विषबाधेमुळे या तिन्ही वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे.

 
गेल्या वर्षी राज्यात १७ वाघांचा मृत्यू झाला होता. नववर्षातही वाघांच्या मृत्यूचे सत्र वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झाले आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळी तीन वाघांचे मृतदेह आढळून आले. हे मृतदेह अभयारण्यातील सी-3 नामक वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांचे होते. अभयारण्यातील कऱ्हांडला वनपरिक्षेत्रात हे मृतदेह आढळले. हा परिसर शेतजमिनीच्या जवळपास आहे. याठिकाणी वनाधिकाऱ्यांना गायीचे अर्धवट खाऊन टाकलेले शरीर सापडले. त्यामुळे गायीच्या शरीरात विष टाकल्याने या तिन्ही वाघांचा मृत झाल्याचा संशय बळावला आहे. वन विभागाकडून पेंच राष्ट्रीय उद्यानातून कुत्र्यांचे पथक याठिकाणी आणण्यात आले असून त्यांच्यामार्फत सखोल तपासणी करण्याचे काम सुरू आहे. या वाघांचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी पार पडेल. दरम्यान गेल्या ४० दिवसांमध्ये उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे. 

Powered By Sangraha 9.0