औरंगाबाद की संभाजीनगर; वाद विकोपाला!

18 Jan 2021 10:41:05

auranghabad or sambhajina




औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून शिवसेना काँग्रेसची जुगलबंदी




मुंबई: औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने काँग्रेस व शिवसेनेत जुगलबंदी पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून ‘जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत’ असे म्हणत काँग्रेसला चिमटा काढण्यात आला. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत?’ असे म्हणत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. त्यावरून पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतरावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगला आहे.


औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती. औरंगजेबाच्या इतिहासाची उजळणी करत इतिहास पुन्हा वाचण्याचा सल्लाही यावेळी दिला. राऊत यांच्या या टीकेला थोरात यांनी रविवारी सविस्तर ट्विटच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले,“औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?” असा सवाल थोरात यांनी केला.



विकासाचा मुद्दा नसल्याने नामांतराचे राजकारण
शिवसेना आणि आणि काँग्रेसमध्ये नुराकुस्ती सुरू आहे. गेली 32 वर्षे शिवसेनेची औरंगाबाद महापालिकेवर सत्ता आहे. पण ते औरंगाबाद नामांतर करण्याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण करत आहेत. आता आगामी काळात औरंगाबादच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने ते काँग्रेसच्या साहाय्याने राजकारण करत आहेत. आम्ही पूर्वीपासून औरंगाबादचे नामांतर करण्याविषयी आग्रही होतो. आजही आम्हाला वाटते की शिवसेनेने मंत्रिमंडळात ठराव आणून औरंगाबादचा नाव हे संभाजीनगर करावे.
-केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप


हे सर्व नाटक !
शिवसेना आणि काँग्रेसची ही नाटके आहेत. ठरवून जनतेच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. शिवसेना रोज काँग्रेसला टपल्या मारते. एक राष्ट्रीय पक्ष रोज एका प्रादेशिक पक्षाच्या अशाप्रकारे टपल्या खातो. काँग्रेस नेत्यांना रोज शिवसेना नेते अपमानित करत आहेत. त्यांचा स्वाभिमान सत्तेपोटी लपून राहिलाय, अशा प्रकारची परिस्थिती सध्या दिसत आहे.
- राम कदम, आमदार, भाजप


Powered By Sangraha 9.0