दुर्मीळ माऊंटन गोरिलांचे रक्षण करणाऱ्या ६ वनरक्षकांची हत्या

11 Jan 2021 15:13:21
gorila_1  H x W


आफ्रिकेतील विरुंगा राष्ट्रीय उद्यानातील घटना

आफ्रिका - आफ्रिकेमधील डेमोक्रेटीक रिपब्लिक आॅफ काॅंगोमधील विरुंगा राष्ट्रीय उद्यानातील सहा वनरक्षकांची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात माऊंटन गोरिला प्रजातीचे रक्षण करणारे सहा वनरक्षक ठार झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हल्लेखोऱ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये राष्ट्रीय उद्यानातील 200 वनरक्षकांचा जीव गेला आहे. 
 
 
विरुंगा राष्ट्रीय उद्यान हे आफ्रिकेतील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. माऊटंन गोरिलांच्या अधिवास या राष्ट्रीय उद्यानात आहे. हा राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण परिसर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे. अशा या निसर्गाने संप्पन असणाऱ्या उद्यानातील सहा वनरक्षकांची हत्या झाली करण्यात आली आहे. "आम्ही या दु: खद बातमीची पुष्टी करतो. विरुंगा नॅशनल पार्कच्या मध्यभागी असलेल्या नित्यमितवी प्रदेशात सशस्त्र माणसांच्या एका गटाने आमच्या जागेवर हल्ला केला. यामध्ये आमचे सहा वनरक्षक मृत्यूमुखी पडले असून काही जण जखमी आहेत. या हल्लेखोरांची ओळख त्वरित स्पष्ट होऊ शकली नाही," असे विरुंगाचे प्रवक्ते ऑलिव्हियर मुकिस्या यांनी सांगितले. 
 
 
विरुंगा राष्ट्रीय उद्यान हे युगांडा आणि रवांडा प्रांताच्या सीमेवर ७ हजार ८०० चौरस किमी क्षेत्रात पसरलेले आहे. १९७९ मध्ये त्याची स्थापना झाली. लाॅकडाऊनमध्ये एप्रिल महिन्यात येथील वनरक्षकांची हत्या झाली होती. त्यावेळी काॅंगोच्या शेजारी असणाऱ्या रवांडा प्रातांतील ६० बंडखोर सैनिकांनी विरुंगा राष्ट्रीय उद्यानाच्या शेजारी असणाऱ्या गावांमधील नागरिकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यापासून नागरिकांचे रक्षण करण्याचे काम विरुंग्यामधील वनरक्षक करत होते. गेल्या काही वर्षांमध्ये या राष्ट्रीय उद्यानातील गोरिला संवर्धनाला शिकारी आणि याठिकाणी होणाऱ्या यादवी युद्धामुळे धोका निर्माण झाला आहे. या सर्व संकटांमधून गोरिलांचे रक्षण करण्याचे काम हे वनरक्षक करत होते. वनरक्षकांच्या मृत्यूमुळे उद्यान प्रशासनासमोर गोरिला संवर्धनाचे संकट उभे राहिले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0