सुळेबाईंचे ‘नारळ’ राजकारण

17 Jan 2021 21:55:08
Supriya Sule _1 &nbs
 
 

“कोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे (वाढवणे) मला पटत नाही. माझ्यावर दाभोळकरांचे संस्कार झाले आहेत,” नुकतेच औरंगाबाद येथे सुळेबाईंनी काढलेले हे उद्गार आहेत. खरे म्हणजे आपल्यावर काय आणि कुणाचे संस्कार झाले, हे सांगावे लागत नाही. ते आपल्या वागण्यातून प्रकट होतच असतात. योग्यता, अभ्यास, गुणवत्ता हे सगळे निकष साध्या कार्यकर्त्यांना. सत्ताधारी वडिलांच्या लेकीचा जन्म तर सत्ताप्राप्तीचे कवच घेऊनच झालेला असतो ना? त्यामुळे सुळेबाई नेहमी कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये चर्चेतअसतात. ज्याप्रमाणे त्या मागे म्हणालेल्या की, “संसदेत कंटाळा आला की आम्ही एकमेकींच्या साड्यांबद्दल बोलतो.” आता इथे ‘आम्ही’ म्हणजे कोण? तर जनतेने निवडून दिलेल्या खासदार महिला. असो. आताही त्या म्हणाल्या की, “कोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे मला पटत नाही.” आता यांना कुणी नारळ फोडायला सांगितला का? पण आपण कसे हिंदू समाजाच्या श्रद्धा मानत नाही, हे सांगण्याचा मुद्दाम खटाटोप आहे. त्या हे ज्या कार्यक्रमात बोलल्या, तो कार्यक्रम पदवीधर आमदाराच्या सत्काराचा होता. तिथे शिक्षण किंवा तत्सम संबंधित विषयांवर मार्गदर्शन करणे आवश्यक होते. मग तिथे हे लस आणि नारळ वगैरेंबद्दल त्या का बोलल्या? तर काही लोक म्हणतात की, औरंगाबादमध्ये अल्पसंख्याकांच्या मतांचा टक्का प्रभावीपणे जाणवतो.त्यामुळे इथे हिंदूंच्या श्रद्धांना टपली मारली तर आपल्याला अल्पसंख्याकांचे चाहते होऊ, असे काहीसे त्यांना वाटले असावे. काही लोक म्हणतात की, “त्यांनी जरी १३ एकरांमध्ये ११० कोटींची वांगी पिकवली असली तरी त्यांना खाण्यासाठी शिरखुर्माच आवडतो. इफ्तार किंवा तत्सम कार्यक्रमात शिरखुर्मा वगैरे त्या आवडीने खातात.त्यांना कुठे नारळ वगैरेचे सोयरसुतक असेल? काहीही असो, सुळेबाईंचे पुरोगामित्व हिंदू समाजाने कायम आणि चांगले लक्षात ठेवावे. हिंदू काय किंवा इतर अल्पसंख्याक काय? प्रथेसाठी हालहाल करून पशूंची हत्या करून त्यांना मजेने खाण्याच्या प्रथेपेक्षा नारळ वाढवणे कधीही चांगले. सुळेबाई या प्रथांवरही काही बोला, पण ‘सेक्युलरपणा’चा बुरखा पांघरून त्यांचे हिंदूद्वेष आणि निंदा हेच राजकारण आहे. सुळेबाई सुरू ठेवा तुमचे राजकारण!
 


इज्जत आणि अश्रू स्वस्त झाले

 
 
धनंजय मुंडेंचे काय झाले? माहिती नाही. पण पीडित स्त्रीचे जे काही होणार होते ते आधीच सगळ्यांना माहिती होते. धनंजय मुंडेंच्या त्या प्रकरणाबद्दल सगळ्यांनी अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले आहे. इतकेच काय, सर्व पक्षातले आजी-माजी नेते एकाच वेळी बाहेर आले. ‘ती’ पीडित स्त्री ‘हनी ट्रॅप’ आहे, सांगू लागले. काही नेते म्हणू लागले की, धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द संपवण्यासाठीचे हे कटकारस्थान आहे. नाक्यावरची पोरंही सांगतील की, ‘हनी ट्रॅप’ होते की काय होते? धनंजय मुंडेंनी जिथे निवडणूक आयोगामध्ये खोटी माहिती दिली, खरेतर तेव्हाच कायद्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उठवले. राजकारणात ‘सब घोडे १२ टक्के’ असे लोकांचे म्हणणे असते. धनंजय मुंडेंच्या प्रकरणात सगळ्या पक्षातील एक-एक नेता धनंजय मुंडेंचे समर्थन करण्यासाठी बाहेर आला. धनंजय यांची बाजू घेऊन त्या महिलेला ‘चारित्र्यहिन’ ठरवणारी नेतेमंडळी कोण आहेत? एक गुलाबराव पाटील. हे शिवसेनेचे मंत्री सोडले तर बाकी माजी आणि थातुरमातूर नेते आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, या सगळ्यांची या प्रकरणातील गुंतागुंत जनतेसमोर यायलाच हवी.दुसरीकडे ‘ती’ पीडित स्त्री कदाचित पुढे प्रकरण मागे घेईल. पण तरीही जनता उत्तर विचारेलच का असे काय घडले की तिने माघार घेतली? कारण, समाजाला लेकीबाळी आहेत. बलात्काराचा आरोप असणारा व्यक्ती समाजकल्याणमंत्री? कदाचित मुंडेंनी बलात्कार केला नसेल तरीही ‘ती’ असे का म्हणते, याचे जनतेसमोर पुरावे यायला हवेत. धनंजय मुंडेंच्या दोन्ही पत्नी कदाचित पुढे येतील आणि म्हणतील, ‘मेरा पती मेरा भगवान है.’ असे झाले तरी काही आश्चर्य वाटायला नको. कारण, वस्तीपातळीवर असे घडतच असते. त्या बिचारीला अत्याचार सहन करावाच लागतो. कारण, तिने ब्र जरी काढला तर ‘तूच काहीतरी केले असशील, नाहीतर इतक्या जणींना सोडून तुझ्याबाबतीत असे का झाले?’ असे विचारणारे बाहेरचे तर सोडाच तिच्याच घरातलेही असतात. इज्जतीचा मक्ता तिच्याचकडे असतो ना? संगनमत करून तिची बेअब्रू करायला सोपे जाते. पुुरोगामित्वाचे टेंभे मिरवणार्‍यांनो, महाराष्ट्रात काय चालले आहे ते पाहा. लेकीबाळींची इज्जत आणि अश्रू इतके स्वस्त केले तुम्ही! त्रिवार निषेध!!!




Powered By Sangraha 9.0