‘हजरत टिपू सुलतान की जय’; शिवसेनेची नवी घोषणा

19 Jan 2021 14:29:06
Balasaheb Thackeray  _1&n
 
 
मुंबई : ‘अजान’ स्पर्धेचे आयोजन करणार्‍या शिवसेनेने आता टिपू सुलतान यांच्या जयंतीसाठी बॅनरबाजी केल्याचे पाहावयास मिळत आहे. यावर मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे.
 
 
शिवसेनेचे ‘हे’ पोस्टर मीरा-भाईंदर येथील युवा शहर संघटक सलमान हाशमी यांनी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त छापले आहेत. या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आ. गीता जैन, आ. प्रताप सरनाईक यांचेदेखील फोटो आहेत.
 
 
महत्त्वाचे म्हणजे त्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यात घातलेले भगवे वस्त्र हेदेखील हिरवे दाखविण्यात आले आहे. यावर भाजपने शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याची टीका केली आहे. “शिवसेनेने आपला रंग तर बदलला आहेच, आता महापुरूषही बदलले आहेत,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
 
शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला !
 
“टिपू हा म्हैसूरचा सुलतान होता. टिपू इंग्रज-मराठे-निजाम यांच्या संयुक्त फौजांशी लढताना मारला गेला होता. अत्यंत क्रूर आणि हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानने शेकडो मंदिरे पाडली, असा इतिहास आहे. असा लौकिक असलेल्या टिपूच्या जयंतीनिमित्त पोस्टर छापून शिवसेनेने आपले राजकारण कुठल्या दिशेने चालले आहे, ते दाखवले आहे.
 
 
यात लाखो हिंदूंची कत्तल करणार्‍या जिहादी बादशहा टिपू सुलतानचा उल्लेख शिवसेनेने ‘शेर-ए-हिंद’ असा केला आहे. त्यामुळे एका बाजूला औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हता, असे सांगणार्‍या शिवसेनेचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे,” असे म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Powered By Sangraha 9.0