महापौर किशोरी पेडणेकर कृष्णकुंजवर

19 Jan 2021 16:16:42

kishori pednekar_1 &




'या' कारणासाठी घेतली राज ठाकरे यांची भेट



मुंबई: शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी सायंकाळी रोजी सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहण्याकरता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी १०.३० वाजता राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.



राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवरच्या १५ मिनीटांच्या भेटीत शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक २०६ चे नगरसेवक सचिन पडवळ यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी ९.४५ वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मलबारहिल येथील सागर बंगल्यावर जाऊन महापौरांनी भेट घेतली. आणि त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा सर्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वतः महापौर देत आहेत.



devendra fadanvis_1



यानिमित्ताने आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेंनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी हे दोघे भाऊ एकत्र आले होते. त्यानंतर तब्बल एका वर्षाने, बाळासाहेबांच्या निमित्ताने उद्धव-राज एकत्र येत असल्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनासुद्धा लागली आहे.








Powered By Sangraha 9.0