प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद दिल्यास काश्मीर बदलेल

12 Jan 2021 12:38:19

rambhau mhalagi_1 &n


रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गोसावी यांनी गुंफले

ठाणे: “काश्मीर म्हटले की, अशांतता, दहशतवाद आणि लष्करी कारवाया याबद्दल प्रतिक्रिया उमटतात. मात्र, सगळे काही सरकार करणार यापेक्षा आपणही काही जबाबदारी घेणे गरजेचे असून प्रतिक्रियेऐवजी ‘प्रतिसाद’ दिल्यास काश्मीर नक्कीच बदलेल,” असा ‘असिम’ विश्वास सारंग गोसावी यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील ‘सध्याचे काश्मीर’ हे तिसरे पुष्प रविवार दि. १० जानेवारी रोजी गुंफले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी फळांची परडी देऊन त्यांचे स्वागत केले.
 
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे सादरीकरण यंदा ‘कोविड’ प्रादुर्भावामुळे पटांगणाऐवजी निमंत्रितांच्या उपस्थितीत बंदिस्त सभागृहात होत आहे. धुमसत्या काश्मीरमध्ये बदल घडविण्यासाठी ‘असिम फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेली १८ वर्षे असिम प्रयत्न करणारे पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर सारंग गोसावी यांनी काश्मीरमधील आपले अनुभव म्हाळगी व्याख्यानमालेतून मांडले. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरच्या स्वायत्ततेबाबतचा मोठा निर्णय झाल्याने लोकशाहीची पुनर्रचना करण्याचा हेतू साध्य झाला. सरकारने ‘बॅक टू व्हिलेज’ सारखे कार्यक्रम राबविल्यानंतर बर्‍याच अंशी स्थिती निवळली. ७० वर्षांनंतर प्रथमच निवडणुका होऊन मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद येथील जनतेने अनुभवला. महत्त्वाचा बदल म्हणजे, डोमिसाईल प्रमाणपत्र मिळून वाल्मिकीसारख्या विविध समाजांना न्याय मिळाला. प्रशासकीय कामकाज सुरळीत झाले. तरीही, तेथील लोकांमधील राग अजूनही कमी झालेला नाही. परंतु, भारतीय सैन्याकडून चांगले काम सुरू असून मागील दीड वर्षात एकही ‘निगेटिव्ह’ घटना घडलेली नाही. मात्र, लगेचच काही बदल होतील असे नाही.
जम्मू-काश्मीरला आपण भारताचा अविभाज्य भाग मानतो, तर तेथे बदल घडविण्याची जबाबदारीही आपलीच आहे. सरकार करणार त्यापेक्षा आपणही छोटी-मोठी सुरुवात करणे गरजेचे असल्याचे मत गोसावी यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांच्या ‘असिम’ या संस्थेमार्फत काश्मीरमध्ये सुरू केलेल्या विविध शैक्षणिक, क्रीडा, तसेच रोजगाराच्या उपक्रमांचा ऊहापोह उपस्थितांसमोर मांडताना, काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी आयटी कंपनी सुरू केल्याचे सांगितले.


गेल्या दीड वर्षात काश्मीरमध्ये रस्ते, जलसंधारणाची, इन्फास्ट्रक्चरची कामे सुरू झाली असून शिक्षणाच्याही नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तेव्हा, जम्मू-काश्मीरवर वाईट मते बनवून केवळ चर्चा आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्याला प्रतिसादाचे रूप मिळणे गरजेचे आहे. किंबहुना, तेथील सकारात्मक बातम्या जनमानसात पोहोचविण्याची जबाबदारी माध्यमांनी घ्यायला हवी. तेथील जनतेशी नाते जोडण्यासाठी सध्या ठाणे-डोंबिवलीतून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चर्चा आणि प्रश्नापेक्षा उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करून फेसबुक, व्हॉटस अ‍ॅपसारख्या सोशल माध्यमातून जम्मू-काश्मीर अथवा लडाखचा एकतरी मित्र जोडा, असे आवाहनही सारंग गोसावी यांनी तरुणाईला केले आहे. कार्यक्रमाच्या समारोपाला श्रोत्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.




Powered By Sangraha 9.0