नवे वर्ष; नव्या आशा! बांधकाम व्यवसायाला झळाळी

01 Jan 2021 20:37:04

mhadaa _1  H x
 
 
 
 
मुंबई : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने झाकोळलेले मुंबईतील बांधकाम उद्योग पुन्हा नवनवीन शिखरे गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोना काळात ठप्प झालेली घरांची विक्री नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नव्या वर्षात या उद्योगाला नवी झळाळी मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
उद्योगनगरी मुंबई हे इतर व्यवसायाप्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही आघाडीवर आहे. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रदेखील बाधित झाले. सुरुवातीच्या कालावधीत घरांची नोंदणी रोडावली, त्याचबरोबर नवीन प्रकल्पदेखील ठप्प झाले. त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली असून, गृहप्रकल्प उभारले जात असतानाच घरांची मागणीदेखील वाढत आहे.
 
 
राज्य सरकारनेही बांधकाम क्षेत्रास साह्य करण्यासाठी मुद्रांक शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणामही जाणवला. शिवाय, नवीन वर्षाच्या १ जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात एक टक्के वाढ करण्याच्या निर्णय घेतल्याने डिसेंबर अखेरीस घरांच्या नोंदणीत भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून २८ ते ३० डिसेंबर अखेरीस ३,०५९ घरांची नोंदणीदेखील झाली आहे. संपूर्ण मुंबईत २५ डिसेंबरपर्यंत नोंदविल्या गेलेल्या घरांची सरासरी जवळपास ५८५ इतकी आहे, तर केवळ २७ ते ३० डिसेंबरपर्यंत घरांची नोंदणी दुपटीने वाढून १,११९ इतकी झाली.
 
 
बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने ही सकारात्मक वाढ असल्याने २०२१ मध्येदेखील घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘नाईट फ्रँक कन्सल्टन्सी’ने घेतलेल्या आढाव्यानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घरांच्या नोंदणीतून मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्याच्या तिजोरीत भर पडत असते. यंदा मात्र कोरोनामुळे तिजोरीत भर पडू शकली नाही, तरीही सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाने घेतल्याने घरांच्या विक्रीत वाढ झाली. २०२० मध्ये घरांच्या नोंदणीतून राज्याच्या तिजोरी सुमारे ३,१०७ कोटी रु. महसूल जमा झाला. त्यातील १,३५० कोटी रुपये महसूल डिसेंबर २०२० मध्ये प्राप्त झाला. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट, २०२० कालावधीत १,७५६ कोटी रुपये महसूल जमा झाला.


Powered By Sangraha 9.0