घरी करा मकरसंक्रांती; नभी पतंगाने भ्रमंती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |

Makar Sankrant_1 &nb
 
 
 
 
आज मकरसंक्रांत. भारतीय पौष महिन्यात व इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे जानेवारीत येणारा एक शेतीसंबंधित सण. सौरकालगणनेशी संबंधित अशा या महत्त्वाच्या सणाच्या परंपरांचा घेतलेला हा आढावा...
 
 
 
भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. महिला उखाणे घेतात, उदाहरणार्थ-
 
 
फुलांचा सुगंध मातीसही लागे।
रावांशी जुळले जन्माचेच धागे॥
 
 
महाराष्ट्रात हा सण मुख्यत्वे तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी त्यांची नावे. संक्रांतीचा आदला दिवस 'भोगी' नावाने साजरा होतो. परिसरात उपलब्ध सर्व शेंगभाज्या वा फळभाज्या यांची तिळाची कूट घालून केलेली मिश्रभाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी आणि गुळाची पोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात. तीळगुळाला विशेष महत्त्व असते. कारण, दिवसासह मानवी शरीरयष्टीही तीळ-तीळ वाढत जाते, असा समज रूढ आहे. संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीय, मित्रमंडळी आणि लहान मुलांना तीळगूळ, तिळाचे लाडू-वड्या किंवा हलवा देतात. स्त्रिया वाण वाटून 'तीळगूळ घ्या व गोड गोड बोला' असे म्हणतात. सोबतच स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना होते. विवाहित स्त्रिया या दिवसापासून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करतात. रथसप्तमी हा त्याचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया या दिवशी आवर्जून काळ्या साड्या नेसतात. तिसरा दिवस 'किंक्रांत' म्हणून साजरा केला जातो. संक्रांती देवीने दुसर्‍या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारून त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस 'किंक्रांत' म्हणून पाळला जातो. हा दिवस अशुभ मानला जातो. पंचागात हा दिवस 'करिदिन' म्हणून दाखवलेला असतो. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये, भोगीच्या दिवशी राखून ठेवलेली शिळी भाकरीच खावी, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी-कुंकू करावे अशा काही रुढी-परंपरा पाळल्या जातात. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा होतो. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगांना बेगड लावून सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो. बैलांविषयी कृतज्ञभाव व्यक्त केले जातात-
 
 
सण एक दिन, बाकी वर्षभर।
ओझे मरमर वाहायचे॥
 
 
संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते, अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव, कधी डुक्कर, तर कधी काहीही असते. मात्र, यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे, हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण होते. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी तीळगुळाची देवाणघेवाण करावी, स्नेह वाढवावा व नवीन स्नेहसंबंध जोडावे. जुने असलेले समृद्ध करावे, तुटलेले आवर्जून पूर्ववत सांधावे, हाच या कार्यक्रमामागील उद्देश असतो.
 
 
पतंगोत्सव
 
 
पतंग पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरुन बनवितात. याला दोर्‍याच्या साहाय्याने आकाशात उडविले जाते. तो उडविताना मांजाची चक्री धरण्यास व पतंगाला ढील देण्यास अशा दोन व्यक्ती लागतात. त्याची दोरी म्हणजेच मांजा. तो काचेचा वस्त्रगाळ भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंगास काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. आपल्याकडे पतंग हा मकरसंक्रातीला उडवतात. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे 'उत्तरायण' या नावाने पतंग महोत्सव साजरा होतो. सध्याची पिढी पतंग उडवणे विसरत आहे. मात्र, कुठे कुठे त्याचा कल्लोळही पाहायला मिळतो. मांज्यामुळे पक्षी व माणसाच्याही जीवितहानीत वाढ झाली आहे. पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला, असे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युत ऊर्जा असते, हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. भारतात संक्रातीला व प्रजासत्ताक दिनी पतंगोत्सव होत असतो. मजेदार गीत-
 
 
पतंग उड़ा रे छोरा पतंग उड़ा,
छोरा मत ना नजर फिसला।
पेज लड़ा री छोरी पेज लड़ा,
मर्दा आके तू ना अकड़ दिखा ॥
 
 
पतंग हा एक पंखच आहे. त्याला दोन समान भाग असतात. हे भाग सारख्या आकाराचे असल्याने तो समतोल बनतो. त्याच्या काड्या, शेपूट व आकार यावर तो कसा उडेल, हे ठरते. तो हवेमुळे वर आकाशात जातो. वार्‍याचा वेग मर्यादित असेल तर तो चांगला उडतो. त्याचे निमुळते टोक त्याला हवेत वर जाण्यास मदत करते. वर जाताना त्याचा उडण्याचा कोन वार्‍याला अडवतो व त्याचे दोन भाग करतो. त्याच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्याच्या खालील बाजूला जास्त दाबाचा पट्टा म्हणजेच हवेची उशी तयार होते. मांजा त्याला ओढ देतो, त्यामुळे पतंग खालील भागात असलेल्या हवेच्या उशीवर स्वार होतो. त्यामुळे तो खालून वर ढकलला जात राहतो. जगद्गुरू तुकारामजी महाराज म्हणतात-
 
 
पांडुरंगा पांडुरंगा,
मी पतंग तुझ्या हाती धागा॥
तुका म्हणे, मी झालो पतंग,
धागा आवरा हो पांडुरंग॥
 
 
हवामानाचा अभ्यास करण्यासाठीही पतंगांचा वापर झाला आहे. युद्धात टेहळणीसाठी आणि शत्रुसैन्याला घाबरवण्यासाठी त्याचा वापर केला. मोठ्या पतंगांचा उपयोग, त्यावर काही सामाजिक जागरूकतेचे संदेश, घोषणा, राजकीय पक्षाच्या प्रचाराशी संबंधित माहितीसाठीही केला जातो. संक्रांतीच्या काळात आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरुन जाते. पतंग 'गुल' करण्याच्या स्पर्धेलाही उधाण येते. कुठे विविध रंगीढंगी व आकर्षक अशा पतंगांचा महोत्सवदेखील भरतो. पण, याच सणाला पतंग का उडवला जातो? तर प्रत्येक सण व उत्सवाला धार्मिक महत्त्वासह त्याची शास्त्रीय कारणेदेखील असतात. थंडी आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येते असे म्हणतात. थंडीत ऊन कमी असल्यामुळे आपसुकच आळस जाणवतो. त्यामुळेच शरीराची हालचाल व्हावी आणि सूर्याची किरणे अंगावर पडावीत, यासाठी पतंग उडवला जातो, असे म्हणतात. संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे 'उत्तरायण' सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली की, त्याचा शरीराला फायदा होतो. त्वचा निरोगी आणि तजेलदार बनते. पतंग उडवताना आपले लक्ष नभातील पतंगाकडे राहून शरीराची हालचालही होते. त्यामुळे शरीराला पुरेपूर ऊन मिळते. मात्र 'अति सर्वत्र वर्ज्यते' हे लक्षात असू द्यावे!
 
 
 
- श्रीकृष्णदास निरंकारी
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@