स्वयंसिद्ध निसर्गचित्रकार : दिलीप कुलकर्णी

15 Jan 2021 20:43:44

paint_1  H x W:


आजच्या लेखात अशाच एका स्वयंभू निसर्गचित्रकाराच्या कलासाधनेची माहिती आपण घेणार आहोत. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या गावातील ‘दी न्यू इरा हायस्कूल’मधून अध्यापनाची सेवा करून नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त झालेले दिलीप सदाशिव कुलकर्णी यांचा कलाप्रवास फारच अद्भुत आहे.


ईच्छाशक्ती असल्यास अशक्य असे काहीही राहत नाही. ‘धावे त्यालाच मार्ग सापडे’ असे सुभाषित सर्वश्रुत आहे. एखादी गोष्ट सतत आणि सातत्याने करत राहिले, तर ती गोष्ट ‘आत्मसाक्ष’ होते. लहानपणी आई-वडील सांगतात की, स्नान झाल्यावर गणेशस्तोत्र, देवाची स्तोत्रे म्हणावीत वा हनुमानचालिसा म्हणावी वगैरे... पण, आपण केवळ आई-वडील सांगतात म्हणून ही स्तोत्रं वा श्लोक म्हणत असतो. बाकी आपल्याला त्या स्तोत्रांचा, श्लोकांचा आशय वा उद्देश काहीच माहीत नसतो. परंतु, नियमित वाचनाने ती स्तोत्रं वा श्लोक पाठ होतात. या अनुभवावरून आपल्याला ध्यानात येईल की, जी कृती करताना आपण सातत्य, नियमितपणा आणि श्रद्धेने अनुभव घेतो, तीच कृती पुढे आपण आत्मसात करून त्या कृतीचेच तज्ज्ञ बनतो वा त्या कृतीचे अधिकारी बनतो. अनुभव हा मोठा गुरू असतो. श्रम वा कष्ट वा सातत्य हे अध्ययन किंवा विद्यार्थीपण जीवंत असण्याचे लक्षण मानले जाते.

रवींद्रनाथ टागोर हे वास्तविक बंगाली साहित्यिक. त्यांच्या इच्छाशक्तीमुळे ते त्यांच्या चाळीशीनंतर चित्रकार म्हणून ओळख निर्माण करू शकले. याप्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील.प्रत्येक व्यक्तीला स्वतःला मिळणारा अनुभव हाच खूप काही शिकवून जातो. या अनुभवातून जे शिकायला मिळते, ते स्मृतिप्रवण असते. शिक्षणाला म्हणजे अध्ययन करायला वयाची अट नसते. एका भाषणात सानेगुरूजी म्हणाले होते, ‘ज्याची शिकवण्याची उमेद गेली तो म्हातारा आणि ज्याला सतत नावीन्य, शिकवण्याची, इच्छाशक्तीची आवड असते, तो वयाने जरी म्हातारा असला तरी तो तरुण असतो.’ फार आशयगर्भ असं हे विधान आहे.कलेपुरतंच बोलायचं वा लिहायचं ठरलं तर कुठल्याही प्रकारच्या कला आत्मसात करण्यासाठी इच्छाशक्ती, निष्ठा, सातत्य आणि आवड असावी लागते. ‘अहं ब्रह्मास्मि’ अर्थात ‘मी ब्रह्म आहे’ असा संदेश मनाला देऊन जो अध्ययन करतो वा करू शकतो, तोच दिहीमान कार्य करू शकतो.



paint _1  H x W

आजच्या लेखात अशाच एका स्वयंभू निसर्गचित्रकाराच्या कलासाधनेची माहिती आपण घेणार आहोत. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या गावातील ‘दी न्यू इरा हायस्कूल’मधून अध्यापनाची सेवा करून नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त झालेले दिलीप सदाशिव कुलकर्णी यांचा कलाप्रवास फारच अद्भुत आहे. त्यांचे शिक्षण बीए, बीएड् असे जरी असले तरी, त्यांनी ‘ड्रॉईंग’ (’चित्रकला’) या विषयाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात अभियान राबविले आहे. त्यासाठी त्यांना दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कारदेखील मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महासंघाने त्यांना ‘कलाश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. कलेचा आणि कलोपासकाचा सन्मान होणं ही अभिनंदनीय बाब आहे. मला विचारमंथन करताना चित्रकार दिलीप कुलकर्णी यांच्यासारखे कलेचे अधिकृत म्हणजे कागदोपत्री कलाशिक्षण न घेणारे, मात्र कलाविषयक भरीव कार्य करणारे शिक्षक कला प्रसार व प्रचार करताना, शालेय विद्यार्थ्यांना कलेकडे आकर्षित करण्याचे काम करतात; मग, प्रत्यक्ष कलेचे शिक्षण घेऊन कलाशिक्षक म्हणून कार्य करणार्‍या कलाध्यापकांपेक्षा कुठेही कमी न पडणारे कार्य, यांच्या म्हणजे कुलकर्णी सरांसारख्या इतर विषय तज्ज्ञांकडून होते आहे. असेच कार्य कलाशिक्षकांकडूनही अधिक गतीने झाले, तर कलाक्षेत्रासाठी सुप्त कलाविषयक गुण असणारेच कलाविद्यार्थी येतील, असा विचार व्हावयास आणि करावयास हवा वाटते.चित्रकार दिलीप कुलकर्णी हे सेवेत होते, त्याहूनही अधिक उत्साहाने निसर्गचित्रणासाठी भ्रमण करतात. कोकणपट्ट्यापासून तर महाराष्ट्राच्या आणि काही प्रांतांच्या स्थळांना भेटी देताना ते ‘ऑन द स्पॉट’ ‘लॅण्डस्केप्स’ करतात. एकदा नाशिक येथील निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांच्याबरोबर एका प्रात्यक्षिकाच्या वेळी निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले आणि त्या क्षणापासून त्यांनी ध्यास घेतला, आता ते निसर्ग चित्रणातच व्यग्र असतात.
जगप्रसिद्ध निसर्गचित्रकार पॉल यांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे की, “निसर्गचित्रण करताना कागदावर जेव्हा प्रतिनिसर्ग निर्माण होतो, तेव्हा आपणच निसर्ग बनत असतो.” मला वाटतं चित्रकार दिलीप कुलकर्णी हे खर्‍या अर्थाने निसर्गाला वाचणारे, निसर्ग जगणारे आणि निसर्गाशी एकरुप झालेले चित्रकार आहेत. त्यांना प्रचलित कलाशिक्षण घेऊन कलाकार असलेल्या कलागुरुंकडून मार्गदर्शन मिळालेले नाही. चित्रकार दिलीप कुलकर्णी सांगतात, “निसर्ग हाच त्यांचा गुरु आहे. कागदावर निसर्गचित्रण करताना कोणत्या जागी कोणता रंग घ्यायचा, हे निसर्गच मला शिकवतो.‘’ अशी बोलण्यातील भाषा ही फक्त कलेशी आणि ध्येयांशी एकरुप झालेली व्यक्तीच बोलू शकते. निसर्गचित्रकार कुलकर्णी यांच्या निसर्गचित्रणातील घटक त्यांचं कागदावरील ‘रेंडरिंग’, रंगांचं कागदावरील अवतरण या सर्व बाबी ‘दर्दी’ आणि ‘मॅच्युअर्ड’ कलाकाराप्रमाणेच आहेत. रंगांचे ‘फ्लो’, रंगांचे एकमेकांत मिसळणे आणि रंगाकारांची कागदावरील रचना वा संकलन यांचं सादरीकरण अत्यंत सहज, निसर्गानुसारी रंगांची शुद्धता, त्यांचं लेपन, यथार्थ दर्शनाचा भास आणि आभास निर्माण करण्याची अद्भुतता या सर्व बाबी म्हणजे स्वतंत्र शैलीतील कुलकर्णी यांच्या निसर्गचित्रणांची वैशिष्ट्ये ठरावीत.त्यांच्या निसर्गचित्रण प्रवासाला कलामय किनार लाभावी आणि त्यांच्या कलाजीवनाला सुदृढता लाभावी, या सदिच्छा...!

- प्रा. गजानन शेपाळ 
8108040213
Powered By Sangraha 9.0