दिल्ली - 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ला (एसआयआय) भारत सरकारकडून 'कोव्हीशिल्ड' लसीच्या 11 दशलक्ष लसींच्या खरेदीसाठी विचारणा झाली आहे. ही लस प्रति डोस 200 रुपये दराने उपलब्ध होणार असल्याचे 'एसआयआय'कडून सांगण्यात आले आहे. देशात कोव्हीशिल्डच्या लसीकरणाची मोहिम 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
आज कोरोना लसीकरणाच्या मोहिमेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य, होमगार्ड, आपतकालीन व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यांची संख्या 3 कोटी असून त्यांना लस टोचण्यासाठी होणारा खर्च केंद्र सरकार देणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. दसुऱ्या टप्प्यांमध्ये 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील केवळ आजारी असलेल्या ज्यांना संक्रमणाचा धोका अधिक आहे त्या व्यक्तींना लस टोचण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सविस्तर आढावा घेतल्यानंतर लोहरी, मकर संक्रांती, पोंगल, माघ बिहू इत्यादींसह आगामी उत्सव लक्षात घेता कोरोना लसीकरणाला 16 जानेवारी, 2021 पासून सुरुवात होईल," असे पंतप्रधानांच्या निवेदनात म्हटले आहे.