दुबईचा राजा करणार पाकिस्तानमध्ये ७०० बस्टर्ड पक्ष्यांची शिकार; सरकारची मंजुरी

    दिनांक  13-Jan-2021 17:46:24
|

bird _1  H x W:


दुबईचे शाही कुटुंब सुट्टीसाठी पाकिस्तानमध्ये 


मुंबई (प्रतिनिधी) - दुबईच्या शाही कुटुंबाला पाकिस्तानमध्ये 'होबारा बस्टर्ड' या पक्ष्यांची शिकार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे शाही कुटुंब पाकिस्तानमध्ये सुट्टीसाठी दाखल होणार आहे. यावेळी ७०० पक्ष्यांची शिकार करण्यास पाकिस्तान सरकारने त्यांना मंजुरी दिली आहे. या पक्ष्याच्या शिकारीवर पाकिस्तानमध्ये बंदी असताना देखील इमरान खान सरकाराने केवळ शाही कुटुंबाला खुष करण्य़ासाठी हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. 
 
 
दुबई बहरीनचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम हे पाकिस्तानमध्ये सुट्टी घालविण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत काऊन प्रिन्स, अर्थ आणि उद्योग मंत्री, पोलीस उपप्रमुख, लष्कराचे एक अधिकारी, शाही कुटुंबातील दोन सदस्य आणि एक उद्योगपती असतील. या लोकांची बडदास्त म्हणून त्यांना 'होबारा बस्टर्ड' या पक्ष्यांची शिकार करण्याची परवानगी देण्यात आलीय. हा पक्षी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रातांत हिवाळ्यामध्ये स्थलांतर करुन येतो. याठिकाणी मध्यपूर्व देशातील अनेक राजे आणि राजकुमार या पक्ष्याची शिकार करण्यासाठी येतात. शिवाय दरवर्षी आखाती देशातील कुटुंबही शिकारी करण्यात या प्रदेशात फिरतात. 

 
 
पाकिस्तानमधील 'डाॅन' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी होबार पक्ष्यांची शिकार करण्यासाठी शाही कुटुंबाला परवानगी दिली आहे. या परवानगीची पत्र संयुक्त अरब अमिरातीच्या दूतावासाला पाठविण्यात आली आहेत. याच खान यांनी विरोधी पक्षात असताना शाही कुटुंबांमार्फंत होणाऱ्या होबारा बस्टर्ड पक्ष्यांच्या शिकारीला विरोध केला होता. मात्र, आता देशाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षीही पाकिस्तानने शाही कुटुंबाला या पक्ष्यांच्या शिकारीची परवानगी दिली होती. त्यातून पाकिस्तानला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. महत्त्वाचे म्हणजे बहरीनच्या या शाही कुटुंबातील सात जणांना प्रत्येकी १०० पक्ष्यांची शिकार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.