ऐसा भिक्षेचा महिमा।

    दिनांक  13-Jan-2021 21:21:50
|

Bhiksha _1  H x
 
 
 
 
भिक्षा दिसायला सामान्य असली तरी त्यात अनेक गुण दडलेले आहेत. भिक्षा मागणार्‍याची स्थिती निर्भय असते. महंताला अनुकूल गुण भिक्षेतून प्रगट होतात, नि:स्पृहता अंगी बाणते. भिक्षा ही अमृतवल्ली आहे, ती कामधेनू आहे. भिक्षेने आपल्या कार्यासाठी भरपूर वेळ मिळतो. लोकसंग्रह करणार्‍याला लोकांमध्ये मान्यता मिळते. असे अनेक फायदे स्वामींनी सांगितले आहेत.
 
 
 
 
‘समर्थांनी जागोजागी मठांची स्थापना करुन संप्रदायाच्या कामासाठी तेथे महंतांची योजना केली, हे आपण मागील लेखात पाहिले. समर्थांनी उभा केलेला हा प्रचंड व्याप, हिंदुस्थानभर पसरलेले मठ-महंतांचे जाळे सांभाळण्यासाठी द्रव्याची काय सोय केली होती, असा प्रश्न मनात उभा राहतो. संप्रदायाच्या या कार्यासाठी समर्थांनी कुणाकडूनही एका पैशाच्या देणगीची अपेक्षा ठेवली नव्हती. त्यांनी ना कुणा धनिकाकडे मदतीसाठी हात पसरले, ना कुणा राजाला विनंती केली. या प्रचंड कार्याच्या व्यापासाठी त्यांनी भिक्षेवर भर दिला. जनसमुदायाच्या समजुतदारपणावर त्यांचा विश्वास होता.
 
 
 
 
भिक्षेवर सर्व व्याप सांभाळल्याने समर्थ अथवा संप्रदाय ना कुणा सत्याधिशांचा मिंधे झाले, ना कोणी त्यांच्यावर आपल्या विचारांचा दबाव टाकू शकले, संघटन कौशल्याच्या जोरावर समर्थांनी मठ-महंतांचा डोलारा उभा केला आणि महंतांना, शिष्यांना स्वायत्त भिक्षेची महती सांगितली, भिक्षेचे महत्त्व त्यांना पटवून दिले. भिक्षा हे काही पोट भरण्याचे साधन नसून ते सांप्रदायिकांसाठी व्रताचरण होते. त्याची कुणाला लाज वाटत नसे. संप्रदायाची दीक्षा देताना शिष्यांना, महंतांना काही वस्तू दिल्या जात. त्या म्हणजे डोक्याला बांधण्यासाठी शिरोवस्त्र, कमरेला गुंडाळण्यासाठी एक वस्त्र ज्याला ‘मेखला’ म्हणत. कमरेला बांधण्यासाठी रामनामांकित चिन्ह, एक भगवे निशाण आणि खांद्यावर बाळगायची झोळी. गुरुकडून मिळालेली झोळी असेल म्हणजे मानाने गुरुआज्ञा म्हणून भिक्षा घेता येत होती. महंतांनी वेगवेगळे प्रदेश हिंडून लोकांच्या ओळखी करुन घ्याव्या व त्यांना आपल्या कार्याची माहिती द्यावी, असे जो करतो, त्याला भिक्षा मागणे शोभून दिसते, असे समर्थ म्हणतात.
 
 
 
 
नित्य नूतन हिंडावें। उदंड देशाटन करावें।
तरीच भिक्षा मागता बरवे। श्लाघ्यवाणे॥
 
 
 
 
महंतांनी शिष्यांनी भिक्षेचा अभ्यास करावा. सांप्रदायिक कार्यासाठी जनसमुदाय मिळवण्याचे भिक्षा हे एक साधन आहे. देशाटन करुन देशस्थिती न्याहाळावी, हे भिक्षेच्या निमित्ताने घडत होते. भिक्षा म्हणजे पोट भरण्याचे साधन नाही, हे महंतांना शिकवले गेले होते. समर्थांनी दासबोधात ‘भिक्षा निरुपण’ नावाचा एक समास लिहिला आहे. समासाच्या सुरुवातीसच ‘भिक्षा ही ब्राह्मणाची दीक्षा आहे,’ असे म्हटले आहे. ब्राह्मणाने ‘ॐ भवति भिक्षांदेही’ या ब्रीदाचे रक्षण केले पाहिजे. ध्येयप्राप्तीसाठी ध्यान-धारणेचा अभ्यास करणार्‍या साधकाला प्रपंचाकडे अथवा आपल्या देहाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.

 
 
अशारीतीने सर्वसंग परित्याग करुन आत्मसाक्षात्कारासाठी संन्यासवृत्तीचा अवलंब करणार्‍याला देहापुरते अन्न मागण्याचा अधिकार शास्त्रकारांनी दिला आहे. अखंड अभ्यास करुन समाजजीवनाची वेगवेगळी तत्त्वे शोधणार्‍या अभ्यासकामुळे समाज जीवंत राहतो, अशा अभ्यासकाला दैनंदिन जीवनासाठी जरुरीपुरते अन्न-वस्त्र पुरवणे ही एक प्रकारे समाजाची नैतिक जबाबदारी समजली जाई. केवळ अध्ययन व अध्यापन करणार्‍या आश्रमवासी ऋषिमुनींच्या चरितार्थाची सोय पूर्वी समाजव्यवस्था करीत असे. त्यामुळे अशा महान विचारवंतांना भिक्षा देताना, भिक्षा देणार्‍याला आपला सन्मान झाल्यासारखे वाटत असे. समाजहितासाठी, धर्म व संस्कृती रक्षणासाठी झटणार्‍या, लोकसंग्रह करणार्‍या पुरुषाने भिक्षा मागण्यात कमीपणा नव्हता.
 
 
 
वैराग्य लक्षणांसाठी देहबुद्धी कमी करणे आवश्यक असते, देहबुद्धीत मन दृश्य जगताला कवटाळून बसलेले असते. दृश्य जगतावरील प्रेम कमी करुन ते भगवंताकडे वळवले की, त्यायोगे भक्तिमार्ग साधता येतो. अभ्यासाने दृश्य जगताची अशाश्वतता समजून घेणे, हा ज्ञानयोगाचा मार्ग. त्याने मन शाश्वत सुखाचा मार्ग शोधू लागते. भक्तिमार्ग असो अथवा ज्ञानमार्ग असो, एकदा का दृश्याच्या कचाट्यातून मन वेगळे झाले की वैराग्याची पहाट उगवते. मन सुखाचा शोध घेण्यासाठी भगवंतावर पूर्ण भरवसा ठेवते आणि देहबुद्धी हळूहळू कमी होते. भिक्षेने देहबुद्धी कमी करता येते व वैराग्याचा उदय होतो, म्हणून अध्यात्मात भिक्षेला स्थान दिलेले आढळते. भगवंतालासुद्धा भिक्षा पसंत आहे, असे दिसून येते. भगवान शंकर, गुरुदत्तात्रेय, गोररक्षनाथादी सिद्ध पुरुष भिक्षा मागतात, असे सांगितले आहे.
 
 
 
ऐसा भिक्षेचा महिमा ।
भिक्षा माने सर्वोत्तमा॥
ईश्वराचा अगाध महिमा।
तोही भिक्षा मागे॥
दत्तगोरक्ष आदिकरुनी ।
सिद्ध भिक्ष मागती जनी॥
निस्पृहता भिक्षेपासुनी।
प्रगट होये ॥(दा.१४.२.४. व ५)
 
 
 
आजही गाणगापूर या तीर्थक्षेत्री दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष दत्त भिक्षेकर्‍याच्या रुपाने येऊन भिक्षा घेऊन जातात, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. समर्थांनी ‘भिक्षा निरुपण’ या समासात भिक्षेचे फायदे, पद्धती समजून सांगितल्या आहेत. पूर्वी वार लावून जेवण्याची पद्धत होती, ठरवून दिलेल्या दिवशी, म्हणजे वारी एकेका घरात जेवायला जाणे म्हणजे वार लावणे. गरीब विद्यार्थी वार लावून शिक्षण पूर्ण करत. तथापि महंतांनी वार लावून जेवणे स्वामींना मान्य नव्हते. समर्थांच्या मते, जो महंत वार लावून जेवतो, तो पराधीन होतो अथवा एकाच घरी जो महंत जेवायला जातो बोलतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. पराधीन अथवा स्वातंत्र्य गमावलेला शिष्य, महंत संप्रदायाचे कार्य नि:स्पृहपणे करू शकणार नाही.
 
 
 
 
भिक्षा मागताना ती समाधानी चेहर्‍याने मागावी. उगीच किरकिर करत मागू नये. काही घरांतून भिक्षा मिळाली नाही, तर इतर ठिकाणी भिक्षा मागण्यास थकून जाऊ नये, निराश होऊ नये. त्यानिमित्ताने आपले परिभ्रमण होते. ठरावीक घरीच भिक्षा न मागता रोज नवनवीन ठिकाणे, वेगळी माणसे शोधावी. भिक्षेच्या निमित्ताने माणसाची परीक्षा करावी व आपल्या कार्यास अनुकूल माणसे हेरून आपला लोकसंग्रह वाढवावा. भिक्षा मागणार्‍याने दारापुढे ‘भवति भिक्षान् देही’ असे मोठ्याने म्हणावे. पुष्कळ भिक्षा आणली तरी त्यातील थोडीशीच घ्यावी. आपण अल्पसंतोषी असावे. सूपभर आणले तरी मूठभरच घ्यावे आणि मोठ्या आदराने त्याचा स्वीकार करावा, जास्त आणलेले नम्रतेने परत करावे. याला ‘अल्पसंतोषी’ म्हटले आहे.
 
 
 
 
काही भिक्षा आहे म्हणावें ।
अल्पसंतोषी असावें ।
बहुत आणिता घ्यावें ।
मुष्टी एक ॥
 
 
भिक्षा दिसायला सामान्य असली तरी त्यात अनेक गुण दडलेले आहेत. भिक्षा मागणार्‍याची स्थिती निर्भय असते. महंताला अनुकूल गुण भिक्षेतून प्रगट होतात, नि:स्पृहता अंगी बाणते. भिक्षा ही अमृतवल्ली आहे, ती कामधेनू आहे. भिक्षेने आपल्या कार्यासाठी भरपूर वेळ मिळतो. लोकसंग्रह करणार्‍याला लोकांमध्ये मान्यता मिळते. असे अनेक फायदे स्वामींनी सांगितले आहेत. म्हणून ‘विसंबो नये झोळीसी’ असे समर्थ शिष्यांना, महंतांना सांगतात. भिक्षेने आपले स्वातंत्र्य अबाधित राहते, मिंधेपण येत नाही, ओळखी वाढतात, भ्रम नाहीसे होतात. मुख्य म्हणजे, कुठल्याही दूरच्या मुलुखात गेलात तरी ही माझी माणसे आहेत, हा माझा देश आहे अशी प्रचिती भिक्षेमुळे येते.
 
 
भिक्षेने वोळखी होती ।
भिक्षेने भ्रम चुकती ॥
अखंड भिक्षेचा अभ्यास ।
तयास वाटेना परदेश ॥
जिकडे तिकडे स्वदेश ।
भुवन त्रैं ॥ (रा. १४.२.९)
 
 
 
 
समर्थांचे भिक्षेसंबंधी हे विचार साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहेत, हे नीट समजून त्याविषयी आदर बाळगावा. आज काळ बदलला आहे. भिक्षेचे स्वरूप व पद्धती बदलल्या आहेत. तथापि निःस्वार्थपणे समाजकार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना समाजाने प्रोत्साहन व स्पंदन दिली पाहिजे, हीच त्यांना दिलेली भिक्षा समजावी!

- सुरेश जाखडी
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.