‘आत्मनिर्भरते’चा वैदू मेळावा

13 Jan 2021 12:36:18

Vaidu Melava_1  
 
 
 

‘कै. अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व ‘संवर्धन प्रतिष्ठान’ कर्जत येथे दि. ५ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील वैदू (पारंपरिक आयुर्वेदिक औषधे व उपचार करणारे व्यावसायिक) मंडळींचे एकत्रीकरण मार्गदर्शनपर वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे प्रमुख अतिथी होते, वैद्य वंदन महाराज आणि प्रमुख वक्ते होते विवेक भागवत (प्रांत सेवा प्रमुख, कोकण प्रांत). सदर मेळाव्यातील घेतलेला आढावा...
 
 
 
वनबांधवांचे खडतर जीवन
सुसह्य करूया सहवासाने...
समरस सशक्त समाज करूया
हाच उद्याचा बलशाली भारत...
 
 
या सूत्रानुसार सेवाकार्य करणारे ‘अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान’ कर्जतपासून काही अंतरावर असलेल्या नांगुर्ले गावी साडेसहा एकरावर वसले आहे. प्रतिष्ठानच्या परिसरात प्रवेश केल्यावरच कृत्रिमतेचे कवच गळून पडते. निसर्ग आणि त्याचे साधेपण सोबतीला स्वत:हून येते. छोट्या-छोट्या टेकड्या आणि त्यावर ऐसपैस विसावलेली वृक्षराजी. ही वृक्षराजी नुसती हिरवळीसाठी किंवा गंमत म्हणून लावलेली नाहीत. यामध्ये अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आहेत. या प्रतिष्ठानतर्फे वैदूंचा मेळावा आयोजित केला होता. प्रकल्पाचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे आहेत. वनौषधींचे संवर्धन व संशोधन करून त्याचा उपयोग वनवासी बंधूंच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी करावा, वनवासी बांधवांना प्रशिक्षण द्यावे, स्वावलंबी करावे, असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. संघटन सेवा, संशोधन आणि ग्रामविकास अशा चतु:सुत्रीच्या आधारे प्रकल्पाचे कार्य सुरू आहे.
 
 
मेळाव्याच्या स्थळी जाण्यापूर्वी मेळाव्याच्या आयोजकांपैकी एक नंदू मणेर यांना विचारले, “साधारण किती जण असतील मेळाव्यात? तर ते उत्साहाने म्हणाले, “40 जण आले तरी उत्तम. मागच्या वेळीसुद्धा आम्ही अशा मेळाव्याचे आयोजन केले होते. पण तो प्रयोग काही यशस्वी झाला नाही. आता खूप प्रयत्न केलेत. त्यामुळे ३५ जणांची खात्री वाटते.” त्यांचे म्हणणे ऐकून वाटले, समाजाचा मेळावा तोही इतक्या प्रतिष्ठीत सेवाभावी प्रकल्पामध्ये घेतला आहे. मेळाव्याची तयारीही साग्रसंगीत केली आहे. पण, केवळ ३५ ते ४० लोक येण्याची अपेक्षा. का बरं वैदू समाज या मेळाव्याकडे पाठ पिरवत असेल? विचारावेसे वाटले, पण नंदू यांचा उत्साह पाहून मन आवरले. असो. मनातला प्रश्नकल्लोळ सावरत मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलो. प्रकल्पाच्या हॉलमध्ये ४० खुर्च्या मांडलेल्या. तिथे रायगडचे रा. स्व. संघाचे प्रचारक निलेश मुळीक होते. त्यांना सांशकतेने विचारले, “दादा मेळावा आहे ना?” तर तेही उत्साहात म्हणाले, “हो...हो... यावेळी छान मेळावा होणार."
 
निलेश म्हणाले, “तुम्हाला वैदू समाजाबद्दल काही माहिती हवी असेल, तर तुम्ही सोनूबाबा म्हसेकर आणि जगन हिलीम यांच्याशी बोला.” त्या दोघांशी वैदू समाजाबद्दल बोलू लागले. मी विचारले, “समाजाच्या चालीरीती काय आहेत?” यावर ते म्हणाले, “त्या त्या समाजानुसार असतात. पण पथ्यं मात्र सर्वांची सारखीच असतात.” “त्या त्या समाजाची म्हणजे? इथे केवळ वैदूच समाजमेळावा आहे ना?” यावर निलेश म्हणाले, “ताई, वैदू म्हणजे तुम्ही जो समजता तो जातीनिहाय वैदू समाज नाही, तर इथे प्रत्येक जातीतल्या वनऔषधी उपचार करणाऱ्या वैदूंचा मेळावा आहे. त्यांना त्या त्या समाजात वैदू भगत मांत्रिक पण म्हणतात. हे सारे निसर्गानुरूपच उपचारपद्धती करतात.” अच्छा म्हणजे हा काही वैदू समाजाचा मेळावा नव्हता, तर कर्जत तालुक्यातील प्रत्येक समाजातील पारंपरिक वैदूचा मेळावा होता. इथे वनवासी समाजाचे वैदू तर आले होतेच, पण आगरी आणि मराठा समाजाचेही वैदू आले होते. परंपरागत त्यांच्याकडे वैदू परंपरेचा वारसा आलेला होता. जंगलातील वनौषधींचा वापर करून समाजबांधवांवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा होता. हे ऐकून मला नंदू मणेर आणि निलेश यांच्या उत्साहाचा अर्थ लागला. कारण, ज्याला समाजात मान-सन्मान आहे, देवासारखा ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो, अशा व्यक्तीला मेळाव्याला उपस्थित करणे, हे काही सोपे नाही. त्यातही विविध समाजाचे वैदू एकत्रित करणे, ही तर अशक्य बाब.
 
 
पण हे आवाहन ‘अनंत श्रीधर ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान’ने पेलले. ते म्हणतात ना, ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे’. न्याहारी करताना सगळे वैदू आपापसात गप्पा मारत होते. त्यात ‘मी या जातीचा किंवा तू त्या जातीचा किंवा मलाच सारे माहिती, तुला थोडेच माहिती...’ वगैरे भाव नव्हता. एका तालुक्यातले असल्यामुळे त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. ते सगळे विभिन्न जातीचे होते. मात्र, बोलण्याची पद्धत एकसारखीच, मृदू. सोनूबाबांना विचारले की, “तुम्ही मघाशी पथ्यांबाबत काय म्हणत होता? कोणती पथ्यं पाळावी लागतात?” तर त्यांनी सांगितले की, “जेवताना कुणी झाडूने कचरा काढला, केस विंचरले किंवा एखादी वस्तू तुटली किंवा जेवत असताना अभद्र बोलले, निषिद्ध क्रियांचा, वस्तूंचा उल्लेख केला तर आम्ही वैदू त्या भरल्या ताटावरून उठतो. तसेच मासिक पाळी आलेल्या स्त्रीच्या हातचे खाणेही आम्हाला निषिद्ध आहे. तसेच औषधोपचाराला लागणाऱ्या वनस्पती आणण्यासाठी किंवा त्यांची साले, मुळे, पाने, फळे तोडण्यासाठी आधी वैदूंना पूजा करायला लागते. विशिष्ट वेळ मनात धरून त्यावेळी वनस्पती किंवा वनस्पतीजन्य भाग आणावे लागते. त्यासाठी आधी त्यांची परवानगी घ्यावी लागते. सूर्य मावळल्यानंतर आम्ही वनौषधी आणत नाही.”“पण जर रात्रीच एखाद्याला त्रास झाला; समजा, साप किंवा विंचू चावला तरीही तुम्ही वनौषधी आणणार नाही?” यावर म्हणाले की, “आणणार, पण त्यासाठी त्या वनौषधींची परवानगी घ्यावी लागते. वनस्पतीला जागवावे लागते. विनंती करावी लागते की, ‘सूर्य मावळला आहे, तुम्ही निद्रेत आहात. निद्रेत असताना तुमच्या पाने-फळे-मुळे-सालीला हात लावू शकत नाही. तुम्ही जाग्या व्हा.’ मग त्यांना हलकेच हलवून त्यांचा पाहिजे तो भाग घेतला जातो. बघता बघता इतर वैदूही तिथे जमले. त्यांच्या चेहऱ्यावर असिम श्रद्धा होती. त्यांना विचारले, “मासिक पाळी आलेल्या स्त्रीच्या हातचे का खायचे नाही? आता तर विज्ञान खूप पुढे गेले.” यावर म्हणाले की, “हो ! तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण, जी पथ्यं वाडवडिलांनी सांगितली ती पाळली पाहिजेत. काही वैदूंनी परंपरा मोडली आणि त्यांच्या हातचा गुण गेला. आता हा योगायोग असेलही. पण, त्यामुळे आम्ही परंपरा पाळतो. तुम्ही सर्वेक्षण करू शकता जे वैदू परंपरेंचे आणि नियमांचे पालन करतात, त्यांच्या हाताला जो गुण आहे, तो परंपरा मोडणाऱ्या वैदूच्या हाताला नाही. यावर उपस्थित सर्वांनी एकमुखाने मान डोलावली. अर्थात त्यांच्या श्रद्धेला गालबोट लावणारी मी कोण? तेच नाहीत तर गावकऱ्यांचेही म्हणणे हेच होते की, परंपरेचे व्रत पाळणाऱ्या वैदूंनाच वनऔषधी प्रसन्न होते.
 
 
न्याहारी आटोपली आणि मुख्य मेळावा सुरू झाला. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात झाली. आयोजकांना ३५ वैदू अपेक्षित होते, पण इथे तर ६०च्या आसपास वैदू उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत औक्षण करून केले गेले. प्रत्येक वैदू विशिष्ट आजारांच्या उपचारासाठी प्रसिद्ध होता. प्रत्येकाने आपण कोणत्या आजारावर काय उपचार करतो, हे सांगितले. त्यात ताप, सर्दी, खोकला, कफ यांबरोबरच मधुमेह, वात, शारीरिक दुर्बलता, त्वचाविकार, साप-विंचू चावणे वगैरे आजारांच्या उपचारासंदर्भात माहिती दिली गेली. या आजारांवर कोणती वनौषधी उपयोगी पडेल यावर चर्चा केली गेली. पण काही वैदूंनी माहिती सांगण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे की, त्यांच्या गुरूंच्या (ज्या गुरूंनी वनौषधीबद्दल माहिती दिली होती त्यांच्या) परवानगीशिवाय ते कोणत्याही वनौषधीची माहिती देऊ शकत नाहीत). या सर्वांची भाषा, पेहराव वेगवेगळे होते. मात्र, त्यांच्या सर्वांमधला आत्मविश्वास मात्र समान होता. पालघरचे जगन हिलीम यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लोक भयभीत झाले. त्यावेळी आमच्या पालघरमध्ये वनवासी पाड्यांवर बैठका झाल्या. त्यामध्ये गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि वैदू हे प्रमुख होते. या सगळ्यांनी मिळून गावातल्या पाड्यातल्या लोकांशी चर्चा केली की, आपण आपल्या परिसरात कोरोना अजिबात फिरकू द्यायचा नाही. त्यावेळी पोलीस पाटलांनी गर्दी नियंत्रित करण्याबाबत जबाबदारी घेतली. सरपंचांनी इतर जबाबदाऱ्या, तर वैदूंनी लोकांच्या दैनंदिन आरोग्याची काटेकोर जबाबदारी घेतली. खेड्यापाड्यात कुठे आले आयुष आणि इतर काढे? पण वैदूंनी कोरोनाची लक्षण पाहिली. ताप, सर्दी, खोकला ही प्राथमिक लक्षणं. वैदूंनी गुळवेलीचा काढा बनवला. गावखेड्यांमध्ये लोकांना वितरीत केला. म्हणतात की, ज्या ज्या पाड्यांमध्ये अशा प्रकारच्या बैठका झाल्या, त्या पाड्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही.”
 
 
यावर एक वैदू म्हणाले की, कोरोनावर औषध देतो म्हणून काही गावांमध्ये तर वैदूंना पोलिसांनी मारहाण केली. मग असे कसे? यावर जगन म्हणाले की, ”हो असे एखाददुसऱ्या ठिकाणी झाले खरे. पण का? माहिती आहे का? कारण, त्यांनी प्रसार माध्यमावर जाहिरात केली होती की, आम्ही कोरोना बरा करू. मुळात आम्ही वैदू कोरोना बरा करण्याचे औषध देत नव्हतो, तर कोरोना होऊच नये म्हणून प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी वनौषधी देत होतो. त्यामुळे आम्ही कोरोना बरा करतो, असे म्हणणे म्हणजे समाजाची दिशाभूल करण्यासारखे होते. त्यामुळे त्या एकदोघांना पोलिसांनी पकडले.” इतक्यात एक वैदू म्हणाले, “हो, पण वनौषधी इतक्या उपयोगाच्या आहेत, तर फॉरेस्टवाले आम्हाला जंगलात का जाऊ देत नाहीत?” यावर ते म्हणाले की, “अश्वगंधा, उपळसरी, एरंड, कुडा, अडुळसा, कोरफड, गुळवेळ, टाकळा, रिंगणी या वनस्पती विनासायास मिळायच्या ना? आता मिळतात का? कारण, या वनस्पतींना उपचारासाठी आपण तोडत गेलो. पण त्यांचे संवर्धन केले गेले नाही. त्या संपूर्ण नष्ट झाल्या तर आपलेच नुकसान आहे. त्यापेक्षा त्या वनअधिकाऱ्यांकडून या वनस्पतींची रोपे मागून घ्या. त्यांचे संवर्धन करा. तुम्हाला तर या वनौषधींचे ज्ञान आहे.” पुढे जगन यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्याही वैदूंसाठी सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली. यावर एकाने प्रश्न केला की, “वैदू तर प्रत्येक समाजात आहेत. मग तिथे जातीचा निकष आहे का? खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या वैदूला या सुविधा मिळणार नाहीत का?” यावर जगन म्हणाले, “इथे जातीचा संबंध नाही. गावातल्या सरपंचाने किंवा तत्सम मान्यताप्रद व्यक्तीने तुम्ही गावचे वैदू आहात, असे प्रशस्तिपत्रक द्यायला हवे किंवा वैदू म्हणून तुम्ही आजपर्यंत किती जणांना आजारातून मुक्त केले, याचा पुरावा हवा. यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण माहिती मिळेल.” जगन यांचे म्हणणे ऐकून उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली की, अरे आजपर्यंत कुणालाच हे माहिती नव्हते. आपण तर पिढ्यानपिढ्या वैदू आहोत. गावात मान्यता आहे. समाजात मान्यता आहे. पुढे जगन यांनी वनवासी बांधवांचे मतपरिर्वतन करणाऱ्या काही समाजविघातक लोकांबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की, आपल्या समाजात काही प्रथा आहेत, त्या प्रथांमुळे कुणाचेच नुकसान होत नाही, तर समाजाला आनंद मिळतो. त्या प्रथा सोडून द्या, असे काही लोक सांगतात. हेच लोक तुम्हाला सांगतात की, जनगणनेमध्ये तुम्ही हिंदू धर्माचे आहात असे सांगू नका. यांना विचारा की, आम्ही हिंदू नाही तर कोण आहोत? आम्ही मुस्लीम नाही ना ख्रिश्चन. आमच्या सगळ्या परंपरा, प्रथा-कुलाचार हिंदू धर्मातल्याच आहेत, मग आम्ही हिंदू धर्मच सांगणार. यावर उपस्थितांनी संमती दर्शवली.
 
 
सोनूबाबा म्हसेकर म्हणाले की, “आपण सगळे वैदू आहोत. आपल्याला आता वनौषधी लवकर मिळत नाही. पण का मिळत नाही. तर जिथे दोन पानांची गरज असते तिथे काही लोक ५० पाने तोडतात. काही तर मुळासकट झाडे उपटतात. या झाडांचेही कुटुंब असतं. त्यांच्या मुळावर घाव घातल्यावर ते कुटुंब मेल्यावर आपण बनवलेल्या औषधाला गुण लागणार का? त्यामुळे वृक्षराजींचे संवर्धन करा. आपली औषधांची माहिती, आपली वाद्ये, आपली कला हे सगळे आपले वैभव आहे. ते का संपवायचे? तो पिढीजात वारसा आहे. तो जपला पाहिजे. वैदू म्हणजे प्रतिष्ठा आहे. मी वैदू असून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदिवासी सेवेबद्दल पुरस्कार मिळाला. वैदूला मिळालेला हा पहिला सन्मान आहे. याचाच अर्थ आपल्या ज्ञानाची आणि आरोग्यसेवेची दखल राजमान्य आहे. त्यामुळे आपण आपल्या वैदू कार्यात पावित्र्य आणि मांगल्य राखत लोकांची आरोग्य सेवा केली पाहिजे.” यावेळी वैद्य वंदन महाराज यांनीही आयुर्वेदिक वनस्पती आणि त्यांच्या उपयोगाबाबत माहिती दिली. तसेच या वनस्पतींच्या बाबतीतल्या माहितीची देवाणघेवाण व्हायला हवी. आपल्या याबाबतची ज्ञानाची कक्षा रूंदवायला हवी, असे मत त्यांनी मांडले. या वैदू मेळाव्यासाठी अण्णा मोकल, अशोक शेडगे, अनिल हरपुडे, नंद मणेर आणि इतर सर्वच संबंधितांनी खूपच मेहनत घेतली होती. कर्जत तालुक्यातील सर्व समाजातील वैदू एकत्र यावेत, या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या मेळाव्यामुळे उपस्थित वैदूंचे म्हणणे होते की आम्ही अत्यंत आनंदित आहोत. आमच्या ज्ञानाचा परंपरेचा सन्मान होत आहे. प्रस्थापित व्यवस्था आदराने बोलावेल. काही वनस्पती आम्हाला माहिती होत्या. आज इतर वैदूंशी बोलल्यामुळे इतर काही वनस्पतींबाबत ज्ञान मिळाले. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांसाठी भोजन होते. तिथे सर्वच समाजातले वैदू एकाच पंक्तीत बसले होते. तिथे ना कुणी मराठा होते, ना आगरी, ना वारली. ते सगळे हिंदू आरोग्य परंपरेत समरस असलेले वैदू होते.
 
मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते कोकण प्रांतचे सेवाप्रमुख विवेक भागवत. ते म्हणाले,“मुळात आजार झाल्यावर उपचार करणे ही आपली परंपरा नाही. आजार होऊ नये यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे, दिशा दाखवणे हे काम वैदूंचे आहे. वैदूंकडे अफाट ज्ञान आहे. पण ते ज्ञान त्या त्या कुटुंबामध्येच राहते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, एका कुटुंबाला आरोग्य-उपचाराबाबत मौलिक ज्ञान होते. पण दुर्दैवाने त्या कुटुंबाला वारस नाही. ते ज्ञान त्या पिढीनंतर उपलब्ध होत नाही. कृपा करून आपले ज्ञान पुढच्या पिढीला द्या. एखाद्या औषधाची बाटली पाहिली तर त्यावर त्या औषधाबाबत पूर्ण माहिती असते. त्याचे फायदे आणि ते औषध घेतल्यावर काय टाळले पाहिजे हे लिहिलेले असते. वैदू जेव्हा औषधोपचार करतात तेव्हा त्या वनौषधीबाबत माहिती सहसा लिहिलेली नसते. जर वैदूंनीही आपल्या वनौषधींचा असा ब्रॅण्ड तयार केला तर पारंपरिक रूग्णांबरोबरच इतरही लोक औषधोपचाराकडे वळतील. तसेच तुम्हाला ज्या वनस्पती सहजासहजी मिळत नाहीत, त्या वनस्पतींची नावे ‘ओक वनौषधी संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान’ला द्या. ती औषधी वनस्पती मिळवून द्यायची व्यवस्था ते करतील. वैदू परंपरा ही प्राचीन असून सध्याच्या आधुनिक जगात या परंपरेची सांगड घालून आपल्याला मार्गक्रमण करायला हवे. वैदू हे आरोग्य सेवाकार्यातले अग्रदूत आहेत. गावात, समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आहे. पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वारसा न्या, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आत्मनिर्भर भारतासाठी आपली समृद्ध वैदिक पंरपरा जपणेही गरजेचे आहे. प्राचीन औषधी ज्ञानाच्या आधुनिक उपयोगामुळे औषधी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे पाऊल पडणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0