अनिर्णित सामन्याचे समाधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |
ICC _1  H x W:
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांदरम्यान सध्या सुरू असलेल्या ‘बॉर्डर-गावस्कर’ कसोटी क्रिकेट करंडक मालिकेचा तिसरा सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याने पराभव टाळत हा सामना अनिर्णित सोडविण्यात भारताला यश आले. मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत ‘१-१’ अशी बरोबरी केली असून, अखेरच्या आणि चौथ्या सामन्यात विजयासह मालिकेत वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. त्यामुळे चौथा आणि अखेरचा सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नाही. वेगवान आणि उसळता चेंडू, असे वैशिष्ट्य असणार्‍या परदेशांतील खेळपट्ट्यांवर कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित खेळताना भारतीय संघाची दाणादाण उडेल, असा अंदाज ऑस्ट्रेलियाच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला होता. मात्र, त्या सर्वांची अपेक्षा फोल ठरली. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिला सामना भारताने जरी गमावला असला, तरी अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात खेळणार्‍या संघाने दुसर्‍या सामन्यात पराभवाची धूळ चारत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा मजबूत होते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयासाठी साम, दाम, दंड-भेद आदी सर्वांचा वापर करत भारताला नमविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, अनेक खेळाडू जखमी झालेले असतानाही भारताने अखेरपर्यंत किल्ला लढविला आणि तिसरा सामना अनिर्णित राखला. मधल्या फळीत खेळणारा हनुमा विहारी हा मांसपेशी ताणल्या गेल्याने धावू शकत नव्हता. मात्र, याही स्थितीत त्याने १६१ चेंडू खेळून काढत अखेरपर्यंत किल्ला लढविला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन याची त्याला मोलाची साथ मिळाली. त्यानेही १३९ चेंडू खेळून काढत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. यासोबतच यष्टिरक्षक रिषभ पंत यानेही त्वरित फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. परिणामी, ऑस्ट्रेलियाचा संघ विजयासमीप पोहोचू शकला नाही आणि भारताने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या सामन्यात भारताला विजय मिळू शकला नसला, तरी सामना अनिर्णित राखण्याचा आत्मविश्वास संघाचे मनोबल नक्कीच वाढवणार, यात काही शंका नाही.
 
 

संकटमोचक ‘हनुमा’

 
भारतीय क्रिकेट संघ हा केवळ घरगुती खेळपट्ट्यांवरच चांगली कामगिरी करतो. परदेशी खेळपट्ट्यांवर मात्र या संघाचा दारुण पराभव होतो, अशी टीका अलीकडच्या काळात भारतीय कसोटी संघावर होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या दौर्‍यादरम्यान ‘४-०’ अशा फरकाने लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघावर अनेकांनी टीका करत तोंडसुख घेतले होते. मात्र, सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारत भारतीय संघाने परदेशी खेळपट्ट्यांवरही आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. केवळ अलीकडच्याच काळात भारतीय संघावर अशी टीका झाली. मात्र, एकेकाळी भारतीय संघात रथी-महारथींसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. ताबडतोब फलंदाज आणि त्रिशतकवीर म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग, क्रिकेट विश्वातील ‘सेकंड सचिन’ अशी ओळख असणारा गौतम गंभीर अशी भारताची सलामीची जोडी होती. क्रिकेट विश्वात ‘दि वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणार्‍या राहुल द्रविडची ख्यातीच निराळी होती. ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हा चौथ्या स्थानचा फलंदाज, पाचव्या स्थानी ‘संकटमोचक’ लक्ष्मण आणि त्यानंतर चपळ यष्टिरक्षक महेंद्र सिंह धोनी असे मातब्बर खेळाडू या संघात होते. एका डावात या सर्वांना बाद करणे हे प्रतिस्पर्धी संघासाठी सहजासहजी शक्य होत नव्हते. त्यामुळे भारतीय संघाचा त्यावेळी एक वेगळाच दरारा होता. मात्र, कालांतराने हे सर्व फलंदाज निवृत्त झाले. मात्र, या सर्वांची जागा भरून काढण्यासारखे खेळाडू सध्या संघात असल्यानेच भारतीय संघ परदेशी खेळपट्ट्यांवरही आता उत्तम कामगिरी करत आहे. वीरेंद्र सेहवागची उणीव रोहित शर्माकडून भरून काढली जात असून, तिसर्‍या क्रमांकावर खेळणारा चेतेश्वर पुजारा हा द्रविडसारखी कामगिरी करत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असून हनुमा विहारीने ‘संकटमोचक’ लक्ष्मणची जागा घेतली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे हादेखील लौकिकाला साजेशी खेळी करत असल्याने भारतीय संघाने परदेशातही उत्तम कामगिरी केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सर्व फलंदाजांसोबत अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाजांचेही मोलाचे योगदान असल्याने भारतीय संघाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.



- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@