गांभीर्यशून्य पवार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2021
Total Views |
PAWAR_1  H x W:




छत्रपती शिवाजी महाराज नि छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान, तर मराठी व हिंदुजनांच्या हृदयात दैवतासारखेच, पण त्यांच्याच नावाने औरंगाबादच्या नामांतरासाठी समर्थन द्यावेसे पवारांना वाटले नाही. यावरुनच छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेताच मूळव्याध झाल्यासारखे ठणाणा बोंबलत विरोध करणार्‍यांच्या रांगेत पवारांचाही समावेश होतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
 
 
“संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा, नाही तर अजून काही म्हणा... या प्रकरणाकडे मी गांभिर्याने पाहत नाही,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच केले. ते शिवसेना आणि काँग्रेसमध्ये औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरुन जुंपल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. तत्पूर्वी, चालू वर्षात होऊ घातलेल्या अन्य महापालिकांसह औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा विषय उकरुन काढला.
 
 
 
 
अर्थात, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पाट लावून मिळवलेल्या सत्तासिंहासनामुळे आपल्या पाठीराख्यांच्या हृदयातील स्थान डळमळू लागल्याने धास्तावलेल्या शिवसेनेला आपण अजूनही हिंदुत्ववादी असल्याचे दाखवणे भागच होते. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते शिवसेनेचे बरळूबहाद्दर संजय राऊतही आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावर ठाम असल्याचे आरडाओरडा करुन सांगू लागले. पण शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर जितकी आपल्या मतदारांच्या समर्थनाची गरज आहे, तितकीच गरज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही स्वतःची ‘सेक्युलर’ मतपेढी सांभाळण्याची आहे. म्हणूनच मंत्रालयात बसून महाराष्ट्राच्या सत्तेचा वाटा बळकावणार्‍या तिन्ही पक्षांत औरंगाबादच्या नामांतरावरुन मात्र गदारोळ सुरु झाला.
 
 
 
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर उपदेशाचे डोस पाजत असल्याच्या थाटात, आमचा नामांतरावर विश्वास नाही, नामांतरामुळे विकास होत नाही, अशा शब्दांत पक्षाची ‘सेक्युलर’ भूमिका मांडली. वस्तुतः काँग्रेसचा स्वातंत्र्योत्तर काळातील कारभार पाहता, त्या पक्षाने नामांतराशिवाय काय केले, हाच प्रश्न पडावा. देशावर फक्त आणि फक्त गांधी-नेहरु खानदानाचीच मालकी असल्याचे ठसवण्यासाठी काँग्रेसकडून ठिकठिकाणी जवाहरलाल नेहरुंपासून ते राजीव गांधींपर्यंत सर्वांच्याच नावांचा वापर करुन झाला.
 
 
 
तीच काँग्रेस आता क्रूरकर्मा औरंग्याला कवटाळून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव नाकारत असेल तर ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज को,’ असेच म्हणावे लागेल. तसेच काँग्रेसने शिवसेनेशी सत्तासंग करण्याआधी मुस्लिमांची परवानगी घेतली होती व त्याची कबुली अशोक चव्हाण यांनीच दिली होती. त्यामुळे मुस्लीम मतदारांना ‘तलाक’ देऊन औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची किंवा तशा प्रस्तावाला पाठिंबा देण्याची हिंमत काँग्रेस कधीही दाखवू शकणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? कारण, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर करण्यावरुन झगडा सुरु झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे म्हटले आहे.
 
 
 
शरद पवारांचेही बरोबरच आहे म्हणा. कारण, त्यांची कोणतीही विशिष्ट अशी भूमिका कधी नसतेच. पवारांची भूमिका किंवा पक्ष-बाजू एकच ती म्हणजे सत्तेची खुर्ची! आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या, मर्जीतल्या मंडळींच्या हातात सत्तेची चावी असली, पदे मिळत राहिली की शरद पवारांचे काम भागते, मग सत्तेतला भागीदार कोणीही का असेना. राजकारणातील आपल्या 50 वर्षांच्या हयातीत पवारांनी याशिवाय काहीही केलेले नाही. आताही सत्ता मिळतेय म्हटल्यावर शरद पवारांनी शिवसेनेशी घरोबा केला. तर शिवसेनेला आपण सेक्युलर पक्षांसोबत जाऊनही हिंदुत्वाला विसरलो नाही, हे सांगण्याची खुमखुमी आली नि तिने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आणला.
 
 
 
काँग्रेसने या प्रकरणात निदान औरंगाबादचे संभाजीनगर नकोच, ही थेट भूमिका घेतली, पण शरद पवारांचे तसे नाही. ते अजूनही अधांतरीच दोन्ही डगरीवर पाय ठेवून उभे आहेत. धड नामांतराच्या बाजूनेही बोलणार नाहीत नि नामांतर नको म्हणूनही बोलणार नाहीत. औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला समर्थन दिले तर पक्षाचे मुस्लीम मतदार नाराज होतील नि विरोध केला तर शिवसेनेशी जुळवलेले सख्य धोक्यात येईल, अशी अवस्था. त्यामुळे जोपर्यंत सत्तेची फळे चाखता येतील तोपर्यंत चाखू, पुढचे पुढे पाहू, असा पवारांचा विचार असावा. म्हणून शरद पवारांनी संभाजीनगर म्हणा किंवा धाराशीव म्हणा, मी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नाही, असे म्हणत ‘ना घर का ना...’ छापाचे वक्तव्य केले.
 
 
दरम्यान, शरद पवारांना त्यांचे समर्थक जाणता राजा म्हणतात तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांची ओळख शक्तिशाली मराठा नेता अशीच आहे, जरी ते तसे नसले तरी! वस्तुतः समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन ‘जाणता राजा’ असे केले होते. पवारांचे समर्थक आपल्या नेत्याला त्या रुपात पाहत असावेत, म्हणून त्यांनी ते शब्द त्यांनाही चिकटवले. पण राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांचा ‘तथाकथित’ जाणता राजा आज औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरावर ठाम भूमिका घेऊ शकत नसेल, तर ती सर्वाधिक शरमेची बाब म्हटली पाहिजे.
 
 
 
कारण, समाज वा राष्ट्रपुरुषांच्या गाथा भावी पिढीपर्यंत नेण्याचे काम जाणत्यांनी करायचे असते. जेणेकरुन शतकानुशतके महापुरुषांचे चरित्र तर जीवंत राहावे, तसेच कोणतेही संकट समोर आले तरी त्याच्याशी झुंजण्याचे बळ मिळावे. अस्मिता, प्रतीकांच्या माध्यमातून समाजसंस्कृती प्रवाहित होत असते नि कालौघात आपले अस्तित्व टिकवून ठेवत असते. छत्रपती शिवाजी महाराज नि छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान तर मराठी व हिंदुजनांच्या हृदयात दैवतासारखेच, पण त्यांच्याच नावाला समर्थन द्यावेसे पवारांना वाटले नाही. यावरुनच छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेताच मूळव्याध झाल्यासारखे ठणाणा बोंबलत विरोध करणार्‍यांच्या रांगेत पवारांचाही समावेश होतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
 
आणखी एक मुद्दा म्हणजे शरद पवार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, पण त्यांनी कोणत्या गोष्टीकडे कधी गांभीर्याने पाहिले होते? राजकारणात आल्यापासून फोडाफोडी करत, लावालावी करतच त्यांनी आपले राजकारण केले. अर्धशतकी कारकिर्दीत पवारांना साधी महाराष्ट्र तर सोडा पश्चिम महाराष्ट्रातहीस्वतःच्या समर्थकांची एकसंध आघाडी उभी करता आलेली नाही. तसे असते तर ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी वगैरेंनी मागून येऊन स्वबळावर आपापल्या राज्यांत सत्ता मिळवली, तशी पवारांनाही महाराष्ट्रात मिळवता आली असती, पण ते अजूनही 60च्या आतच आहेत. तसेच दिल्लीत पंतप्रधानकीच्या आशेने गेलेल्या पवारांनी तिथेही आपले ‘गुण’च दाखवले नि ‘विश्वासघातकी’ म्हणून नाव कमावले.
 
 
 
 
नंतर सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमधून बाहेर पडले नि त्यानंतर वर्षभरात त्यांच्याशीच आघाडी केली. पुढे केंद्रात सलग दहा वर्षे कृषिमंत्री पद मिळूनही शरद पवारांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे आपुलकीने पाहिले नाही ना कधी त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली, ते गांभीर्य नसल्यानेच ना! आताही गेली सहा वर्षे केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे नि विविध राज्यांतले मोदीविरोधक बिगरकाँग्रेस आघाडीचा मुद्दा पुढे आणत असतात, पण त्यातही पवारांसारख्या नेत्याला ज्येष्ठत्वाच्या नि अनुभवाच्या आधारावर कोणी अगत्याने बोलवल्याचे कधी दिसले नाही. ते अर्थातच त्यांच्या गांभीर्यशून्यतेमुळेच नि आजही औरंगाबादच्या नामांतराचा विषय आला तर तेव्हाही शरद पवारांनी आपल्याच गांभीर्यशून्यतेवर शिक्कामोर्तब केले, इतकेच.







@@AUTHORINFO_V1@@