मातृत्वानंतर ‘सी-सॉ’ अनुभवला - मधुराणी प्रभुलकर

16 Jan 2021 14:52:08

madhurani prabhulkar_1&nb



म्हाळगी व्याख्यानमालेत प्रकट मुलाखतीत उलगडले ‘स्त्री’चे विविध पैलू




ठाणे: “मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतर दोलायमान स्थितीमुळे काही काळ आपणही ‘सी-सॉ’ अनुभवला. तेव्हा, निराश न होता चिकाटीने आपण आपले सर्वस्व कलेला अर्पण करण्याची प्रेरणा आईकडून मिळाली,” अशी जाहीर कबुली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आईची भूमिका साकारणार्‍या मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी दिली.ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील आठवे आणि अखेरचे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.


‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’ कलावंत माधुरी ताम्हाणे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ‘रिल लाईफ’ व ‘रिअल लाईफ’मध्ये मधुराणी काय काय करते? यातील विविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. प्रारंभी प्रास्ताविकात, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी, गेली 35 वर्षे ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीनुसार व्याख्यानमालेचा हा ज्ञानदीप तेवत ठेवल्याचे स्पष्ट करून, या व्यासपीठावर आलेल्या वक्त्यांची भरभराटच झाली, अशी महतीही सांगितली. तर आभार प्रदर्शन शरद पुरोहित यांनी केले. याप्रसंगी, मालिकेचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्यासह अपूर्वा गोरे, सीमा घोगळे आणि गौरी कुलकर्णी या सहकलाकार आवर्जून उपस्थित होत्या.



‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आत्मभान आलेल्या आईच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनलेल्या मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्या अष्टपैलू कारकिर्दीचा जीवनपट मुलाखतीत उलगडला. शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊनही डॉक्टर, इंजिनियर न होता कला शाखेची कास धरून गृहिणी ते गायन, संगीत, नृत्य, लेखन, कविता, अभिनय, मुलाखतकार आणि जाहिरातीतील मॉडेल, अशा नानाविध कलाप्रकारांची पाईक असलेल्या मधुराणी, सातत्याचा शोध घेत प्रत्येक कलेचा पुरेपूर आनंद घेत असल्याने जास्त परिपूर्णतेने आयुष्य जगत असल्याचे सांगतात.





Powered By Sangraha 9.0