प्रश्नतरंगांच्या अंतरंगात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |

manovata_1  H x


आपल्या विचारांच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत. अतिविचार करत आहोत. स्वतःच्या उद्देशाबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपण ज्या महान स्वप्नांच्या किंवा ध्येयांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होतो, ती स्वप्ने आणि ध्येय कुठेतरी हरवली आहेत आणि आपण भलतीकडे भरकटत चाललो आहोत. जे आयुष्य आपल्याला भरभरून जगायचे आहे, त्याबद्दल आपले मन आज साशंक आहे.
 
 
 
 
आपल्या आयुष्यात अनेक अशा प्रभावी ताकदी आहेत की, ज्या आपली प्रसन्नता, आपली आशा, यश, आपला आत्मविश्वास या साऱ्यांना सुरुंग लावू शकतात. आपण अमाप असे काहीतरी मिळविले आहे, या मनस्थितीतून चिंतेच्या वा नैराश्याच्या काळोखात आपण कसे आणि कधी डुंबतो, याचा थांगपत्ता आपल्याला लागत नाही. हे जे छुपे युद्ध आपल्या मनात चाललेले असते ते आपल्या शंकाखोर मनामुळे! शंका किंवा एखाद्या गोष्टींबद्दल संशय येण्यासारखा दुसरा खतरनाक शत्रू आपल्या आयुष्यात असूच शकत नाही. आपल्यापैकी बहुतेकजण या शत्रूच्या दडपणाखाली वावरत असतात. त्याच्याविरुद्ध बोलायला कोणी तयार नसते. शंकाखोर स्वभावाच्या मागे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वाटत असणारी अनिश्चितता किंवा सत्यालासुद्धा प्रश्नार्थक दृष्टीने पाहण्याची सवय या दोन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत.
 
तसे पाहिले तर या जगातील निरोगी प्रवृत्तींच्या सगळ्या व्यक्तींकडे एखाद्या गोष्टीची भीती असणे, संदेह वाटणे वा टीकात्मक विचार करणे इ. गोष्टींचा एक अंतर्गत साठा असतो. तो एक तसे पाहिले तर नैसर्गिक स्रोत आहे. त्यात काही चूक आहे किंवा बरोबर आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्या मनाने जे केले पाहिजे, ते आपले मन करत राहते. यामध्ये मनाचा मूळ उद्देश काय असतो की, आपल्या समस्यांचे उत्तर निकोपपणे शोधायचे. आपल्या मार्गातले अडथळे दूर करायचे. यामध्ये एक भावनिक चापल्य निर्माण करण्याचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. भावनिक चापल्य विकसित करण्यासाठी व्यक्तीची सर्वसामान्य चतुराई जितकी महत्त्वाची आहे, तितकीच तिची स्वतःबद्दलचीविश्वासार्हताही विशेष महत्त्वाची आहे. आपण केव्हा आपल्या स्वतःच्या वैचारिक आणि भावनिक जाळ्यात फसतो आहोत, याचा वेध घेणे व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हा वेध घेणे सोप्पे नाही. किंबहुना ती अत्यंत किचकट बाब आहे. यामध्ये काही छुप्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागतो. पहिली मार्मिक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे; ती म्हणजे, आपण एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती तरी करत राहतो किंवा एखाद्या गोष्टीचा सतत अट्टाहास करत राहतो. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट ती आपल्या आणि कधीकधी इतरांच्याही लक्षात येते; ती म्हणजे, आपण जुन्या घटना किंवा प्रसंग यांचाच वेध घेत राहतो. आपल्या मनालाही कळतं की, आपण आज जे काही विचार करत आहोत ते आपल्या आयुष्यातील भूतकाळाचा आढावा आहे.
 
आपण भावनिक वा मानसिकदृष्ट्या उंच उड्या घेत असतो. आपण योग्य दिशेने जात आहोत. आपल्या स्वप्नांच्या दिशेने, आपल्या उद्देशाच्या दिशेने व्यवस्थित मार्गक्रमण करत आहोत, असे आपल्याला वाटत असतानाच, अचानक अनपेक्षितपणे आपल्याला जाणवते की, आपल्या विचारांच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत. अतिविचार करत आहोत. स्वतःच्याउद्देशाबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपण ज्या महान स्वप्नांच्या किंवा ध्येयांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होतो, ती स्वप्ने आणि ध्येय कुठेतरी हरवली आहेत आणि आपण भलतीकडे भरकटत चाललो आहोत. जे आयुष्य आपल्याला भरभरून जगायचे आहे, त्याबद्दल आपले मन आज साशंक आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणसाबद्दल, आपल्या स्वतःच्या हेतूंबद्दल आपल्या एकंदरीत अस्तित्वाबद्दल आपल्या मनात फक्त प्रश्नचिन्ह आहे.
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@